सांगोला

   गेल्या महिन्याभरात सांगोला तालुक्यात चोऱ्यांच्या घटना पाहिल्या असता सांगोला तालुका हा चोरांसाठी सुरक्षित आहे की काय? असा सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. एका बाजूला अवकाळी पावसाने तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांना व नागरिकांना हैराण केले होते तर दुसऱ्या बाजूला चोरांमुळे आता सांगोला तालुक्यातील नागरिक हैराण झाले आहेत. गेल्या काही दिवसापासून चोऱ्यांच्या घटना पाहता भरदिवसा दुचाकी चोरीच्या घटना झालेल्या आहेत. तसेच आठवडा बाजारातही दिवसाच मोबाईल चोरींच्या अनेक घटना घडल्या आहेत. तर रात्रीच्या वेळी घरफोड्याही झालेल्या असल्यामुळे आता चोरही पुर्वीप्रमाणे फक्त नाईट शिफ्ट मध्ये सक्रीय न राहता ""डे-नाईट शिफ्टमध्ये सक्रीय'' असल्याचे दिसून येत आहे.

   दि.10 नोव्हेंबर रोजी आठवडा बाजारातून पुन्हा एकदा मोबाईल चोरींच्या घटनांमुळे सांगोला तालुक्यातील चोरांची अधिक सक्रीयता दिसून आली आहे. दिवाळीच्या अगोदर पासून मोठ्या प्रमाणात मोबाईल चोरीच्या घटना झालेल्या आहेत. मोबाईल चोरीच्या वाढत्या घटना लक्षात घेता अनेकवेळा नागरिक आपला संताप व्यक्त करतात. यापुढे खरी गंमत म्हणजे मोबाईल चोरीची तक्रार सांगोला पोलिस स्टेशनमध्ये द्यावयास गेल्यास ज्या पध्दतीने सांगोला पोलिसांकडून नागरिकांना वागणूक मिळते त्या पध्दतीमुळे तर नागरिकांमधून प्रचंड  संताप व्यक्त केला जात आहे. मोबाईल चोरीस गेला की गहाळ झाला या प्रश्नांमुळे मोबाईलधारकांचा गोंधळ आणखीनच वाढून मोबाईल चोरीस गेल्याच्या दु:खापेक्षा तक्रार द्यावयास गेल्यानंतर मिळणाऱ्या  वागणूकीने दुप्पट मनस्ताप सहन करावा लागतो.

   अनेकवेळा तर तक्रार घ्यावयासही टाळाटाळ केली जात असल्यामुळे मोबाईल धारकांनाही अब जाए तो कहॉं जाए अशा स्थितीला तोंड द्यावे लागते. तर दुसऱ्या बाजूला रहदारीच्या चौकातून व नेहमीच वर्दळ असलेल्या ठिकाणावरुन भर दुपारी दिवसाच मोटार सायकल चोरीच्या घटनेमुळे सांगोला तालुक्यात नक्की सुरक्षित आहे कोण? हे मात्र न उलघडलेले कोडे आहे. ग्रामीण भागातील होणाऱ्या घरफोड्यांमुळे एकप्रकारे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण केले आहे.
दुष्काळामुळे चोऱ्या वाढतात असा जो एक समज आहे तो समज गेल्या काही दोन महिन्या पासून झालेल्या चोऱ्यांच्या घटनेत खोडून निघाला असल्याचे दिसून येत आहे. हजारो किंमतीचे महागडे मोबाईल चोरीस जाण्याच्या घटना होत असल्यामुळे यात नक्की दोष कोणाचा? ही बाब  आत्मचिंतनाचीच असून नागरिकांचे दुर्लक्ष व असावधनता यामुळेही अनेकदा चोरांना आयती संधी मिळते.

   निष्काळजीपणा मुळेही बऱ्याचवेळा मोबाईल चोरीला सामोरे जावे लागतेस. सांगोला पोलिसांकडून मात्र वाढत्या चोरीच्या घटनांकडे फक्त एक सर्वसाधारण घटना म्हणून पाहिले जाते की काय असा उलट सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. तर चोरीच्या तक्रारीचा तपास करण्यासाठी पंचांगात योग्य मुहुर्त शोधला जात तर नाही ना, त्यामुळेच कदाचित झालेल्या चोऱ्यांचा तपास झाला किती, हे मात्र कळता कळेना.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.