सांगोला:-

   14 नोव्हेंबर हा दिन भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा जन्मदिन सर्वत्र बालदिन म्हणून साजरा केला जातो. आजचा बालक उद्याचा पालक आणि देशाचा जबाबदार नागरिक बनतो. ही वस्तुस्थिती असतानाही शिक्षणाने स्मार्ट  बनत असलेला बालक शिक्षणाच्या टेन्शनमुळे बालपण हारवत असल्याचे दिसत आहे. याला जबाबदारही बालकांच्या पालकांची अतिअपेक्षा असणे आहे. सहाजिकच शिक्षणाच्या टेन्शनने हरवले बालपण; पालकांच्या अतिअपेक्षेने मुलांना वाढले टेन्शन अशी स्थिती दिसून येत आहे.पूर्वीची शिक्षण व्यवस्था ही  प्राथमिक अवस्थेत पहिली ते चौथी अशी होती. पहिलीत प्रवेश घेत असताना किमान वय पाच ते सहा इतके असे. त्यामुळे सहाजिकच लहान मुलांना आपले बालपण कमीत कमी चार वर्ष तरी अगदी आनंदात, सुखात, हसत, खेळत, बालपणाचा खोडकरपणा जपत जगता येत होता. काळानुसार स्पर्धा वाढली. गुणवत्ता टिकवण्यासाठी शिक्षणावर भर देण्यात आला.

   जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा म्हणजे बहुतांशी लोकांच्या बालपणाच्या आठवणींचा ठेवा जपणारा आयुष्यतातील न विसरता येणारे ज्ञानाचे मंदिर.सध्याच्या इंग्लिश मीडियम, सेमी इंग्लिश च्या काळात मुलांना अवघ्या अडीच वर्षातच ज्युनिअर के.जी., सिनिअर के.जी., सारख्या नवीन इयत्तेत प्रवेश मिळू लागला. बघता बघता पाच वर्षाचे बालपण अडीच वर्षातच बंदिस्त होवू लागले. जरी ज्युनिअर के.जी. व सिनिअर के.जी.मध्ये शिक्षणाचा भार फारसा नसला तरी या वाढीव शिक्षणक्रमांमुळे बालकांचे बालपण मात्र मर्यादीत झाले. प्रत्येक पालकाला आपला पाल्य हा धावत्या जगाबरोबर स्मार्ट बनला पाहिजे असे वाटणे सहाजिक आहे. परंतु अगदी बालवयातच त्याला शिक्षणसंस्थांमधून एकप्रकारे गुण मिळविणारे लष्करी प्रशिक्षणच जणू दिले जात आहे.ग्रामीण भागात लहान मुले अगदी सकाळी उठून अंगणात विविध प्रकारचे खेळ खेळत असे.

   मातीची किंवा घरातील निरोपयोगी वस्तूंची संसारोपयोगी भांडी  म्हणून वापर करुन बालपणीच संसाराचा छोटासा प्रयोग करत असे. घरातील फाटकी तुटकी चड्डी, अंगरखा, घालून आसपासच्या बालचमूंना गोळा करुन विविध प्रकारचे आनंद देणारे व शरिराचा व्यायामही करुन घेणारे खेळ खेळत असे. ज्यांच्या घरी विविधप्रकारची जनावरे, पशु असे त्यांच्यावर बसणे व फिरणे हाही आनंद वेगळाच उपभोगला जात होता.संगणकाच्या युगात धावत्या जगात आपला पाल्य टिकला पाहिजे म्हणून पालकही आता स्वत: व्यस्त होवून पाल्याला शिक्षणात व्यस्त करत असल्याचे दिसत आहे. वयाच्या दुसऱ्या, तिसऱ्या वर्षी ज्यु.के.जी.मध्ये प्रवेश घेतलेला बालक बघता-बघता पी.जी.चे शिक्षण घेतो. या मधल्या कालावधीत ज्यु.के.जी.ने बालपण हिसकावले. तर पी.जी.झाल्यानंतर नोकरीच्या शोधाने युवापन ही हरवत असल्याचे दिसत आहे.सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत एक-एक गुण अत्यंत महत्त्वाचा असल्याने प्रत्येक पालकाला आपला पाल्य हा अधिकाधिक गुण मिळवलेच पाहिजे असे वाटते. हरहुन्नरी व बहुमुखी व्यक्तिमत्त्व घडावे असे क्वचितच पालकांना वाटते अन्यथा बहुतांशी पालकांना फक्त मुलांचे भवितव्य गुणांच्या बेरजेतच आहे. असे वाटत असल्यामुळे पालकांच्या अतिअपेक्षेने मुलांना टेन्शन.

 

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग