अलिबाग

संत महात्म्यांनी महाराष्ट्रात संस्कृती, परंपरा फक्त जोपासलीच नाही तर महाराष्ट्राला दिशा देण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्याचप्रमाणे रायगड जिल्हा परिषदेकडून दिला जाणारा हा रायगड भुषण पुरस्कार 25 लाख जनतेने केलेला तुमचा गौरव आहे हे लक्षात ठेवून समाजाला दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करत रहा असे प्रतिपादन लोकसभेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे उपगटनेते खासदार सुनील तटकरे यांनी केले.

विविध क्षेत्रात योगदान देणार्‍या रायगड जिल्ह्यातील 163 कर्तृत्ववान ग्रामस्थांना रायगड जिल्हा परीषदेतर्फे रायगड भूषण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन अलिबाग येथील पीएनपी नाटयगृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते मार्गदर्शन करताना बोलत होते.  यावेळी एनएसजी कमांडो ॠषीकेश पाटील, बचावकार्यात महत्वाची भुमीका बजावणारे दत्तात्रय गणू देशमुख, ज्येष्ठ छायाचित्रकार सुधीर नाझरे, मनाजे भगत, ज्येष्ठ पत्रकार मदन हणमंते, यशवंत तेरवाडकर, संगीतकार विक्रांत वार्डे, शरद गोंधळी, विजय देवजी भगत, माजिद हाजिते, नामदेव कासारे, डॉ राजेंद्र राठोड, शेखर जांभळे, बालकलाकार ओम चंदने, क्रिडा कार्यकर्ते हिरामण भोईर आदींना रायगड भुषण पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. याप्रसंगी माजी मंत्री मीनाक्षी पाटील, आमदार पंडीत पाटील, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदिती तटकरे, उपाध्यक्ष अ‍ॅड आस्वाद पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती नरेश पाटील, समाजकल्याण सभापती नारायण डामसे, कृषी व पशुसंवर्धन सभापती प्रमोद पाटील, महिला व बालकल्याण सभापती उमा मुंढे, विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, माजी अध्यक्षा निलीमा पाटील, माजी सभापती चित्रा पाटील, जिल्हा परिषद सदस्य भावना पाटील, दिलीप भोईर, सुरेश खैरे, डी बी पाटील, प्रियदर्शीनी पाटील, चंद्रकांत कळंबे, विजय पाटील उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर आदी उपस्थित होते.
खा सुनील तटकरे पुढे म्हणाले की, पुरस्कारर्थींची संख्या वाढली असली तरी त्यामुळे पुरस्काराचे महत्त्व कमी होत नाही. उलट संख्या वाढली याचा अभिमानच वाटत असल्याचे त्यांनी नमुद केले. महाराष्ट्रात काही पुरस्कार महत्वाचे आणि सन्मानाचे असतात त्याचप्रमाणे स्थाानिक स्वराज्य संस्था म्हणून काम करताना रायगड जिल्हा परिषदेकडून दिला जाणार सन्मानही तितकाच महत्वाचा आहे. पुरस्कार प्राप्त गुणीजनांचा देशपातळीवर सन्मान व्हावा अशी अपेक्षाही त्यांनी शेवटी व्यक्त केली.
माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांनी आपल्या मनोगतात या भुमीतच ज्यांनी धर्माने, कर्माने आणि घामाने समृद्ध केले त्या समृद्धीत भर घालण्याचे काम आपण प्रत्येक पुरस्कार विजेत्यांनी केले आहे. सर्वच क्षेत्रातील गुणीजनांना आज गौरविले जात आहे. तुका झालासे कळसप्रमाणे वारकर्‍यांचा सन्मान केला जात आहे. या पुरस्कारांतून येत्या निवडणूकीत समतेचा ध्वज फडकावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आमदार पंडीत पाटील म्हणाले की, ज्येष्ठ निरुपणकार डॉ नानासाहेब धर्माधिकारी, आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे या पुरस्काराचा दर्जा मोठा आहे. मध्यंतरीच्या काळात हा पुरस्कार बंद करण्यात आला होता. मात्र आपण अध्यक्ष झाल्यानंतर पुन्हा एकदा या पुरस्काराचे स्वरुप बदलून सुरु केल्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाकडून फक्त विशिष्ट लोकांनाच पुरस्कार दिले जातात. मात्र रायगड भुषणच्या माध्यमातून समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पुरस्कार पोहचवला. असा पुरस्कार देणारी रायगड जिल्हा परिषद ही राज्यात एकमेव आहे. इतर जिल्हा परिषदांनीही हा आदर्श घ्यायला हवा अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. विविध माध्यमातून समाजाचे परिवर्तन घडवून आणणार्‍यांना पुरस्कार दिला जातो. कोणताही पुरस्कार महत्वाचा नसतो तर त्यातून मिळणारी प्रेरणा महत्वाची असते असेही ते शेवटी म्हणाले.
उपस्थितांचे स्वागत उपाध्यक्ष अ‍ॅड आस्वाद पाटील यांनी तर प्रस्तावना उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश खोपकर यांनी केली. तर आभार राजिप अध्यक्षा आदिती तटकरे यांनी मानले. सुत्रसंचलन अमरदिप ठोंबरे आणि ज्योती घरत यांनी केले. संपूर्ण जिल्हाभरातून मोठया संख्येने पुरस्कार विजेते तसेच त्यांचे चाहते उपस्थित राहील्याने पीएनपी नाटयगृह खचाखच भरले होेते. अनेकांनी व्यासपिठाच्या समोर गर्दी केली होेती. तर कित्येक जण मधल्या पॅसेजमध्ये बसून कार्यक्रमाचा आनंद घेत होते. तसेच सर्वांना कार्यक्रमाचा उपभोग घेता यावा याकरीता नाटयगृहाबाहेर एलसीडी स्क्रिनवर दुरचित्र पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तिथे देखील मोठी गर्दी दिसत होती.

अवश्य वाचा