गेले काही दिवस चिनी सोशल मीडियावर चर्चा होती ती बीजिंगमधील बुकवर्म या पुस्तकाच्या दुकानाची. बीजिंगमधील इंग्रजी पुस्तकांचं दुकान ११ नोव्हेंबरला बंद करण्यात आलं. हे दुकान अचानक बंद झाल्यामुळे अनेक नेटिझन्सनी हळहळ व्यक्त केली. अनधिकृत बांधकाम असल्याचं सांगत बीजिंग स्थानिक स्वराज्य संस्थेने हे दुकान बंद करण्यास सांगितलं. बीजिंगमधील सानलीथून रस्त्यावर हे बुक कॅफे होतं. सानलीथून हा रस्ता बीजिंगमधील नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहे.  तरुणाईला आकर्षित करणारी अनेक दुकानं, रेस्टोरंट, कॅफे याठिकाणी आहेत. बीजिंगमध्ये फिरायला आणि शिकायला येणारे परदेशी विद्यार्थी हमखास याठिकाणी टाईमपास करायला येतात. अनेक चिनी विद्यार्थ्यांचा पण हा कट्टा आहे. बुकवर्म बरोबरच इतरही कॅफे बंद करण्यात आले. पण बीजिंगच्या वाचकांमध्ये बुकवर्म कॅफेला खास महत्त्व असल्याने ते बंद पडल्याने वाचकांना दुःख झालं.बुकवर्मची सुरवात साधारण २००२ मध्ये एक वाचनालय म्ह्णून झाली.

   इंग्रजी पुस्तकं याठिकाणी उपलब्ध होती. नव्याने झालेल्या या दुकानाला वाचकांचा प्रतिसाद मिळायला लागल्याने या वाचनालयाचं रूपांतर पुस्तकांच्या दुकानात झालं आणि त्याठिकाणी एक छोटं कॅफे  करण्यात आलं. यामुळे दुकानात येणाऱ्या वाचकांना काहीवेळ तिथे बसून पुस्तक वाचण्याची सोय झाली.  हे कॅफे हळूहळू लोकप्रिय झालं. अनेक वाचक, साहित्य प्रेमी याठिकाणी येऊन इंग्रजी तसंच चिनी साहित्यावर चर्चा करत असत. देशी परदेशी चित्रपटांवर पण याठिकाणी चर्चा सुरु झाल्या. बुकवर्म कॅफेची ही लोकप्रियता लक्षात घेऊन २००६ सालापासून साहित्य महोत्सवाला सुरवात झाली.

   यामध्ये चिनी तसंच परदेशातील लेखकांना आमंत्रण देण्यात आलं. यालाही उत्तम प्रतिसाद मिळायला लागल्याने दरवर्षी हा साहित्य महोत्सव सुरु झाला. २००६ मध्ये सुचो आणि छंगतु या शहरांमध्ये पण बुकवर्म कॅफेच्या शाखा सुरु झाल्या. सांस्कृतिक आदानप्रदान याठिकाणी सुरु झालं. वाचकांच्या मागणीवरून काही वर्षांपूर्वी बुकवर्म कॅफेमध्ये युरोपियन साहित्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. बुकवर्म कॅफे अनेक वाचकांचं दुसरं घर झालं, अनेक वाचक दिवसभर याठिकाणी येऊन बसत असत. कॅफेमध्ये मिळणारे पदार्थ पण चांगले असल्याने अनेकजण दिवसेदिवस याठिकाणी बसून पुस्तकांचा आस्वाद घेत असत. सगळ्या गोष्टी सुरळीत सुरु असताना अचानक ही वास्तू अनधिकृत असल्याची नोटीस येते. जागामालकाही भाडेकरार वाढवून देण्यास संमती देत नाही.  अखेर बुकवर्म कॅफे बंद  करण्याचा निर्णय घ्यावा लागला.

   कॅफेचे मालक डेव्हिड कॅन्टालूपो यांनी सोधलमिडीयावरून जाहीर केला. त्यानंतर बुकवरम्च्या चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. अनेक जणांनी हि बातमी दुःखद असल्याच म्हंटलं आहे. बुकवर्म कॅफे बंद झाल्याने एका युगाचा अंत झाल्याचं काही वाचकांनी म्हंटलं आहे. अनधिकृत  जागेत असल्याने बुकवर्म कॅफे बंद झाल्याचं कारण  वरकरणी  जरी दिसत असलं तरी यामागचं मुख्य कारण म्हणजे याठिकाणी होत असलेलं सांस्कृतिक आदानप्रदान. याठिकाणी असलेली अनेक दुकान बंद करण्यात आली. ही  दुकानं पाश्चिमात्य आणि खुल्या विचारांचा प्रचार करणारी होती. त्यामुळे ती थेट बंद करण्यापेक्षा ती अनधिकृत असल्याचं दाखवून करणं अधिक सोपं होतं. बुकवर्म कॅफे बंद झाल्यानंतर मालक डेव्हिड  कॅन्टालूपो यांनी बुकवर्म नवीन जागेत सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. पण  परवानगी मिळेलच याची  खात्री  नाही.

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...