सांगोला

विधानसभा निवडणूकी नंतर येवू घातलेल्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या मतदार नोंदणीबाबत अपेक्षित तेवढ्या प्रमाणात जनजागृती झाली नसल्यामुळे इतर निवडणूकांच्या मतदार नोंदणीपेक्षा पदवीधर मतदार नोंदणीस थंड प्रतिसाद मिळत असल्याचे सध्या दिसून येत आहे. यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणात याबाबतही जनजागृती करणे गरजेचे असून मतदार नोंदणी बाबतची मुदत 6 नोव्हेंबर इतकी आहे. तरी अधिकाधिक पदवीधरांची नोंदणी होण्यासाठी आणखीन मुदतवाढ मिळावी अशी मागणी पदवीधरांमधून होत आहे.

वास्तविक पाहता पदवीधर मतदार संघ, पदवीधर मतदान त्याचे महत्त्व याविषयी आजही जनमाणसात फारसा प्रचार व प्रसार नाही. साहजिकच ग्रामपंचायत निवडणूक, विधानसभा-लोकसभा यासारख्या इतर निवडणूकीप्रमाणे पदवीधर मतदार संघ निवडणूकीबद्दल फारसी उत्सुकता दिसून येत नाही. बहुतांशी सुशिक्षित बेकार व पदवीधरांना अद्यापही आपल्या मतदानाचे महत्त्व फारसे माहितही नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तसे पाहता सुशिक्षित पदवीधर व्यक्ती देशाच्या विकासात मोठा सहभाग नोंदवू शकते. बेकारीसारखा मोठा प्रश्न  आज प्रत्येकाला भेडसावत असताना पदवीधर सुशिक्षित लोकांच्या विविध समस्या सरकार दरबारी मांडण्यासाठी पदवीधर मतदारांमधून प्रतिनिधी म्हणून आमदार निवडून दिला जातो.

शिक्षणाचा प्रचार व प्रसार झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात पदवीधरांची संख्या वाढत आहे. या सुशिक्षित असणाऱ्या मतदाराला आपला प्रतिनिधी निवडण्याचा हक्क आहे आणि हा हक्क बजावणे कर्तव्यच असून याबाबतची जागृती मोठ्या प्रमाणात करणे गरजेचे आहे. बेकारीसारखा न सुटणारा प्रश्न दिवसेंदिवस आणखीनच  तीव्र स्वरुप धारण करत आहे. शिक्षण घेवून  पदवी प्रमाणपत्र हाती घेवून उपयोग काय असा सवाल सुशिक्षित बेकारांमधून उपस्थित केला जात आहे. आजपर्यंत पदवीधरांच्या अनेक समस्या सोडवण्याचा प्रयत्न अनेकांनी केला खरा परंतु; ज्या तीव्रतेने हा प्रश्न सोडवणे अपेक्षित होते त्यातही सरकारी थंड कारभारामुळे मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेकारामध्ये रोष आहे.

सध्या पुणे पदवीधर मतदार संघासाठी मतदार नोंदणी अभियान सुरु आहे. ग्रामीण भागातील पदवीधर लोकांपर्यंत या अभियानाची माहिती अजूनही व्यवस्थितपणे पोहचली नाही. त्यामुळे पदवीधर मतदार नोंदणीसाठी अपेक्षित असा प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता इतर निवडणूकांप्रमाणेच याही निवडणूकीतील मतदार नोंदणीत आणखीन सुधारणा करणे गरजेचे आहेच. त्याचबरोबर प्रत्येक निवडणूकीच्या अगोदर पुन्हा नोंदणी करावी लागत असल्यामुळे अनेक पदवीधर मोठ्याप्रमाणात नाव नोंदणी करत नाहीत. त्यासाठी विद्यापीठातूनच पदवी घेतलेल्या विद्यार्थ्यांना सरळ नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देणे गरजेचे आहे.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.