सांगोला

संपूर्ण देशभर गाजावाजा करुन स्वच्छतेचा नारा देत स्वच्छ सर्वेक्षण अभियान सुरु करण्यात आले. या अभियानात सांगोला नगरपालिकेने गेल्या वर्षी चांगली कामगिरी करत बक्षिसही मिळविले. यामुळे शहरातील बहुतांशी भागात स्वच्छतेचा नारा यशस्वी झाल्याचे दिसू लागले. ज्या-ज्या परिसरात व भागात अस्वच्छता होती तो परिसर स्वच्छ आणि सुंदर होवू लागल्यामुळे नागरिकांनी स्वच्छ सर्वेक्षणात नगरपालिकेला भरभरुन सहकार्य केले. त्याच सांगोला नगरपालिकेकडून नागरिकांच्या सहकार्याची परतफेड म्हणून सध्या पिण्याचे पाणी अत्यंत  घाण व गढूळ दिले जात आहे की काय, असा उलट सवाल उपस्थित करुन नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना पटत असल्यामुळे त्यांनी परिसर स्वच्छतेला अधिक सहकार्य केले. या स्वच्छ सर्वेक्षणात ज्या-ज्या लोकांनी सहकार्य केले नाही त्या लोकांवर नगरपालिकेने कठोर कारवाईही केली. परंतु गेल्या  काही महिन्यापासून फक्त सांगोला नगरपालिकाच घाण गाळयुक्त पाणी मीटर कनेक्शनद्वारे नागरिकांना पिण्यासाठी पुरवत आहे. या अजब-गजब कारभारामुळे परिसर स्वच्छतेला महत्त्व देणाऱ्या नगरपालिकेकडून घाण पाणी पुरवठा केला जात असल्यामुळे न.पा.प्रशासनातील हा  स्वच्छतेचा पोकळ नारा दिसून येत आहे.

प्रत्येकाच्या घरासमोरुन तर व्यापारी दुकानदाराकडूनही कचरा गोळा करण्याचे काम नगरपालिका करत आहे. याउलट अशुध्द पाणीपुरवठा करुन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळण्याचा प्रकार केला जात असल्यामुळे सध्या शहरात मोठ्या प्रमाणात महिला वर्गामधून पाण्याबाबत मोठा संताप व्यक्त होत आहे. पाण्याची बचत व्हावी म्हणून अनेकवेळा नागरिकांनीच नगरपालिकेला सहकार्य करुन मीटर बसवणे, पाण्याचा तुटवडा असणाऱ्या कालावधीत पाण्याचा योग्य वापर करणे, पाणीपट्टी लवकर भरुन नगरपालिकेला सहकार्य करणे, याद्वारे आजपर्यंत सांगोला शहरातील नागरिकांनी नगरपालिकेस भरभरुन कर रुपाने पैसा दिलेला आहे. त्यामुळे शुध्द पिण्याचे पाणी मिळणे अपेक्षीत असणे योग्यच आहे. नगरपालिकेच्या कारभाराबाबत नागरिकांमधून दिवसेंदिवस संताप व्यक्त केला जात आहे.

नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत नगरपालिकेतील सर्वच नगरसेवक आपापल्या  उमेदवाराचा प्रचार करण्यामध्ये व्यस्त होते. आम्हीच विकास केला आणि आम्हीच विकास करु अशा विकासाच्या थापा मरीत फिरणारे नगरपालिकेतील लोकांनीच निवडून दिलेले नगरसेवक शहरातील रस्ते व पाणी याबाबत मात्र डोळेझाक का करत आहेत, असाही सवाल नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. एका बाजूला स्वच्छ सांगोला शहर करा, असे प्रचार करणाऱ्या नगरपालिकेकडून मात्र दुसऱ्या बाजूला सरळ नागरिकांच्या घशातच घाण पाणी दिले जात असल्यामुळे नागरिकांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.