सांगोला

सांगोला विधानसभा मतदार संघातून तब्बल अकरावेळा आमदारकी मिळवणाऱ्या आ.गणपतराव देशमुख यांनी यंदा आपल्या डॉक्टर नातवाला आमदार करण्यासाठी जोरात बॅटिंग सुरु केली असल्यामुळे वयाच्या 93 व्या वर्षीही राजकारणातील अष्टपैलू धुरंधर व्यक्तिमत्त्व असणारे  आबासाहेब सकाळी 8 वा.पासून रात्री उशीरा पर्यंत प्रचार आणि लोकांच्या भेटीसाठी पायाला भिंगरी लावून फिरताना दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला कायम विरोधात असणारे ऍड.शहाजीबापू पाटील यांनी कधी नव्हे तर एकेकाळच्या सर्व विरोधकांशी निवडणूकपुर्ता का होईना दोस्ताना करीत यंदा शेकापक्षाच्या मतदार संघावर धनुष्यबाणाचा निशाणा साधण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली असल्याचे बोलले जात आहे.

एकेकाळी राष्ट्रीय कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणाऱ्या सांगोला तालुक्यावर शेतकरी कामगार पक्षाच्या आ.गणपतराव देशमुख यांनी आपली पकड घट्ट केली आणि बघता-बघता तब्बल अकरावेळा आमदारकीचा गड सर करीत महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशाच्या राजकारण्यांनाही राजकीय आत्मचिंतन करावयास भाग पाडले. आ.गणपतराव देशमुख यांना तोडीस तोड पर्यायी विरोधक निर्माण न झाल्यामुळे शेकापक्षाने तालुका कायमच ताब्यात ठेवला तर दुसऱ्या बाजूला कधी कॉंग्रेस तर कधी अपक्ष तर सध्या शिवसेनेच्या माध्यमातून नशीब अजमावीत असलेल्या ऍड.शहाजीबापू पाटील यांना एक अपवाद वगळता अद्यापपर्यंत विधानसभेचा रस्ता सापडलाच नाही.

ग्रामीण भागातील प्रत्येक वाडीवस्ती वरील व गावातील जुन्या, जाणत्या लोकांशी असणारा संपर्क आणि वैयक्तिक चारित्र्य संपन्नता यासह लोकांच्या काळजात हात घालून बोलण्याची असलेली कला यामुळे आजही ग्रामीण भागात आ.गणपतराव देशमुख हे नाव घेतले की जेष्ठ मंडळीही प्रचारासाठी जोर लावत फिरतात. तसेच इतर अल्पसंख्यांक समाजाशीही त्यांचे नाते चांगले आहे. साहजिकच याचा परिणाम म्हणून नेहमीच त्यांना मताधिक्य चांगले मिळाले होते. यंदा डॉक्टर नातवाची पहिली निवडणूक असल्यामुळे स्वत: आजोबा नातवाला हाताशी धरुन विधानसभेत विजय मिळवण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार बॅटिंग करीत आहेत.

ऍड.शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेच्या माध्यमातून आजोबा आणि नातवाला राजकीय कोंडीत पकडण्यासाठी तालुक्यातील विविध इतर राजकीय नेत्यांना आपल्या बाजूने वळविण्यासाठी कंबर कसली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कडून सांगोला तालुक्यात शेकापक्षाला पाठिंबा देवून टाकण्यात आलेल्या फिरकी मुळे माजी आ.दीपकआबा साळुंखे-पाटील हेही आश्चर्यचकित झाले. सहाजिकच याचा उलटा परिणाम म्हणून त्यांनीही शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देत अनेक वर्षाचा दोस्ताना असलेल्या शेकापक्ष विरोधात रणशिंग फुंकले आहे. यामुळे शेकाप विरुध्द शिवसेना, भाजपा, रिपाइ(ए) यासह अनेक इतर विरोधी गट असा जोरदार सामना रंगला आहे. 55 वर्षाची राजकीय कारकीर्द असणाऱ्या आ.गणपतराव देशमुख यांचा कस लागणार असून विरोधात अनेक विरोधक यंदा आमदारकी नाही  तर परत कधीही नाही असे म्हणून निवडणूकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे.

शेकापक्षाचा नवखा उमेदवार डॉ.अनिकेत देशमुख यांचा पराभव करण्यासाठी शिवसेनेकडून चक्क पक्ष प्रमुखांची सभा घेण्यात आली. त्यामुळे सांगोला तालुक्यातील शेकापक्षाचा गड राजकीयदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे हे दिसून येते. तर दुसऱ्या बाजूला अद्यापपर्यंत शेकापने कोणत्याही इतर बड्या नेत्याची सभा घेवून निवडणूक अवघड आहे असे दाखवण्याचा प्रयत्न केला नाही. सध्या तरी शेकापचे स्टार प्रचारक म्हणून आ.देशमुख हेच एकहाती धुरा सांभाळत आहेत कारण तालुक्यात आजही त्यांच्याच व्यक्तिमत्त्वाचा मोठा प्रभाव आहे.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.