संगणक आणि संगणकीय प्रणाली पूर्वीप्रमाणे फक्त सांगकाम्या राहिल्या नसून मानवी व्यवहार जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची क्षमता त्यांना दिली जात आहे. यालाच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उर्फ कृत्रिम बुद्धी असंही म्हटलं जातं. नानाविध सॉफ्टवेअर्समुळे आगामी काळात व्यवसायाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी बाळगावी लागणार आहेच; पण, बदलणार्‍या रोजगाराच्या चित्राचाही साकल्याने विचचार करावा लागणार आहे.कोणीही व्यावसायिक त्याच्या क्षेत्रातल्या स्पर्धकांबाबत अर्थातच जागरूक (आणि किंचित बावरलेलाही) असतो. कारण, स्पर्धकांच्या व्यूहरचना आणि उत्पादनांवर त्याच्या व्यवसायाचं गणित (आणि भवितव्य) अवलंबून असतं. त्यामुळे ‘डॅमलर बेंझ’ या जगप्रसिद्ध मोटार उत्पादकाला अन्य कारमेकर्सबाबतच चिंता असेल असं कोणीही गृहित धरेल. पण थांबा, तसं नाहीये. त्यांना बीएमडब्ल्यू आणि जीएमची भीती नाही तर टेस्ला, गूगल, अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉनची भीती आहे! फोक्सवॅगन ही सध्याची सर्वात मोठी मोटार उत्पादक कंपनी आहे आणि टेस्लाचं नाव ऐकलं की तिच्या अधिकार्‍यांना घाम फुटतो हे सत्य आहे! आश्‍चर्य वाटलं ना? नाही म्हणजे टेस्ला ही नव्याने आलेली इलेक्ट्रिक कार आहे आणि ती झपाट्याने लोकप्रियही होत आहे. पण गूगल, अ‍ॅपल आणि अ‍ॅमेझॉनचा मोटारींशी काय संबंध..? आहे ना. कारण, पारंपरिक स्वरुपाच्या बहुतेक सर्वच उद्योगक्षेत्रांना दणका बसणार आहे. सॉफ्टवेअर्सच्या क्षेत्राकडून! जरा चौकस नजरेने इकडे-तिकडे पाहाल तर लक्षात येईल, की हे प्रत्यक्ष होऊ लागलंही आहे. ओला आणि उबर टॅक्सी सर्व्हिसचं उदाहरण घ्या. आज जगभर पसरलेल्या या अत्यंत कार्यक्षम आणि लोकप्रिय टॅक्सीसेवांकडे स्वतःची एकही गाडी नाही! हा सर्व अजस्त्र पसारा निव्वळ सॉफ्टवेअर आणि स्मार्टफोन एवढ्यावर चालतो. ‘एअर बीएनबी’ हे नावही बर्‍याचजणांना माहीत असेल. ‘बेड अँड ब्रेकफास्ट’ पद्धतीची स्वस्त आणि मस्त हॉटेल सुविधा सर्वत्र पुरवणार्‍या, जगातल्या सर्वात मोठ्या अशा या कंपनीच्या मालकीचं एकही हॉटेल नाही! सणासुदीला आपण ऑनलाईन वस्तू खरेदी करतो आणि त्यांचं पेमेंटही त्याच पद्धतीने करतो. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, पेटीएम यासारख्या सेवा-पुरवठादारांच्या मालकीची दुकानं नाहीत, उत्पादनं नाहीत की बँकाही नाहीत. सॉफ्टवेअरच्या सहाय्याने सर्व संबंधित पार्ट्यांना एका मंचावर आणणं एवढंच काम त्या करतात. ‘डॅमलर बेंझ’च्या संचालकांना वाटणार्‍या चिंतेचं स्वरूप आता आपल्याला नक्कीच स्पष्ट झालं असेल.

