सांगोला

गेल्या दोन ते तीन वर्षापासून सतत दुष्काळाने होरपळत असलेल्या सांगोला तालुक्यात यंदाही पावसाने मोठ्याप्रमाणात ओढ दिल्याने पावसाळा मध्यावर येत असतानाही जनावरे चारा छावणीतील चाऱ्यावरच जगत होती. त्यानंतर माण, बेलवण, आफ्रुका, कोरडा, नदी पाणलोट क्षेत्रात पावसाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील या सर्व नद्या पाण्याने भरभरुन वाहू लागल्या. त्याचबरोबर पावसाळा संपण्याच्या स्थितीत असताना वरुणराजाच्या ""मी पुन्हा येईनऽऽऽपुन्हा येईन'' च्या भूमिकेमुळे बळीराजा संकटात सापडला आहे. आपला परतीचा नव्हे तर आगमनाचाच मौसम असल्याचे दाखवत अद्यापही तळ ठोकला असल्याचे दिसून येत आहे.

सर्वसाधारणपणे दीपावली नंतर पाऊस क्वचितच कधीतर येत असतो परंतु; यंदा दीपावलीच्या पणत्यांवरच वरुणराजाच्या आगमनाचे संकट निर्माण झाले असल्याचे दिसून आले. दीपावली झाली तरीही सांगोला तालुक्यातील अनेक भागात वीजांच्या गडगडाटासह वरुणराजा आपण पावसाळा संपला तरीही हजरच असल्याचे दाखवून देत आहे. या वरुणराजाच्या बदलेल्या वेळापत्रकामुळे शेतीच्या अर्थकारणाचे मोठ्या प्रमाणात गणित बिघडले असून दुष्काळाने टाहो फोडणाऱ्या सांगोला तालुक्यातील शेतीच्या अर्थव्यवस्थेवर वेगळेच संकट निर्माण झाले आहे. याचा फटका परत एकदा दुष्काळाची झळ सोसलेल्या बळीराजाला बसणार असून ओल्या दुष्काळाने शेतकऱ्यांना आणखीनच अडचणीत आणले आहे.

अतिवृष्टीमुळे सांगोला तालुक्यात 35 गावातील 282.99 हेक्टर (33%)पेक्षा जास्त क्षेत्र बाधीत झाले असल्याचे बोलले जात आहे तर 156.9 हेक्टर इतक्या क्षेत्रावरील पीकांचे पंचनामे सध्या पूर्ण झाले आहे. तालुक्यातील महूद मंडलमधील नऊ गावातील 120 शेतकऱ्यांचे 71.60, शिवणे मंडल मधील 2 गावातील 29 शेतकऱ्यांचे 34.40, कोळा मंडलातील 6 गावातील 219 शेतकऱ्यांचे 94.10, नाझरा मंडलातील 7 गावातील 42 शेतकऱ्यांचे 34.60, संगेवाडी मंडलमधील 3 गावातील 15 शेतकऱ्यांचे 10.30, सोनंद मंडलमधील 3 गावातील 17 शेतकऱ्यांचे 11.89, हातीद मंडलमधील 5 गावातील 45 शेतकऱ्यांचे 26.10 हेक्टर, असे एकूण 7 मंडलमधील 35 गावातील 487 शेतकऱ्यांना 282.99 हेक्टर क्षेत्रातील नुकसान झाले आहे.

दुष्काळी भाग म्हणून परिचीत असलेल्या तालुक्यात शेतीच्या पाण्याबरोबरच पिण्याच्या पाण्याचेही मोठ्या प्रमाणात टंचाई होती. बघता-बघता परतीच्या पावसाचे झालेले अनपेक्षित दमदार आगमन आणि तालुक्यातून वाहणाऱ्या सर्व नद्यांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे नद्या व नाले सध्या तुडुंब भरुन वाहत आहेत. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात अद्यापही पाणी साठलेले दिसून येत आहे. ज्या शेतात पाण्याचे दुर्भीक्ष होते त्याच शेतातून आता पाण्याचा निचराही लवकर होताना दिसत नाही.

पावसाची जेव्हा खऱ्या अर्थाने गरज होती तेव्हा येरेऽऽऽयेरेऽऽऽपावसाऽऽऽतुला देतो पैसाऽऽऽअसे म्हणावयाची वेळ आली होती. परंतु परतीच्या  पावसामुळे जारेऽऽऽजारेऽऽऽपावसाऽऽऽपुरे झाले आता नको बरसू. असेच म्हणायची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. पावसाळ्याचे बदललेल्या वेळापत्रकाने शेतीचेही अर्थकारण अक्षरश: बदलून टाकले आहे.  शेतीचा जुगार म्हणतात कशाला याचा प्रत्यय यंदा दिसून येत आहे.आमचे तालुका प्रतिनिधी नविद पठाण यांच्या बोलताना शेतकरी सांगत आहेत.

अवश्य वाचा