अलिबाग 

लोकांनी यांना काम करण्यासाठी निवडून दिले आहे नौटंकी करण्यासाठी नाही. नौटंकी बंद करुन सत्ता स्थापन करा आणि संकटात सापडलेल्या शेतकर्‍यांना न्याय द्या असा टोला वजा सुचना भाजपा शिवसेनेला शेतकरी कामगार पक्षाचे नेते माजी आमदार पंडितशेठ पाटील यांनी लगावला आहे.

या संदर्भात पंडीत पाटील यांनी कृषीवलजवळ बोलताना भाजपा आणि शिवसेनेच्या सद्यस्थितीबाबत चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, भाजपा आणि शिवसेना यांनी युती करुन निवडणूक लढवली. महाराष्ट्रातील जनतेनेही युतीला बहूमत देऊन कौल दिला आहे. असे असतानाही शेतकरी अडचणीत असताना देखील दोन्ही पक्ष जनतेला वेठीस धरत आहेत. तसेच शिवसेना नेहमीप्रमाणे नाटकीपणे शेतकर्‍यांचा पुळका दाखवित राज्यपालांना भेटायला जाते. मात्र आज इतके दिवस होऊन गेले तरी दोन्ही पक्ष सरकार स्थापन करीत नाहीत. नौटंकी करीत शेतकर्‍यांचा पुळका घेऊन जनतेची किती फसवणूक करणारे भाजपा शिवसेना पक्ष जनतेची थट्टी तरी किती दिवस करणार आहेत असा सवालही पंडीत पाटील यांनी केला आहे.

शेतकर्‍यांच्या नुकसान भरपाईबाबत यांना काही देणे घेणे नाही तर यांना फक्त सत्ता कशी मिळेल याचीच चिंता असल्याचा आरोप करताना लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे ना मग तुम्ही आता जनतेची सेवा करा नौटंकी कशाला करता असा सल्ला देतानाच महाराष्ट्रातील शेतकरी मोठया अडचणीत सापडला आहे. निवडणूकीचा निकाल लागून आज आठ दिवस ओलांडले तात्काळ सरकार स्थापन करुन शेतकर्‍यांना न्याय दयायला हवा होता. अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक कशाला करता? मागच्या वेळी देखील शिवसेनेने अशीच नौटंकी केली होती. शेतकर्‍यांसाठी विरोधी पक्षनेते पद घेऊन मग सत्तेत वाटा भेटल्यावर परत पाच वर्षे ते गेले. त्यामुळे आता नौटंकी बंद करुन सरकार स्थापन करा आणि निदान संकटात सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्‍याला न्याय द्या असे आवाहन पंडीत पाटील यांनी केले आहे.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली