अलिबाग

   रायगड जिल्हयातील 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत मुदत संपणार्‍या व नव्याने स्थापित होणार्‍या पाच ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर 145 ग्रामपंचायतींची पोट निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.  जिल्हयातील 150 ग्रामपंचायतीचे मतदान 8 डिसेंबरला होणार आहे.महाड तालुक्यातील मुमुर्शी, भोमजई व पिंपळकोंड तर  कर्जत तालुक्यातील तिवरे व वरईतर्फे निड या पाच ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबर ते मार्चमध्ये संपणार आहे. या 5 ग्रामपंचायती सार्वत्रिक तर अन्य 145 ग्रामपंचायतींची पोट निवडणूक होणार आहे.  त्यात अलिबाग तालुक्यातील बामणगाव, पेण तालुक्यातील मुंढाणी, उरण तालुक्यातील जूई, खालापूर तालुक्यातील गोरठण बुद्रूक, रोहा तालुक्यातील तळवली तर्फ अष्टमी, महाड तालुक्यातील चिभावे मोहल्ला, कुंभेशिवरथर, तळीये, पोलादपूर तालुक्यातील  पैठण, श्रीवर्धन तालुक्यातील चिखलप, कुडकी, भोस्ते, शेखाडी, म्हसळा तालुक्यातील खरसई या ग्रामपंचायतींमध्ये थेट 14 सरपंच पदाची पोट निवडणूक होणार आहे. तसेच 227 सदस्य पदांची निवडणूक होणार आहे.

   ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम 4 नोव्हेंबरला जाहीर करण्यात आला.  16 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी अकरा ते दुपारी तीन यावेळेत उमेदवारी अर्ज तहसील कार्यालयात भरण्यात येणार आहेत. 22 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून  उमेदवारी अर्जावर छाननी केली जाणार आहे. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास नामनिर्देशन अर्ज मागे घेण्याची प्रक्रीया राबविली जाणार आहे. त्यानंतर उमेदवारांची अंतिम यादी प्रसिध्द केली जाणार आहे. 8 डिसेंबरला  सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच यावेळेत मतदान केंद्रामध्ये मतदान होणार असून मतमोजणी 09 डिसेंबरला होणार आहे. मतमोजणीचे ठिकाण व वेळ जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने तहसिलदार निश्‍चित करतील असे जिल्हा प्रशासनाकडून  सांगण्यात आले आहे.

अवश्य वाचा