पंढरपूर

अख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीलेल्या पंढरपूर मंगळवेढा मतदार संघात राष्ट्रवादीचे उमेदवार व काँग्रेसचे गतवेळचे आमदार भारत भालके यांनी सलग तिसऱ्यांदा वेगळ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवत विजय साकार करत इतिहास रचला आहे.सुरुवातीपासूनच हा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो.त्यातच सुरुवातीपासूनच या मतदारसंघात कोणत्याही पक्षाने आपले उमेदवार व उमेदवारांनी कोणत्या पक्षाकडून लढणार भूमिका स्पष्ट न केल्याने या मतदारसंघात मोठी संदिग्धता निर्माण झाली होती.निवडणूका अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्या असतानाही उमेदवारांची भूमिका स्पष्ट न झाल्याने रंगत वाढत गेली होती.२००९ साली स्वाभीमानी पक्षाच्या व गेल्यावेळी काँग्रेसच्या चिन्हावर लढणाऱ्या आ. भारत भालकेंनी यंदा सलग चौथ्यांदा पक्षबदल करत राष्ट्रवादीच्या घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवण्याची घोषणा निवडणुकीला अगदी दोनेक आठवडे शिल्लक असताना केली होती. त्याच वेळी भाजपानेही सावध चाल खेळत पाच वेळचे राष्ट्रवादीचे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांना उमेदवारी दिली होती. त्यामुळे पंढरपुरात भालके यांना विजयासाठी संघर्ष करावा लागेल आणि पंत युतीसाठी काहीतरी करिष्मा करून विजयश्री खेचून आणतील असे अंदाज बांधले जात होते.त्याच बरोबर अपक्ष उमेदवार समाधान आवताडे यांनी यावेळी प्रचारात मोठा जोर लावल्याने त्यांचा फटका भालकेंना बसेल अशी शक्यताही अनेकांनी व्यक्त केली होती. मात्र या सगळ्यावर मात करत आ.भारत भालके यांनी गेल्या वेळेपेक्षा मोठ्या फरकाने विजय मिळवत आपणच या मतदारसंघाची खरे लोकनेते आहोत हे पुन्हा एकदा सिद्ध केले आहे.

काल सकाळी साडेआठच्या सुमारास मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर भालकेंनी सुरवातीपासूनच घेतलेली आघाडी टिकवत व त्यात सातत्याने वाढ होत गेल्याने त्यांनी तब्बल 13 हजारापेक्षा अधिक मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवारावर सुधाकर परिचारक यांच्यावर मात करण्याचा करिष्मा साधला आहे.भालके व परिचारक यांची उमेदवारी घोषीत झाली त्यावेळी निवडणूक अतिशय रंगतदार होईल व भालके यांना ही निवडणूक जड जाईल अशी अनेकांनी व्यक्ती केली असतानाही भालकेंनी एक हाती विजय मिळवत विजयाची हॅट्ट्रिक पूर्ण करण्याचा मान काल मिळवला. अगदी परिचारिकांचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या पंढरपूर शहरानेही भालकेंना अनपेक्षितपणे कौल देत प्रस्थापितांना मोठा धक्का दिला आणि त्याचवेळी भालके मोठ्या मताधिक्क्याने विजयी होणार हे जवळपास निश्चित झाले होते.त्यातच मंगळवेढ्यातील जनतेनेही भालकेंनी आजवर केलेल्या मदतीची व विकासाची परत फेड म्हणून अपेक्षेपेक्षा भरघोस मतदान केल्याने भालकेंनी विक्रमी मताधिक्याने विजय साकार करत भालकेंच्या प्रचारार्थ पवारांच्या सभेच्या वेळी जमलेली अफाट गर्दी म्हणजे भाऊगर्दी म्हणून हिनवणाऱ्या अनेकांना एकप्रकारे चपराक दिली आहे.

सर्वस्व पणाला लावून भालके ही निवडणूक लढवत होते. त्यामुळे त्यांच्यासाठी ही निवडणूक अस्तित्वाची समजली जात होती.त्यातच आपल्या कारखान्याला अडचणीतुन बाहेर काढण्यासाठीही भालकेंना हा विजय नक्किच प्रेरणादायी ठरणार आहे.या विजयामुळे भालकेंनी परिचारक गटाला पुन्हा एकदा मोठा धक्का देत त्याच्या राजकीय अस्तित्वावरच घाला घातला आहे असे म्हणता येईल.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली