सांगोला :-

   सांगोला शहरातील अनेक बालगोपाळांच्या पसंतीचे व विरुंगळ्याचे आवडते ठिकाण म्हणून बस स्थानका नजीक भोपळे रोड, जवळ असणार्‍या उद्यानाला गेल्या काही दिवसापासून घाणसांड पाणी व घाणीच्या साम्राज्याने घेरले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात नाराजीचा सूर उमटत आहे. उद्यानाच्या जवळच असणार्‍या उत्तर व पश्‍चिम दिशेकडील गटारीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात घाण पाणी तुंबलेले आहे. हे तुंबलेले पाणी उद्यानाच्या संरक्षक भिंतीला टेकले असून उत्तरेकडील गेटमधून घाण पाणी उद्यानात जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.लाखो रु.खर्च करुन नगरपालिकेने हे उद्यान उभारले खरे परंतु; हेच लाखो रुपये आता तुंबलेल्या गटारीमुळे पाण्यात नव्हे तर गटारीत जातात की काय असे चित्र निर्माण झाले आहे.

   आसपासच्या भागातून येणारे सांडपाणी व नजीकच असणारी लघुशंकेची सोय याचेही घाण पाणी याच गटारीमध्ये मोठ्या प्रमाणात साचलेले आहे. आसपासचा कचरा गटारीत पडला आहे. वेळोवेळी गटारीची साङ्गसङ्गाई न झाल्यामुळे गेल्या काही दिवसापासून प्रचंड दुर्गंधी सुटली आहे. दोन्ही बाजूच्या दोन्ही गटारी तुडंब भरलेल्या आहेत. लवकरच गटारीची स्वच्छता न झाल्यास हेच घाण पाणी रस्त्यावरुन वाहण्याची शक्यता नाकारता येत नाही.बसस्थानका नजीक असणारे हे उद्यानात नेहमीच बालगोपालांनी व महाविद्यालयातील युवक व नागरिकांची ये-जा असते. आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणात दवाखाने व आरोग्या सोयी सुविधा असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकही येत असतात. तर अलीकडच्या काळात वाढदिवस साजरे करायचे हक्काचे ‘‘बर्थ डे पॉईंट’’ म्हणून या उद्यानाची ओळख निर्माण होत आहे. तर अनेकजण ङ्गोटो सेशनसाठी या उद्यानात येतात.

   त्यामुळे गटारीच्या तुंबलेल्या पाण्याने व दुर्गंधीमुळे सदरचे विरुंगळ्याचे केंद्र असलेले या उद्यानाला अस्वच्छतेच्या वक्रदृष्टीने घेरले असल्याचे दिसत आहे.स्वच्छ आणि सुंदर सांगोला करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणार्‍या नगरपालिकेने असा सार्वजनिक ठिकाणच्या स्वच्छतेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थीत करण्याच्या दृष्टीने सुनियोजित गटारांची व्यवस्था महत्त्वाची असून गर्दीच्या परंतु; नजरेआड असणार्‍या अनेक सार्वजनिक ठिकाणांनाही वेळोवेळी मुख्याधिकार्‍यांनी व आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांनी भेटी देवून सदर परिसर स्वच्छ कसा राहील हे पाहाणे गरजेचे आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली