सुतारवाडी दि. 9 

 गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली असून सुतारवाडी सह अनेक पंचक्रोशीतील विभागांमध्ये पाऊस पडत नसल्यामुळे अनेकांनी उरले सुरलेले भात पीक कापून आपल्या शेतावरच भाताचे भारे रचून ठेवलेले आहेत. जावटे येथील अनेक शेतकऱ्यांनी जोरदारपणे भात कापणीला सुरुवात केली असून मजुरांचा तुटवडा भासत असून सुद्धा भात कापणीला जोरदारपणे सुरुवात केलेली दिसत आहे. एका मजुराला 430 रु. देऊन सुद्धा मजूर कापणीच्या  कामासाठी मिळत नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांची कुचंबणा होत आहे. आपण आपल्या शेतातील भात कापणी केली नाही तर अचानक पणे येणाऱ्या पावसाच्या आगमनामुळे आपले कसे होणार या विवंचनेत शेतकरी वर्ग आहे. गणपतीसण भर पावसात गेला, गोविंदा सण सुद्धा पावसातच गेला आणि दिवाळीसारखा आनंदाचा मोठा सण जोरदार पावसात गेला त्यामुळे अनेक शेतकर्‍यांचे अतोनात नुकसान झाले. जावटे परिसरामध्ये भात शेती बरोबर तिळाचे पीक ही घेतले जाते. जोरदार पावसामुळे तीळाचे पिक अक्षरशः जमिनीला झुकले. भात पिका बरोबर तीळाच्या पिकाचेही नुकसान झाले. त्यामुळे यावर्षी तीळ कमी प्रमाणावर चाखायला मिळणार आहेत. या वर्षी पावसाने गिनीज बुकात नोंद व्हावी अशाप्रकारे पडत राहिला आणि अनेक शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला. आणि आता परतीचा प्रवास करण्याच्या मार्गावर आहे, तोसुद्धा तब्बल सहा महिन्यानंतर.

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.