सांगोला

  शेतकरी कामगार पक्ष हा सर्वसामान्य, गोरगरिब, शेतकरी व कष्टकऱ्यांचा पक्ष आहे. समाजातील सर्व घटकांना सोबत घेवूनच आजपर्यंत दुष्काळी भागाचे नेतृत्व केले. गेल्या 55 वर्षात सांगोला तालुक्याने भरभरुन प्रेम दिले. विकासाचा गाडा अधिक गतीमान करण्यासाठी आणि प्रत्येक गावातील तळागाळातील सामान्य व्यक्तीला व सर्वांना सोबत घेवून चौफेर विकास करण्यासाठी डॉ.अनिकेत देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन आ.गणपतराव देशमुख यांनी केले.

शेतकरी कामगार पक्ष-राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस(आय) व मित्रपक्ष या महाआघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ.अनिकेत चंद्रकांत देशमुख यांच्या प्रचाराची सभा सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे संपन्न झाली. यावेळी, आ.गणपतराव देशमुख बोलत होते. व्यासपीठावर कॉंग्रेसचे विधानपरिषद सदस्य आ.रामहरी रुपनवर, प्रा.पी.सी.झपके सर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंढरपूर तालुकाध्यक्ष दीपक पवार, ऍड.बंडू काशिद, श्री.नंदु शिंदे, चेअरमन नानासाहेब लिगाडे, चेअरमन गिरीष गंगथडे, नगरसेवक सुरज बनसोडे, समाधान फाटे, डॉ.प्रभाकर माळी, माजी नगरसेवक शिवाजीनाना बनकर, मारुतीआबा बनकर, बाळासाहेब एरंडे, अरुण बोत्रे, राहुल दुधाळ ,अजित करांडे,नविद पठाण यांच्यासह महाआघाडीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे बोलत असताना आ.गणपतराव देशमुख म्हणाले, लवकरच सांगोला तालुका हा दुष्काळमुक्त होणार आहे. 20 जून 2020 अखेर तालुक्याच्या पाण्याच्या सर्व योजना पूर्ण करण्याचे केंद्रशासनाने निर्देश दिलेले आहेत. त्यामुळे दुष्काळमुक्त सांगोला तालुका होणारच आहे. उर्वरीत पाण्याचे प्रश्न व तरुणांचा बेरोजगारीचा प्रश्न सोडविण्यासाठी ते नक्कीच प्रयत्न करतील याची मला शंभर टक्के हमी असून  तालुक्याचे उर्वरीत प्रश्न सोडविण्यासाठी डॉ.अनिकेत देशमुख यांना विजयी करावे. असे आवाहन आ.गणपतराव देशमुख यांनी केले.

राष्ट्रीय कॉंग्रेसचे जेष्ठ नेते प्रा.प्रबुध्दचंद्र झपके म्हणाले की, कॉंग्रेस पक्ष हा आघाडी धर्म पाळणारा पक्ष आहे. आमच्याकडून नेहमीच आघाडीधर्म पाळला जातो, इतरांसारखे आघाडीधर्म मोडणारे आम्ही नाही, असे सांगत त्यांनी कॉंग्रेसच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन केले की त्यांनी डॉ.अनिकेत देशमुख यांच्या विजयासाठी जोरात प्रयत्न करावेत. आ.गणपतराव देशमुख हे कायम आघाडीचा धर्म पाळणारे शब्दनिष्ठ राजकारणी असून त्यांनी अनेकवेळा आघाडीचा धर्म कसा पाळला याचे उदाहरण सांगितले की, कॉंग्रेसचे फक्त चार नगरसेवक असताना नगराध्यक्षपद कॉंग्रेसलाच दिले. लोकांनी आजपर्यंत धर्मवादी पक्षाला सांगोला तालुक्यात थारा दिला नाही. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना संधी दिल्यास तालुक्याचे भविष्य आंधारात राहण्याची भीती व्यक्त करीत या निवडणूकीमध्ये जातीय धर्मवादी पक्षाला थारा न देता पुरोगामी विचाराचे नेतृत्व, सुशिक्षित, उच्च विद्या विभूषित डॉ.अनिकेत देशमुख यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

