पनवेल, दि.8 

गेल्या काही दिवसापासून महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. राज्यातील नाशिक, रायगड, परभणी, नांदेड, लातूर, बिड, जालना, अकोला, औरंगाबाद, सांगली, सातारा नगर, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, रत्नागिरी, सोलापूर या 17 जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे करोडोचे नुकसान झाले आहे. त्याचप्रमाणे बँकांची दिवाळी खोरी व देशात असलेली आर्थिक मंदी याबाबत भाजप सरकारने तात्काळ उपाय योजना करावी अशी मागणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये केली आहे.

या पत्रकार परिषदेला कामगार नेते महेंद्र घरत, पनवेल शहर जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटील, पनवेल  ता. काँ.अध्यक्ष श्री. महादेव काटेकर, उपसभापती वसंत काठावले, मा. जि. प. अध्यक्ष. अनंत पाटील, शशिकांत बांदोडकर, मोहन गायकवाड, नौफिक सय्यद, मोरे युवा अध्यक्ष - हेमराज म्हात्रे , महिला अध्यक्षा निर्मला म्हात्रे, डी. एस. सेठी , त्रिंबक केणी, महिला जिल्हा उपाध्यक्षा - शशिकला सिंग आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष आर.सी.घरत यांनी सांगितले की, शेतकर्‍यांना वार्‍यावर न सोेडता त्यांना तात्काळ हेक्टरी नुकसान भरपाई जाहीर करावी. बँकांतील दिवाळखोरी संदर्भात मोठ्या प्रमाणात फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. याबाबत उपाय योजना कराव्यात. देशात सध्या आर्थिक मंदीचे वातावरण आहे. अनेक उद्योगधंदे बंद पडलेले आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले आहे. यासाठी ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच वाढती बेरोजगारी, आरोग्याचा प्रश्‍न, पाण्याचा प्रश्‍न आदी संदर्भात शासनाने योग्य मार्ग काढावा व नुकसान झालेल्यांना भरपाई द्यावी अशी मागणी सुद्धा आर.सी.घरत यांनी केली आहे. त्याचप्रमाणे सिडकोने सुद्धा स्थानिक प्रश्‍नावर लक्ष घालून भूमीपुत्र प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून द्यावा असे त्यांनी सांगितले आहे. या संदर्भात त्यांनी शासनाला निवेदन देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली