पं. नेहरू हे नाव माहीत नसलेला माणूस भारतात सापडायचा नाही. आचार्य अत्रेंच्या भाषेत बोलायचे झाल्यास पं. नेहरू आणि त्यांचा 14 नोव्हेंबर हा जन्मदिन देशभर नव्हे, तर जगभर बालदिन म्हणून साजरा करतात, हे ज्या भारतीयाला माहीत नाही तो भारतीय नव्हेच.14 नोव्हेंबर 1889 रोजी श्री. मोतीलाल व सौ. स्वरुपराणी या दाम्पत्याच्या पोटी जवाहर नावाचा हिरा जन्मला आला. जन्माला आले तेच मुळी सोन्याचा चमचा तोंडात घेऊन. ब्रिटनला जाऊन वडिलांप्रमाणेच उच्च शिक्षण घेऊन बॅरिस्टरचा झगा त्यांनी मिळवला. वकिली केली असती, तर अमाप पैसा मिळवला असता. पण, त्यात गांधी नावाचा झंझावात त्यांच्यात शिरल्यावर भूतलावरील सार्‍या भौतिक सुखांचा त्याग करून, अंगावर खादी चढवून ते स्वातंत्र्यलढ्यात सामील झाले.नेहरुंची कारकीर्द तशी वादग्रस्तच. त्यांच्या अनेक धोरणांविषयी शंका घेतली जाते. पण, त्यांच्या बालप्रेमाविषयी मात्र कुणी शंका घेतली नाही. पंडितजींना मुलांची आवड होती.

    मुलांसाठी तर फक्त चाचा नेहरू होते. मुलांशी बोलताना ते म्हणायचे, मला तुमच्याबरोबर राहायला आणि बोलायला आवडतं. आपल्या त्या सुंदर जगाविषयी तुमच्याशी बोलायला मला आवडेल. फुलं, झाड, पक्षी आणि जनावरे यांच्याविषयी तुमच्याशी बोलायला मला आवडेल.या जगात आपल्याभोवती पसरलेल्या सुंदर गोष्टीबद्दल मला तुमच्याशी बोलायला आवडेल. हे सगळे जग म्हणजे एक अद्भूत परीकथा आणि आतापर्यंत लिहिल्या गेलेल्या कथांपेक्षा महान पराक्रमाची कथा आहे. फक्त आपल्याकडेच ते बांधणारी नजर हवी, ते ऐकणारे कान हवेत आणि जगातील सौंदर्याला आणि चैतन्यला सामोरं जाणारं मन हवं.आजचे बालक उद्याचे पालक. म्हणून मुलं म्हणजे पंडितजींचे मोठे आशास्थान. त्यांच्याबरोबर निसर्ग सौंदर्याचा भरपूर आनंद लुटणे हा त्यांचा आवडता छंद. एका बालविशेषांकात त्यांनी मुलांशी संवाद साधताना म. गांधीजींची थोरवी सांगितली. केवळ भारतातीलच नाही, तर परदेशातील लहान मुलांवरही त्यांचे प्रेम होते.

    1955 मध्ये ते रशियाला गेले असता एक छोटा बालक त्यांना गुलाबाचे फुल देण्याचा प्रयत्न करीत होता, पण त्याचा हात पोहोचत नव्हता, कारण पंडितजी उंचावर उभे होते.तेव्हा तो बालक नेहरू चाचाजी तुम्ही फार मोठे आहात, असे बोलला. हे शब्द ऐकल्यावर नेहरुंची मोटारीतून खाली उतरून त्या बालकास उचलले आणि म्हणाले, बाळा, मी मोठा नाही, उद्याचे जग पाहणारा आणि त्यात वावरणारा तूच माझ्यापेक्षा मोठा आहेस आणि त्याला दोन हातांनी उंच उचलून, पाहा रे मुलांनो आता कोण मोठा दिसतो? असे म्हंटले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात पंडितजींसह त्या मुलावर गुलाबाच्या फुलांचा वर्षाव करण्यात आला आणि ‘चाचा नेहरू झिंदाबाद’चा घोष चालू झाला. एकदा जपानी मुलांनी पंडितजींना हत्ती कसा दिसतो, असा प्रश्‍न विचारला.

    त्यावर त्यांनी खराखुरा हत्ती भेट म्हणून जपानला पाठवला. संयुक्त महाराष्ट्राला नेहरुंचा विरोध होतत्या वेळी ते प्रतापगडावर आले असता त्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करण्यात आले. तेव्हा त्यांना अतिशय वाईट वाटले. पण, अशाही प्रसंगी प्रतापगडावर एक 10 वर्षाचा राजबिंड मुलगा मराठेशाहीचा फेटा बांधून रुबाबात उभा होता. त्याला पाहताच नेहरुंचे वात्सल्य उफाळून आले. त्याला लाडिकपणे कुरवाळले. काही क्षण का होईना पण त्यांच्या चेहर्‍यावर तेज पसरले. बालकांबद्दल असणारे त्यांचे ममत्व असे जगजाहीर होते.नेहरुंचा जन्मदिन आपण ‘बालदिन’ म्हणून साजरा करतो. पण, भारतात पाच कोटी बालकामगार आज हलाखीच्या अवस्थेत आहेत. त्यांच्याकडून जबरदस्तीने फटाके, काच कारखाने, कोळशाच्या खाणीत काम करून घेतले जात आहे. जे वय मातीत खेळायचे असते, बागडायचे असते, त्या वयात त्यांच्या वाट्याला हे दिवस. जगभर हेच चित्र आहे. त्यात भारत आघाडीवर आहे. हॉटेलात तर बालकामगारांची संख्या चिंताजनक आहे. जेव्हा जगभरातील मुले या शोषणातून मुक्त होतील तेव्हाच खर्‍या अर्थाने चाचा नेहरुंचा जन्मदिवस बालदिन म्हणून सार्थकी लागेल.

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...