   संगणक आणि संगणकीय प्रणाली पूर्वीप्रमाणे फक्त सांगकाम्या राहिल्या नसून मानवी व्यवहार जास्त चांगल्या पद्धतीने समजून घेण्याची क्षमता त्यांना दिली जात आहे, हे आपल्याला माहीतच आहे. यालाच आर्टिफिशिअल इंटेलिजन्स उर्फ कृत्रिम बुद्धी असंही म्हटलं जातं. नामवंत शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग्ज, तसेच टेस्लाचा जनक एलान मस्क यांनी मोठ्या कंपन्यांना फार डोक्यावर न बसवता त्यामधल्या प्रगतीबाबत सावध राहण्याचा इशारा दिला आहे. कारण, आता संगणक खेळाडूंना हरवू लागले आहेत, तेही संशोधकांच्या अपेक्षेपेक्षा 10 वर्षे आधीच! अर्थात, तो वेगळा विषय आहे. आपला हा लेख आहे सॉफ्टवेअर्समुळे आगामी काळात बदलणार्‍यारोजगाराच्या चित्राबद्दल.आधी स्वयंचलित वाहनांचा विचार करु. विजेवरच्या गाड्यांप्रमाणेच पूर्णपणे स्वयंचलित वाहनंही (अक्षरशः) वेगाने प्रगती करत आहेत असं म्हणता येईल. येत्या काही वर्षांमध्येच अशी वाहनं रस्त्यावर आणण्याचा कायदेशीर मार्ग बर्‍याच देशांमध्ये खुला होईल असं दिसतं. परिणामी, स्वयंचलित तसेच विजेवरच्या वाहनांची संख्या वाढल्यावर, पारंपरिक वाहन उद्योगाचं स्वरूप पूर्णतः बदलेल. हा परिणाम फक्त मोटार कारखाने आणि त्यांना सुटे भाग पुरवणार्‍यांपुरता मर्यादित राहणार नाही, तर गाड्यांच्या विक्रेत्यांवरही संक्रांत येऊ शकते. कारण, यापुढील काळात कोणत्याही प्रवासासाठी, तुम्ही गाडी विकत घेण्याचीही गरज राहणार नाही. स्मार्टफोनवरून टॅक्सी कंपनीला कॉल करा, स्वयंचलित गाडी तुमच्यासमोर येईल.

   तिच्यातून इच्छित ठिकाणी पोहोचा, फोनमधूनच भाडं द्या. संपलं! ओला, उबरच्या निमित्ताने हे आज अनुभवायला मिळत आहेच. गाडीत भांडवल गुंतवण्याची गरज नाही, पेट्रोल-पार्किंग-सर्व्हिसिंग-इन्शुरन्स यापैकी कोणतीही बाब आपण स्वतःच्या गळ्यात घेण्याची गरज नाही. शिवाय, गाडीत बसून शांतपणे झोप काढता येईल किंवा स्वतःचं काम करता येईल. हेच चित्र प्रत्यक्षात आलं तर या घडीला जन्मलेली बालकं मोठी होतील तेव्हा, म्हणजे अजून 18 वर्षांनी, कदाचित ड्रायव्हिंग लायसन्स काढणारही नाहीत!कोणी काही म्हणो, जगातल्या बहुसंख्य घडामोडींच्या मागे अर्थव्यवस्था किंवा आर्थिक कारणं/ प्रेरणा/ धोरणं असतात. शेती, व्यापार-उद्योग व उत्पादन, बांधकाम यासारख्या काही घटकांवर देशाच्या आणि जगाच्याही आर्थिक, पर्यायाने सामाजिक स्थितीचं सर्वकष चित्र अवलंबून असतं. पारंपरिक रंगातल्या चित्राचा एक मोठा घटक म्हणजे ऑटोमोबाइल इंडस्ट्री उर्फ वाहन उद्योग. आजघडीला वाहनउद्योगावर असंख्य लहान-मोठे कारखानदार आणि त्यातले कामगार, सर्व्हिस सेंटर्स इत्यादी अवलंबून आहेत.

