सांगोला-

   गेल्या दोन ते तीन वर्षापासून दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्याला यावर्षी परतीच्या पावसाने परत एकदा तडाखा दिला आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचा हंगामच बदलून गेला असल्यामुळे शेतकऱ्यांनाही यंदाच्या वर्षी खतांबरोबरच पीक फवारणीसाठी औषध खरेदी परत एकदा करण्याची वेळ आली आहे. यात भरीस भर म्हणून खत विक्रेते व दुकानदारांकडून ज्या शेतकऱ्यांना  युरियाची गरज आहे त्यांची अडवणूक केली जात असल्यामुळे शेतकरी वर्गांमधून मोठा संताप व्यक्त केला जात आहे.पीकांच्या योग्य वाढीसाठी व जमीनीचा पोत पोषक राहावा म्हणून युरियाची प्रचंड मागणी शेतकरी वर्गांमधून होत असते. तसे पाहिले असता बहुतांशी सर्वच शेतकरी युरियाचा वापर करतात. सहाजिकच युरिया ही अत्यावश्यक बाब बनली आहे.

   याचा गैरफायदाही अनेक दुकानदारांकडून घेतला जात असल्याची चर्चा सध्या होताना दिसत आहे.जे दुकानदार युरिया विकतात त्यांच्याकडून शेतकऱ्यांना इतर काही वस्तू खरेदीचा आग्रह केला जात असल्यामुळे शेतकऱ्यांच्या खिशाला आणखीनच भार सहन करावा लागत आहे.ग्रामीण भागात विशेष करुन अशा युरिया विक्रेत्यांकडून शेतकऱ्यांची अडवणूक केली जात आहे. युरिया पाहिजे असेल तर इतर लिक्विड स्वरुपातील औषधे खरेदी करा अन्यथा युरियाचा साठा संपला आहे. असेही शेतकऱ्यांना सांगितले जाते. युरियाची गरज असल्यामुळे शेतकरी गयावया करुन थोडेफार इतर साहित्य खरेदी करतो. परंतु जो सर्वसामान्य गरीब शेतकरी आहे त्याला मात्र या अजब-गजब प्रकाराचा मोठा फटका सहन करावा लागतो.

   याहीपुढे जावून वस्तू खरेदी न केल्यास अधिकचे पैसे देवून युरिया खरेदी करावी लागते.तसेच युरिया खरेदीची बिले पण देण्यास टाळाटाळ केली जात आहे.देशाचा अन्नदाता म्हणून बळीराजाला ओळखले जाते. बदललेले हवामान, व पावसाची अनियमितता यामुळे शेतकरी अगदी मेटाकुटीला आला आहे. त्यात हातभार म्हणून शेतकऱ्यांची लूट करणारे खत व औषध विक्रेते असल्याचे दिसून येत आहे. अशा गैरप्रकाराची तक्रार करणेही विनाकारण डोक्याला ताप होत असल्यामुळे शेतकरीही गपचुप युरिया खरेदी करतो; कारण स्वत:च्या हक्कासाठी नियमावर बोट ठेवले की, त्याचा उलटा परिणाम म्हणून परत शेती आवश्यक खते व साहित्यच देण्याची टाळाटाळ केली जाते.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग