पाली-बेणसे 

वाकण पाली खोपोली राज्यमहामार्गाचे रुंदीकरणाचे काम जोरात व गतीने सुरु आहे. अशातच रुंदिकरणादरम्यान या मार्गावर असुरक्षीतरित्या होणार्‍या कामामुळे प्रवाशी जनतेसह वाहनचालकांच्या जिवितास धोका निर्माण झाला आहे. याबरोबरच या मार्गावर काही दिवस बंद असलेली  अवजड व ओव्हरलोड वाहतुक व महाकाय वाहनांची वर्दळ पुन्हा एकदा सुरू झाली आहे. ही अवजड  वाहतूक  जिवघेणी ठरत असून अपघाताला निमंत्रण देत आहे.एकापाठोपाठ लोखंडी व सिमेंटचे पाईप, कॉईल घेऊन जाणारी वाहने धोकादायक ठरत आहेत. रस्ता रुंदिकरणादरम्यान ठिकठिकाणी रस्ता फोडून काम केले जात आहे. हे काम करीत असताना सबंधीत ठेकेदाराकडून रस्ता सुरक्षेच्या नियमांची पायमल्ली होत असून याकडे एम.एस.आर.डीचे देखील सोईस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. एकाचवेळी समोरुन दोन वाहणे आल्यास वाहनचालकांची मोठी कसरत पहावयांस मिळत आहे. तर या मार्गावरुन मोटारसायकलवरुन प्रवास करताना अक्षरशः जिव मुठीत घेवून प्रवास करावा लागत आहे. वाकण पाली खोपोली मार्गावरुन अवजड व ओव्हरलोड वाहतुकीचे प्रमाण वाढले असल्याने हा मार्ग जनू मृत्यूचा सापळा बनला आहे. रायगड जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी या मार्गावरील अवजड वाहतूक बंद करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अवजड वाहतूक बंद देखील करण्यात  आली होती. गणेशोत्सवादरम्यान अवजड वाहतूक मुंबई गोवा महामार्गाने वळवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा ही धोकादायक व अवजड वाहतूक सुरू झाल्याने वाहतूक कोंडीसह नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करण्याची वेळ आली आहे. अनेक वर्षापासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा मार्ग सद्यस्थितीत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महांडळाच्या(एम.एस.आर.डी.सी) च्या अखत्यारीत सोपवण्यात आला आहे. अशातच या मार्गाकडे सातत्याने  एम.एस.आर.डीचे दुर्लक्ष होत असल्याने या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे, दगडगोटे आदी रस्त्याच्या दुरावस्थेमुळे प्रवाशी नागरीकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. तर नादुरस्त रस्त्यामुळे अपघाती घटनांचे प्रमाण देखील वाढल्याचे दिसून येत आहे. या मार्गावर जागोजागी पडलेले खड्डे त्रासदायक ठरत आहेत. पाली खोपोली मार्गावर असलेल्या पाली व जांभुळपाडा आंबा नदी पुलाची देखील धोकादायक परिस्तीती दिसून येत आहे. पाली पुलावर जिवघेणे खड्डे पडले असून पुलाचे संरक्षण कठडे तुटून पडल्याने मृत्यूमुख उघडे झाले आहे. त्यामुळे वेगवान वाहने थेट नदीत कोसळून अपघात घडण्याची मोठी भिती निर्माण झाली आहे. काही महिण्यांपुर्वी पाली आंबा नदी पुलावरुन झायलो नदीपात्रात कोसळून वृध्द महिलेला आपले प्राण गमवावे लागले होते. तशाप्रकारच्या जिवघेण्या व मोठ्या अपघाताची पुनरावृती होण्याची दाट शक्यता असताना एम.एस.आर.डी.सी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून अपघाताच्या प्रतिक्षेत असल्याचे दिसते. महामार्गावरील जांभुळपाडा आंबा नदीवरील मुख्य पुल जुना व जर्जर झाला असल्याने या धोकादायक पुलावर धोक्याची घंटा वाजत आहे. येथिल औद्योगीक कारखाने व कंपन्यात उत्पादीत केलेल्या सामुग्रीची अवजड व मोठ्या वाहनातून वाहतूक केली जाते. जांभुळपाडा आंबा नदी पुलावरुन मोठमोठी अवजड वाहने येजा करीत असल्याने पुलाला हादरे बसत आहेत. त्यामुळे हा पुल केव्हाही कोसळून महाडच्या सावित्री नदी पुलाच्या दुर्घटनेसारखी घटना घडण्याची भिती जनमाणसातून व्यक्त केली जात आहे. याबरोबरच वाकण पाली खोपोली मार्गावर ठिकठिकाणी रस्ता रुंदीकरणाचे काम सुरु आहे. रस्त्यावर वापरण्यात येणारे जे.सी.पी व अन्य साहित्याचा वापर करताना कोणत्याही प्रकारची सुरक्षा न बाळगता काम केले जात असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे. तर अनेक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा मातीचे डोंगर फोडून काम सुरु असल्याने मार्गावर माती उतरून सर्वत्र चिखल झाला आहे. परिणामी प्रवाशांना आजार, दमा व अन्य  रोग जडण्याची भिती आहे. तसेच रस्त्यालगत काम सुरु असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतेही सुचनाफलक अथवा दुभाजक लावण्यात आलेले नाहीत. तर एका बाजूचा रस्ता उंचवट्यावर तर नव्याने बनविला जाणारा रस्ता 10 ते 20 फूट खोदून होत असल्याने वेगवान वाहने रस्त्यावरुन खाली पडून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पाली खोपोली मार्ग प्रवास व वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षीत व सुखकर होणेकरीता अवजड व ओव्हरलोड वाहतुकीवर बंदी आणावी, तसेच रस्ता रुंदिकरणाचे होणारे काम सुरक्षितरित्या करावे अशी मागणी जनतेतून जोर धरत आहे. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली