सांगोला

सांगोला तहसील कार्यालयाच्या आवारात असणारे पूर्वीचे पोलिस स्टेशन अपुरे पडत असल्याने पंढरपूर रोड  नजीक लाखो रुपये खर्च करुन नवीन भव्य अशी पोलिस स्टेशनची इमारत बांधण्यात आली. याच इमारतीला अजूनही अनेक गैरसोयीला तोंड द्यावे लागत आहे. फेब्रुवारी 2019 मध्ये सांगोला पोलिस स्टेशनला 9001: 2015 चे आय.एस.ओ.मानांकन प्राप्त झाले. त्यामुळे सांगोला पोलिस स्टेशनच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असला तरी बुधवारी सायंकाळच्या  सुमारास हाच आय.एस.ओ.मानांकन असणारा तुरा अंधारात होता. पोलिस स्टेशनला मोठ्याप्रमाणात नागरिकांची वर्दळ असल्यामुळे हा विषय चर्चेचा बनला होता.

याबाबत अधिक माहिती अशी की, बुधवारी सायंकाळच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाला होता. त्यानंतर वीज पुरवठा रात्री 7 वा.च्या आसपास परत पुर्ववत सुरु झाला. याच कालावधीत सांगोला पोलिस स्टेशनचा कारभार अंधारातच सुरु होता. वीजेची पर्यायी सोय ""असून अडचण नसून खोळंबा ''अशीच असल्यामुळे संपूर्ण इमारतीत अंधार पसरलेला होता. आपल्या विविध अडचणी-समस्या घेवून आलेल्या नागरिकांनाही यामुळे बाहेर लाईटची वाट पाहत थांबावे लागले.

तब्बल 103 गावाचा व सांगोला शहराच्या कायदा सुव्यवस्थेची सुत्रे याच पोलिस स्टेशनमधून सांभाळली जातात; परंतु याप्रकारच्या गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांनाही हकनाक त्याचा त्रास सहन करावा लागतो. खरे पाहता अपुरे संख्याबळ व कामाचा वाढता ताण लक्षात घेता पोलिस प्रशासनालाही मोठी कसरतच करावी लागते. त्यात भरीस भर म्हणून भौतिक सुविधांची गैरसोय असल्यामुळे काम करणे जीकिरीचे बनते.

सध्या निवडणूकीची रणधुमाळी सुरु असताना सर्वात मोठी जबाबदारी ही पोलिसांची आहे. अशा परिस्थितीमध्ये पोलिस प्रशासनालाही गैरसोयीमुळे उमेदवार व कार्यकर्त्यांपेक्षा हायटेन्शन मध्ये काम करावे लागते हे मात्र नक्की.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.