अलिबाग 

अतिवृष्टीमुळे 2017 मध्ये नुकसान झालेल्या शेतकऱ्याच्या भातपिकाचे सवा चार कोटी रुपये निधी अलिबाग तहसील कार्यालयाकडे प्राप्त झाला आहे. अलिबाग तालुक्यातील 22500 शेतकऱ्यांपैकी 7 हजार शेतकऱ्यांनीचा अजूनपर्यंत आपली बँकेच्या खात्याची आणि आधारकार्डची माहिती दिली असून 15500 शेतकऱ्यांनी अद्याप बँकेची आणि आधारकार्डची माहिती दिलेली नाही त्या शेतकऱ्यांनी आणि जुलै ऑगस्ट 2019 मध्ये झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले असून ज्याचे पंचनामे झालेले नाहीत त्यांनी बँकेच्या माहितीसह कागदपत्रे महसूल कर्मचाऱ्यांकडे जमा करावीत असे आवाहन अलिबाग तहसीलदार सचिन शेजाळ यांनी शेतकऱ्यांना केले आहे.

2017 साली जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्याच्या भात पिकांचे अतोनात नुकसान झालेले होते. त्यावेळी महसूल विभागाकडून नुकसानग्रस्त भातशेतीचे पंचनामे करण्यात आलेले होते. शासनाकडून नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जाहीर करून निधी जिल्हा प्रशासनाकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली होती. मात्र तरीही अजून 22500 शेतकरी बँक खात्याची माहिती न दिल्याने नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत.

22500 शेतकऱ्यांपैकी 7 हजार शेतकऱ्यांनी आपली बँक माहिती तहसील कार्यालयात दिली आहे. तर उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरच आपली माहिती तलाठी, कृषी सेवक, ग्रामसेवक यांच्याकडे द्यावी असे आवाहन तहसीलदार शेजाळ यांनी केले आहे. जुलै, ऑगस्ट 2019 मध्ये अतिवृष्टीने झालेल्या 5 हेक्टर भातपिकाचे पंचनामे पूर्ण झाले असून ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेले नाहीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क करून आपली बँकेची माहितीही द्या असे आवाहनही शेजाळ यांनी केले आहे. तसेच प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी सुचना फलकावर प्रसिद्ध केली असल्याचे शेजाळ यांनी सांगितले.

2017 साली नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांपैकी 25 टक्के शेतकरी यांच्या नावाने असलेली भातशेती ही कौटुंबिक सामूहिक असल्याने निधी वाटपात अडचणी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपापसात विचारविनिमय करून आलेला निधी प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. अन्यथा नुकसानीचा आलेला निधी हा असाच शिल्लक राहू शकतो.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली