खांब-रोहे, दि.१० 

सध्या परतीच्या पावसाने चांगलाच जोर पकडला असून त्याचा परिणाम खरीप हंगामाला बसू लागल्याने भात,नाचणी व वरी ही पिके धोक्यात आली आहे.त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे. 

आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे.आणि आपल्या देशातील शेती ही मोसमी पावसावर अवलंबून आहे. त्यामुळे कधी ओला दुष्काळ तर कधी सुका दुष्काळ तर कधी शेतीवर येणारी नैसर्गिक संकटे यामुळे शेती ही बेभरवशाची झाली आहे.त्यातच शेतीशी संबंधित घटकांचे वाढते दर पाहता शेती करावी की नाही याच कचाट्यात शेतकरी वर्ग सापडला आहे.दरवर्षी परतीच्या पावसाचा तडाखा शेतीला बसत असल्याने शेती व शेतक-यांचे फार मोठे नुकसान आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपात कोसळणारा परतीचा पाऊस शेती  क्षेत्राचे फार मोठे नुकसान करीत असल्याने परतीच्या पावसाची टांगती तलवार कायम शेतकरीवर्गाच्या पाठीशी असते.चालू हंगामात देखील परतीच्या पावसाने चांगलाच धुमाकूळ घातल्याने तयार भातशेती, नाचणी व वरीची शेती काही ठिकाणी आडवी तर काही ठिकाणी भुईसपाट झाली आहे. ऐन पिके हातात यायच्या सुमारास परतीचा पाऊस चांगलाच सक्रिय झाल्याने शेतकरी वर्गाच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. 

साखरचौथ गणेशोत्सवा पासून परतीचा पाऊस सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह कोसळू लागल्याने घरे दारे व इतर मालमत्तेसह शेती क्षेत्राचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान करू लागला आहे.घाटमाथ्यावरील शेतीच्या तुलनेत कोकण विभागातील शेती काहीशी भिन्न असल्याने व मुळातच 

शेतीचे क्षेत्रही कमी असल्याने तुटपुंजी शेती व वारंवार येणारी संकटे यांचा विचार करता आर्थिक बजेट पूर्णपणे कोलमडत असल्याने सद्यस्थितीत शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे.त्यातच परतीच्या पावसाने आपला मुक्काम अधिक वाढविला काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळी मात्र सणात शेतकरीवर्ग अंधारच राहणार आहे.

अवश्य वाचा