नगरसेवक सुरज बनसोडे म्हणाले की, गेल्या 55 वर्षामध्ये आ.गणपतराव देशमुख यांनी तालुक्यामध्ये शांतता ठेवली आहे. ज्या-ज्यावेळेस दोन गटामध्ये वाद-विवाद झाले त्या-त्यावेळी आ.गणपतराव  देशमुख यांनी दोन्ही गटातील लोकांना समजावून सांगत वाद-विवाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला. गोरगरिबांवर अन्याय होणार नाही याची काळजी आबासाहेबांनी नेहमीच घेतलेली आहे. तालुक्यात सध्या जातीयवादी लोक समाजाच्या जीवावरती भांडवल करत असून जाती-जातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सध्याची विधानसभा निवडणूकही फक्त  राजकीय लढाई नसून गोरगरिब, सर्वसामान्य, दिनदलितांच्या अस्तित्वाची लढाई असल्याचे सांगत आजपर्यंतच्या  काळात विरोधकांनी विकासाच्या आड राहून राजकारण केले आहे.  सांगोला तालुक्यातील सर्व समाजामध्ये जातीय सलोखा, शांतता व एकोपा टिकविण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष  व मित्रपक्षाचे डॉ.अनिकेत देशमुख यांना विजयी करावे असे आवाहन  त्यांनी केले. 

ऍड.बंडु काशिद म्हणाले, मतदारांनी विरोधकांच्या थापांना बळी न पडता जागृत राहून मतदान करावे. विरोधक आजपर्यंत विकासावर न बोलता टीका-टिपण्णीवरच जास्त बोलत आहेत. यामुळे विरोधकांकडे लक्ष न देता शांतता, सुव्यवस्था, एकोपा टिकविण्यासाठी आ.गणपतराव देशमुख यांच्या मागे उभे राहाणे गरजेचे आहे. भारताचे माजी कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार व तुमचे आमचे भाग्यविधाते आ.गणपतराव देशमुख ही भारताच्या इतिहासातील दोन अनमोल हिरे आहेत. आ.गणपतराव देशमुख  यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीमध्ये कधीही जाती-जातीमध्ये तेढ निर्माण केली  नसून जाती-पातीचा विचार न करता डॉ.अनिकेत देशमुख यांना विजयी करावे असे आवाहनही शेवटी त्यांनी केले. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांच्याबद्दल सभेत चुकीच्या पध्दतीने वक्तव्य केल्याबद्दल विरोधकांचा नाव न घेता भरपूर समाचार घेतला.

शेतकरी कामगार पक्ष व मित्रपक्षाचे सांगोला विधानसभा निवडणूकीचे उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख म्हणाले की, आजपर्यंत तालुक्यातील तमाम आबासाहेब प्रेमी लोकांनी एक नव्हे दोन नव्हे तर अकरावेळा आमदार केले. याची मला जाणीव  आहे. शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते, मतदार, तमाम जनतेचा विश्वास आणि आ.गणपतराव देशमुख यांची सर्वसामान्यांच्या विकासाची धडपड यासर्व गोष्टी सार्थक लावण्यासाठी मी तुमचाच पुरोगामी कार्यकर्ता म्हणून कार्य करणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून शेतकरी कामगार पक्षाने तालुक्यामध्ये सत्ता का टिकवली याचे उत्तर म्हणजे आबासाहेबांनी केलेले सर्वसमावेशक विकासाचे कार्य. सर्वप्रथम तालुक्यातील शांतता टिकवून सुसंस्कृतपणाचे समाजकारण आणि नंतर राजकारणाला प्राधान्य दिले जाईल. माझी उमेदवारी म्हणजे त्या तमाम शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांचा विश्वास आहे. हाच विश्वास कायमस्वरुपी जपून सांगोला तालुका दुष्काळमुक्त करण्यासाठी अंतीम टप्प्यात आलेल्या सिंचन योजना पूर्ण करणारच.  जो मान, सन्मान प्रत्येक व्यक्तीला आबासाहेबांनी दिला त्याला कुठेही तडा जावू देणार नाही. यासाठी माझी उमेदवारी म्हणजे त्या सर्व तमाम शेतकरी कामगार पक्षावरील प्रेम करणाऱ्या लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठीच आहे. मला फक्त उमेदवार न समजता तुमचाच मित्र, भाऊ, तुमचाच मुलगा, तुमचाच नातू, समजून मलाही आशीर्वाद देवून सांगोला तालुक्याचा चौफेर विकास करण्याची संधी द्यावी. असेही त्यांनी सांगितले. यावेळी या निवडणूकीच्या प्रचारातील ही शेवटची प्रचारसभा असल्यामुळे या सभेला  जणू विजयी सभेचेच स्वरुप प्राप्त झाले होते. एवढी प्रचंड गर्दी सभेसाठी झाली होती. शनिवार असूनही सांगोला तालुक्यातील तमाम रस्ते लाल झेंडे घेवून फिरणाऱ्या कार्यकर्त्यांमुळे लालरंगातच शहर न्हावून निघाले होते.

 

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.