सांगोला

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला  तालुक्यात व शहरात  डेंग्यूचा प्रकोप चांगलाच वाढला असून डेंग्यूच्या संशयित रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. ग्रामीण रूग्णालयासह खाजगी दवाखान्यात मोठया प्रमाणात रुग्ण उपचार घेत आहेत. सध्या तालुक्यात डेंग्यू संशयित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने तालुका आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.दुष्काळी सांगोला तालुक्यात डेंग्यू मुळे " दुष्काळात तेरावा महिना" अश्या परिस्थितीला तोंड द्यावे ,लागत आहे.

गेल्या चार वर्षांपासून डेंग्यू आणि स्वाइन फ्लू सांगोलावासियांची पाठ सोडत नसल्याचे चित्र आहे. पावसाळा सुरू होताच दरवर्षी शहरात डेंग्यू आणि स्वाइन फ्लूच्या साथीचा प्रादूर्भाव वाढतो. डेंग्यू हा विषाणूजन्य आजार असून एडिस इजिप्ती प्रजातीचा डास चावल्यामुळे हा आजार होत आहे. या प्रजातीच्या डासांची उत्पत्ती स्वच्छ पाण्यातच होते. निकामी टायर्स, नारळाच्या करवंट्या, घराच्या छतावरील भंगार साहित्य, फुलदानी, फ्रीज, कूलर्सच्या ट्रेमधील पाण्यात या डेंग्यूच्या डासांची उत्पत्ती होते.

गेल्या आठवड्यापासून सांगोला शहर व तालुक्यात डासांचा प्रादुर्भाव अधिक झाल्याने सरकारी तसेच खासगी रुग्णालयांत डेंग्यू रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. परंतु, डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याने तालुका आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. ग्रामीण रुग्णालय आणि खासगी दवाखान्यात दाखल होणार्‍या तापाच्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. 

डेंग्यूच्या भीतीने ताप आलेले नागरिक भयभीत होत आहेत. ताप नेमका कोणत्या प्रकारचा आहे, हे समजण्यासाठी डॉक्टरांकडून प्रथम रक्‍ताची तपासणी केली जात आहे. त्यामुळे लॅबमध्येही गर्दी पाहायला मिळत आहे. शहरात डासांची उत्पत्ती वाढली आहे. त्यामुळे डास उत्पत्तीची ठिकाणे नागरिकांनी नष्ट करावीत, असे आवाहन नगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे. डेंग्यू आजारापासून बचाव करण्यासाठी वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे. ज्या लोकांमध्ये रोग प्रतिकारशक्‍ती कमी आहे. त्यांना डेंग्यूची लागण लगेच होते. शिवाय लहान मुले, आजारी व्यक्‍तींना या आजाराची तत्काळ लागण होण्याची शक्यता असते. यामुळे या आजाराबाबत वेळीच खबरदारी घेणे गरजेचे आहे.

अवश्य वाचा

रो- रो सेवा महागडी

रायगडातील कवींचा सन्मान.