रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील ग्राहकांना सर्वोत्तम सेवा दिल्यामुळेच आज बँकेने संकल्प सिद्धी योजनेमध्ये भरीव कामगिरी केली आहे. बँकेच्या वतीने ग्राहकांना देण्यात येणारी सेवा हेच आपल्या यशाचे गमक आहे असे प्रतिपादन रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी बँकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संकल्प सिद्धी गुणगौरव समारंभामध्ये केले. ऑगस्ट २०१९ मध्ये रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने संकल्प सिद्धी योजना राबविण्यात आली होती. या योजनेमध्ये बँकेने ३५ कोटीपेक्षा अधिक ठेवी तसेच ४० कोटीपेक्षा अधिक कर्ज वाटप करून बँकेच्या व्यवसायामध्ये वाढ केली आहे.

          या योजनेमध्ये उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्मचा-यांना बँकेच्या अलिबाग येथील केंद्र कार्यालय येथे बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांच्या वतीने गौरविण्यात आले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांच्यासमवेत बँकेचे चीफ मॅनेजर व्ही.एस.पाटील, भारत नांदगावकर, मंदार वर्तक तसेच विभागीय अधिकारी संजय देशमुख, भरत पाटील हे उपस्थित होते.  एकूण २४ वेगवेगळ्या प्रकारांमध्ये यावेळी पारितोषिकांचे वाटप करण्यात आले.

           बँकेने सन २०१७ सालापासून संकल्प सिद्धी योजना सुरु केलेली असून या योजनेमध्ये दरवर्षी २५,००० पेक्षा अधिक ग्राहक बँकेशी जोडले गेलेले असून त्यांना बँकेच्या ठेव योजना, कर्ज योजना यांचा लाभ दिला जातो. तसेच बँकेच्या वतीने स्थापन झालेल्या बचतगटांना देखील या योजनेमध्ये सहभागी करून घेतले जात असून त्यांना देखील तात्काळ कर्जपुरवठा बँकेच्या वतीने करण्यात आला आहे. नाबार्ड तसेच शासकीय पातळीवर देखील या योजनेचे कौतुक झालेले असून बँकेचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील तसेच सर्व संचालक यांच्या मार्गदर्शनाखाली बँकेने सुरु केलेली ही योजना बँकेच्या ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे त्याबद्दल देखील बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप नाईक यांनी समाधान व्यक्त केले. तसेच बँकेला बँकिंग फ्रंटीयर्स यांच्यावतीने जाहीर झालेल्या देशपातळीवरील सर्वोत्तम बँक पुरस्काराबद्दल सर्वांचे अभिनंदन करत यापुढे देखील आपल्या कामगिरीत सातत्य राखत आपण ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्याल असा असा आशावाद व्यक्त केला.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास