सांगोला

   मोठा गाजावाजा करत शासनाने सातबारा ऑनलाईन केले परंतु हे सर्व कामकाज करत असताना मोठ्या प्रमाणात लहानमोठ्या चुका सातबारा अपडेट करताना झाल्या याचा फटकाही अनेक जमीन मालकांना, शेतकऱ्यांना व नागरिकांना सध्या बसत आहे. सरकारी काम सहा महिने थांब अशी सरकारी कामकाजाची पध्दत असताना सांगोला तालुक्यात मात्र सातबारा दुरुस्तीसाठी ""सरकारी काम वारंवार अजून जरा थांबऽऽऽअजून जरा थांब'' असे म्हणत मोठ्याप्रमाणात नागरिकांना हकनाक त्रास दिला जात असल्यामुळे सातबारा स्वत:च्या नावाचा असणेही अनेकांना हाय टेन्शनचे बनले आहे.

   सातबारा ऑनलाईन करत असताना महसूल विभागाकडून संपूर्ण संगणकीकरण करण्यात आले. हे करत असताना अनेकांच्या नावातील चुका, क्षेत्रातील चुका व इतर नोंदीमध्ये प्रचंड  चुका करण्यात आल्या. त्यानंतर विविध कामानिमित्त नागरिकांना सातबारा आवश्यक आहे. सातबारा उतारा पाहिल्यानंतर महसूल विभागाने केलेल्या चुकांमुळे नागरिकांनाच हैराण केले आहे. जमीनीची खरेदी-विक्री करणे, बॅंकेत तारण म्हणून जमीन देणे, तसेच नावे कमी करणे, या व इतर कामांसाठी सातबारा वरील नोंदणी योग्य असणे गरजेचे आहे. त्यामुळे सातबारा वरील बारीक-सारीक चुका या कामासाठी अडचणीच्या ठरत आहेत.

   सातबारा दुरुस्तीसाठी संबंधीत गावचा तलाठी, मंडलाधिकारी, तहसिलदार, यांच्याकडे हेलपाटे मारावे लागत आहे. सातबारा दुरुस्तीचे अधिकार आमच्याकडे नाहीत असे तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडून सांगण्यात येते. तहसिलदार यांच्या अधिकाराखालीच सातबारा दुरुस्ती केली जाते. हे जरी खरे असले तरी सर्व कागदोपत्री प्रक्रिया मात्र तलाठी, मंडलाधिकारी यांच्यामार्फतच केली जाते. अनेकवेळा काहीठिकाणी सेतू कार्यालयातही हेलपाटे मारावे लागत आहे. नागरिकांनी अर्ज दाखल केल्यानंतर सातबारा दुरुस्तीसाठी तलाठी व मंडलाधिकारी यांच्याकडे वारंवार हेलपाटे मारुनही टेबलावरचा कागद हालता हालत नसल्याचे अनेकजण सांगतात.

   सातबारा दुरुस्तीचे काम संगणकाद्वारेच होत असल्यामुळे वेळकाढूपणा म्हणून सर्व्हर डाऊन,इंटरनेट बंद, या व इतर कारणे सांगून सर्वसामान्यांना परत पाठविले जाते. खरे म्हणजे तालुक्यातील बहुतांशी तलाठी, मंडलाधिकारी यांना संगणकीय सातबारा दुरुस्तीचे काम कितपत येते हा संशोधनाचा विषय असून नेमके दुरुस्तीचे काम टाळले का जाते हेही न सुटलेले कोडेच आहे. नागरिकांची कामे चिरीमिरी घेतल्याशिवाय करायची नाहीत की यासारखी कामे येतच नाहीत ही गोष्टीही नक्की विचार करावयाची बाब आहे.

   विशेष करुन सांगोला तलाठी कार्यालयात तलाठी व मंडलाधिकारी यांच्या काम करण्याच्या पध्दतीवर नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी असून सातबारा दुरुस्तीबाबत सांगोला मंडलाधिकारी अनेकवेळा टाळाटाळ करतात अशाही अनुभव अर्जकर्त्यांना आला आहे. तालुक्याच्या ठिकाणी त्यातल्या त्यात तहसील कार्यालयानजीकच असणाऱ्या तलाठी कार्यालयात तलाठी व मंडलाधिकारी नागरिकांना विशेष करुन जेष्ठ नागरिकांना कामासाठी हेलपाटे मारावयास लावतील तर ही बाब नक्कीच स्वच्छ व सुंदर कारभार आहे असे सांगणाऱ्या तहसील कार्यालयास शोभनीय नाही.

अवश्य वाचा

तळोजातील घराला आग