चिपळूण 

लोकांनी निसर्गातला चमत्कार बघावा, अशी जंगलात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. या भागात सह्याद्री टायगर रिझर्व्ह होतोय. हा प्रकल्प चिपळूणच्या जवळ आहे. जंगल वाचविण्याकरिता प्रयत्न व्हायला हवेत. जंगल हे चालत चालत बघायचं नसतं तर जंगल बघत बघत चालायचं असतं आणि हे जंगलात सातत्याने चालायला लागल्यावर समजतं. झाडाच्या मुळापासून शेंड्यापर्यंत घडणाऱ्या हालचाली वर्तमानपत्रासारख्या वाचता यायला हव्यात. नुसता पेपर चाळलात तर जंगलं आणि त्यातल्या गमतीजमती समजणार नाहीत. जंगल वाचायचे, वाचवायचे असेल तर जंगलाच्या जवळ राहणाऱ्या लोकांच्या सानिध्यात जायला हवे असे स्पष्ट प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे यांच्या प्रेरणेतून कार्यरत असलेल्या, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ या संस्थेचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई सयुंक्त विद्यमाने आयोजित ४ थ्या पर्यावरण संमेलनाच्या चौथ्या सत्रात ‘सह्याद्रीतील वैविध्यता’ या विषयावर बोलताना नामवंत वन्यजीव अभ्यासक, निसर्गसेवक आऊटडोअर्स या संस्थेचे डायरेक्टर निलेश बापट यांनी केले.

सत्र सूत्रसंचालनकर्ते, संमेलनाचे निमंत्रक धीरज वाटेकर यांनी बापट यांचा परिचय करून दिला. निलेश बापट हे गेली २५ हून अधिक वर्षे सह्याद्रीत डोळस भटकंती करीत आहेत. भारतासह, भूतान, नेपाळ येथील जंगलांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. निसर्ग अभ्यास सहली, किल्ले, जंगलवाटा हे त्यांचे आवडीचे विषय होत. यावेळी बापट यांना मंडळाच्यावतीने वृक्षमित्र आबासाहेब मोरे आणि स्वागताध्यक्ष श्रीराम रेडीज यांच्या उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. बोलताना बापट यांनी सुरुवातीला, कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत आमच्या सारख्या जंगलात काम करणाऱ्या अभ्यासकांना, पर्यटक आल्यानंतर त्यांना सहज माहिती देण्यासाठी आवश्यक असलेली थिएटर सुविधा, बसायला जागा उपलब्ध नसल्याचे सांगून खंत व्यक्त केली. असे असले तरीही तरीही इथली पोरं हुशार आहेत. पदरमोड करून हे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती आणि ज्ञान यात फरक आहे. अनुभव महत्वाचा आहे. माहितीच्या आधारे आज निसर्गावर लिहिलं जातंय, प्रत्यक्षात निसर्गात काहीतरी वेगळ घडत आहे. असे सांगून, ‘निसर्गासाठी जर काही करायचे असेल तर ते मलाच केले पाहिजे’ अशी शपथ त्यांनी उपस्थितांना दिली. अशा कार्यक्रमांना वय ४०/५०च्या पुढची लोकं असतात. तरुण मुलं कमी असतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धन यशस्वी होट नाही. आजही पर्यावरणात काम करणाऱ्या मुलांची संख्या हजारी दहा इतकीच आहे. आमच्यासोबत काम केलेली मुलं आज कोळ्यांवर, मुंग्यांवर संशोधन करतात. अंदमान सारख्या भागात जाऊन जारव्हा नावाच्या मुंगीवर काम करतात. टिटवीच्या डोळ्याला झालेल्या मोतीबिंदूवर उपाययोजना करताना पाहून समाधान वाटतं असं ते म्हणाले.

आम्ही टूर ऑपरेटर नाही. आम्ही जंगल, जैवविविधता समजावून सांगतो. सह्याद्रीत वैविध्यता सर्वत्र आहे. चिपळूणची स्थिती बेसिनसारखी आहे. शहराला चारही बाजूने डोंगर आहे, घाट आहेत. चिपळूण हा गुजरात ते केरळ दरम्यानचा सह्याद्रीचा तुकडा आहे. महाबळेश्वर ते आंबा घाट असे कोयना जंगल आहे. पुढे चांदोली अभयारण्य आहे. ही दोन्ही जंगले सह्याद्री टायगर रिझर्व्ह अंतर्गत आहेत. यातल्या काही भागात जायला सध्या बंदी आहे. कोयना जलाशयात खूप माश्यांच्या जाती आहेत. सह्याद्रीत पूर्वी आम्ही डॉक्टरांची टीम नेऊन लोकांची तपासणी करायचो. कारण हेच की सह्याद्रीत माणसं राहायला हवीत. तेव्हा ती लोकं प्राणी मारून खायची. त्यांना जीवनसत्व कमी पडायची. आम्ही त्यांना बीयाणे दिली. त्यांनी त्याची लागवड झाली. आता लोकं यातून चांगुलपणाने बाहेर आलीत. आपण माणसाने जंगलासाठी, बाहेर राहून काम केलं पाहिजे. उन्हाळ्यात पाणी खाली जातं, डोंगर रिकामे होतात. आपण शासनाच्या मदतीने पाणवठ्याचे काम सुरु केले. प्राणी अधिक खाली जाऊ शकत नाहीत. त्यांचे शत्रू वाढतात. प्रयोगशाळेत वापरल्या जाणाऱ्या लिटमस पेपरच्या कार्याप्रमाणे पक्षांना निसर्गातील बदल लवकर कळतात. पक्षी बघणं आणि निरीक्षण करणं ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. पक्षी लिटमस पेपरसारखे अॅक्ट होतात. त्यांचा अधिवास गेल्याने अडचणी वाढतात. आपल्याकडे साफसफाई करणारे काही पक्षी आहेत. शक्यतो सुगरण पक्ष्याचे घरटे घरात ‘शो’साठी आणून लावू नका. एका पक्षाने सोडलेले घरट्याचे वेस्ट मटेरीअल हे दुसऱ्यासाठी बेस्ट मटेरीअल असते. जंगलातून फक्त आठवणी घेऊन बाहेर येत चला ! असे ते म्हणाले.

यावेळी पक्षांच्या पाय, चोचींचे प्रकार त्यांनी मांडले. वळचणीच्या जागा कमी झाल्या म्हणून चिमण्या कमी झाल्या. आपण टाकलेल्या कचऱ्यामुळे पक्षांच्या पायांना रोग झालेले आहेत. पक्षांचा पंखावर विश्वास असतो. तो सकाळी पंख साफ करतो. ते दिवसातून तीन वेळा अंघोळ करतात. खेडेगावातील लोकं आपल्या ज्ञानाप्रमाणे पक्षांना नावे देतात. ‘भारद्वाज’ला विदर्भात याला ‘नपिता’ म्हणतात. आपण नावासाठी शास्त्रीय आग्रह धरायला हवा असे बापट म्हणाले. यावेळी बापट यांनी स्लाईड शो द्वारे अनेक पक्षांविषयी माहिती दिली.   

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली