मुंबई, दि. ११

राज्यातल्या सांगली-कोल्हापूर या पूरग्रस्त भागातही विधानसभेच्या निवडणुका निश्चित होणाऱ्या वेळापत्रकानुसारच होतील. त्यात कोणत्याही स्वरूपाचा बदल होणार नाही, असे राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंह यांनी बुधवारी एका पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. पूरग्रस्त भागातल्या बाधितांना मतदानासाठी नव्याने विनामूल्य ओळखपत्रे देण्याचे काम चालू आहे. त्यामुळे त्यांच्या मतदानाच्या अधिकाराला कोणतीही बाधा येणार नाही, असेही ते म्हणाले.


राज्यात गेल्या दीड महिन्याच्या काळात साडेआठ लाखांपेक्षा जास्त नवीन मतदारांची मतदारयादीत समावेश झाला. भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रात १५ जुलै ते ३१ ऑगस्ट या दीड महिन्याच्या काळात विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या काळात १० लाख ७५ हजार ५२८ नवीन मतदार यादीत समाविष्ट झाले. याच काळात विविध कारणांमुळे दोन लाख १६ हजार २७८ मतदार यादीतून वगळण्यात आले. त्यामुळे एकूण आठ लाख ५९ हजार २५० नवीन मतदार यादीत वाढले, असे त्यांनी सांगितले. १५ जुलैला मतदारयादीत एकूण आठ कोटी ८५ लाख ८६ हजार ९६१ मतदारांची नोंद होती. त्यात चार कोटी ६३ लाख २७ हजार २४१ पुरूष, चार कोटी २२ लाख ५७ हजार १९३ महिला मतदारांचा समावेश होता. ३१ ऑगस्टला एकूण मतदारांची संख्या आठ कोटी ९४ लाख ४६ हजार २११ झाली. यात चार कोटी ६७ लाख ३७ हजार ८४१ पुरूष तर चार कोटी २७ लाख पाच हजार ७७७ महिला मतदारांची नोंद झाली, असेही सिंह यांनी सांगितले.

३१ ऑगस्टला मतदारयादी प्रसिद्ध झाली असली तरी अजूनही मतदारांची नोंदणी चालू आहे. विधानसभा निवडणुकीत नामनिर्देशन दाखल करण्याच्या दिनांकापूर्वी १० दिवस आधीपर्यंत मतदारांना आपली नावे यादीत समाविष्ट करता येतील. ऑनलाईन नोंदणीही करता येऊ शकेल. लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभा निवडणुकीतही इव्हीएम मशीनबरोबर व्हीव्हीपॅटचा वापर करण्यात येणार आहे. त्याकरीता पुरेशा संख्येने त्याची उपलब्धता झाली आहे, असेही ते म्हणाले.

अवश्य वाचा