सांगोला:-

   गेल्या अनेक महिन्यांपासून सांगोला शहरातील प्रमुख व मुख्य रस्त्यांची झालेली दयनीय अवस्था आणि वाढत असलेली धुळ यामुळे सांगोलकरांचे आरोग्यच आले धोक्यात अशी गंभीर परिस्थिती निर्माण  झाली आहे. वाढती धूळ ही अत्यंत धोकादायक असून श्वसनाचे गंभीर आजार  बळावण्याची शक्यता नाकारता येत नाही.  सध्या तरी शहरातील नागरिकांना व ग्रामीण भागातील ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही नाकाला आणि तोंडाला बांधून फिरावे लागत आहे. डोळ्यांना उघडे ठेवण्याशिवाय पर्यायच नसल्याने उघड्या डोळ्यांनीच रस्त्याची झालेली धूळधाण पहावयाची वेळ नागरिकांवर आली आहे.शहरातील बस स्टॅण्ड लगत असणाऱ्या स्टेशन रोड ते कचेरी रोड या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची रहदारी असते. बहुतांशी डांबरी रस्ता मातवटलेला बनला आहे. त्याचबरोबर शहरांतर्गत असणाऱ्या भोपळे रोड, ते त्रिमुर्ती रोड, आठवडा धान्य बाजार, यासारख्या सर्वच रस्त्यांवर प्रचंड आणि मोठ्या प्रमाणात जिकडे-तिकडे मातीची धूळ दिसते. वाहनांची संख्या वाढल्यानंतर पुर्ण रस्ताच धुळीने धुसर धुसर होत आहे.

   वाढत्या धूळीचा त्रास मोटार सायकल धारकांना मोठ्याप्रमाणात होतो. याउलट पायी चालत जाणाऱ्यांसाठी तर या रस्त्यावरुन ये-जा करणे आणखीन जीकिरीचे बनत आहे.सांगोला शहरातही वाहनांची असणारी प्रचंड संख्या आणि वाढती रहदारी यामुळे शहरातील प्रदुषणात वाढच होत आहे. त्यास भरीस भर म्हणून खराब झालेले रस्ते आणि मुरुम टाकून रस्त्यांची केलेली डागडुजी यांचा आणखीनच हातभार हवा प्रदुषणाला लागत आहे. दिवाळी कालावधीत शहरातील विविध रस्त्यांवर हवेच्या प्रदुषणाची स्थिती   नेहमीच गंभीर असते. रस्त्याची दुरावस्था व माती यामुळे हवेचे प्रदुषण आणखीनच वाढत आहे. शहरातील रस्त्यांची अवस्था जितकी बिकट आहे त्याहून बिकट अवस्था शहरातील उपनगरातील भागात आहे. मस्के कॉलनी येथील रस्त्याचा विषय तर नेहमीच चर्चेचा विषय असतो.स्वच्छ व शुध्द हवा ही निरोगी आरोग्याची गरज आहे.

   दिवसेंदिवस वाढत असलेले हवा प्रदुषण यामुळे प्रदुषीत हवाच श्वसनाद्वारे नाकातून शरीरात जात असल्यामुळे शरीराला घातक ठरत आहे. हवा प्रदुषणाचे दुष्परिणाम प्रत्येक व्यक्तीला  सोसावे लागतात. यामुळे श्वसनाचे आजार व रोग बळावण्याची शक्यता अधिक होते. शहराचे आरोग्य जपण्यासाठी हवेची गुणवत्ता चांगली स्वच्छ व शुध्द असणे गरजेचे आहे. यासाठीच शहरातील खराब रस्त्याची गुणवत्ता व डागडोजी चांगल्या पध्दतीने धरणे त्याहीपेक्षा अत्यावश्यक आहे; अन्यथा कोट्यावधीचा कर भरणाऱ्या नागरिकांच्या सदृढ आरोग्यासाठी धोक्याचीच घंटा वाजण्याशिवाय राहणार नाही.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.