   याच वाहन उद्योगाचं स्वरूप सॉफ्टवेअर्समुळे बदललं, तर सर्वत्र दूरगामी परिणाम जाणवतील, अगदी वाहनउद्योगाशी संबंध नसलेल्या घटकांवरही. उदा. खासगी मोटारींची संख्या 80 ते 90 टक्क्यांनी घटली, तर मोठ्या शहरांमध्ये अनेक एकर जागा मोकळी राहील, जी आज पार्किंगसाठी वापरली जात आहे! या जागेचा वापर बागा किंवा खेळाची मैदानं किंवा छोटी घरं यासारखी सार्वजनिक उद्दिष्ट्यं आणि सुविधा निर्माण करण्यासाठी होऊ शकेल. शहरांमधलं प्रदूषण आणि आवाजाची पातळी एकदम खाली येईल. कारण, इलेक्ट्रिक कारमधून या दोन्ही बाबी निर्माण होत नाहीत. स्वयंचलित गाड्यांमधली सॉफ्टवेअर (त्याचे निर्माते म्हणतात त्याप्रमाणे) खरोखरीच अचूक असल्यास चालकाच्या चुकीमुळे, विशेषतः बेफिकिरी आणि अज्ञानामुळे होणारे अपघात घटतील. आज रस्त्यांवरील अपघातात मृत्युमुखी पडणार्‍यांची संख्या भयंकर आहे, हे आपण जाणतोच. परिणामी, अनेक लोकांचे जीव वाचतील. मात्र, यामुळे विमा व्यवसायातल्या कंपन्यांची आर्थिक गणितं बदलतील. कारण, वाहन-विमा हे त्यांच्या उलाढालीचं आणि उत्पन्नाचं फार मोठं साधन आहे.आता शेती आणि पूरक उद्योगांचा विचार करु. शेतातलं 90 टक्के काम सफाईने करू शकणारे यंत्रमानव उर्फ ‘अ‍ॅग्रि-बॉट’ येत्या दोन दशकांमध्ये मिळू लागतील आणि तेही 10 हजार रुपयांमध्ये! परिणामी, शेतकर्‍यांना दिवसभर स्वतः शेतात राबण्याची गरज राहणार नाही. त्यांना शेती आणि शेतमालाच्या व्यवस्थापनाकडे जास्त लक्ष देता येईल.

   एअरोपॉनिक्स या संकल्पनेमध्ये माती किंवा कोणतंही पारंपरिक माध्यम न वापरता दमट वातावरणाचा उपयोग करून पिकं घेतली जातात. नवीन संशोधनानुसार एअरोपॉनिक्ससाठी लागणार्‍या पाण्याच्या प्रमाणात खूपच बचत होऊ शकते.यापुढे मांसाहार करणार्‍यांना कदाचित प्राणी मारण्याची गरज राहणार नाही. नॉनव्हेज डिश प्रथिन संश्‍लेषणासारख्या रासायनिक पद्धतीने बनवता येऊ शकतील. कीटकांपासून काढलेले प्रोटीनही बाजारात मोठ्या प्रमाणात मिळू लागेल. येत्या काळात माणसाचं आयुष्यमान पूर्वीपेक्षा अनेक वर्षांनी वाढलं आहे, हे तर उघड आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार ते दरवर्षी तीन महिन्यांनी वाढत आहे. काही वर्षांपूर्वी सरासरी आयुर्मान 79 वर्षे होतं. ते आता 80 वर्षे झालं आहे. आयुर्मानवाढीचा हा दरदेखील वाढत आहे आणि 2036 नंतर शतायुषी व्यक्तींची संख्या आजच्यापेक्षा खूपच जास्त दिसणार आहे.आज संगणक आणि स्मार्टफोनद्वारे शिक्षणाचा दूरपर्यंत प्रसार करणं शक्य झालंच आहे. यामुळे विरळ वस्तीच्या किंवा दुर्गम भागातल्या रहिवाशांनाही घरबसल्या विविध प्रकारचं उत्कृष्ट शिक्षण मिळू शकतं. आता तर स्मार्टफोनच्याही किंमती खूपच उतरल्या आहेत. 2020 नंतर जगातल्या 70 टक्क्यांपेक्षा जास्त व्यक्तींकडे स्वतःचा स्मार्टफोन असेल असा अंदाज आहे.

   या मार्गाने आता इंग्रजीप्रमाणेच महत्त्वाच्या विविध प्रादेशिक भाषांमध्येही प्रथम दर्जाचं शिक्षण घेणं बहुतेकांच्या आवाक्यात आलं आहे. तर मित्रहो, असा आहे नजीकचाच भविष्यकाळ! वर सांगितलेले काही बदल आपल्या नेहमीच्या म्हणजे ‘संगणक व माहिती तंत्रज्ञान’ या विषयाशी थेट संबंधित आहेत तर काहींचे थोडेही ‘कनेक्शन’ वाटत नाही. पण, असं भासलं तरी यापुढील सर्वच व्यवहार आयटीचाच आधार घेऊन पुढे सरकणार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सध्या आयटीशी थेट निगडित नसलेल्या क्षेत्रांमध्येही संगणकीय यंत्रणा प्रवेश करणार असून, आयटीवाल्यांना त्यामध्येही नोकरी आणि व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत, हे नक्की. फक्त पारंपरिक विचारांचा चष्मा लावलेल्यांना त्या दिसणं कठीण आहे हे फक्त ध्यानात ठेवा!

अवश्य वाचा