उरण

शांत समुद्र किनारा उन्हाळी शेतमळे बागबागायती आणि पावसाळी भातशेती असा सर्व काळ हिरवागार समृध्द आणि प्रदूषणा पासून मुक्त असणारा उरण तालुक्याचा पश्‍चिम विभागाचा परिसर आज पूर्ण पणे प्रदूषणाने व्यापलेला आहे. कारण 1978 साली या परिसराला ओएनजीसीच्या प्रकल्पाच्या प्रदूषणाचे ग्रहण लागले, भरीसभर म्हणून हिरव्यागार गर्द झाडीत दिसणारे टुमदार इमल्यांच्या जागेवर  सिमेंटकॉक्रीटच्या इमारती डोकाऊ लागल्या परिणामी नागाव, केगाव, म्हातवली, दांडा गावातल्या नागरिकांना या प्रदूषणाचा चांगलाच दणका मिळाला आहे. या परिसरांतील नागरिक श्‍वसनाच्या आजाराने आणि पुढचे पाउल टाकीत आता कॉन्सरच्या आजाराने ग्रासले असल्याचा दावा उरणमधील जेष्ठ पत्रकार दस्तुरखुद्द नागावचे नागरिक असणारे प्रवीणजी पुरो यांनी उरण सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित एका बैठकीत केल्याने उरणकरांचे धाबे दणाणले आहेत.  

मंगळवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी ओएनजीसी प्रकल्पात लागलेल्या आगी संदर्भात या बैठकीचे आयोजन रविवार दि. 8 सप्टेंबर रोजी उरण सामाजिक संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. त्यावेळी ओएनजीसी प्रकल्प किती महाभयंकर प्रलयकारी असल्याचे सांगताना ते म्हणाले की भातशेती आणि भाजीपाला फुलाफळांच्या बागायतीने आणि पश्‍चिम समुद्रकिनार्‍या वरुन मिळणार्‍या मोकळ्या हावे मुळे हा परिसर प्रदूषणमुक्त होता, मात्र 1978 साली. ओएनजीसीचा प्रकल्प या ठिकाणी आला आणि या परिसराचे सर्व चित्र बदलून गेले आहे. ओएनजीसीमध्ये अनेक तीव्र ज्वलनशील रसायने आहेत यामध्ये नाफ्ता, क्रुडऑइल, एलपीजीच्या बरोबरीने काही अ‍ॅसिड्सचे प्रकार आहेत. या ठिकाणी विचार करण्यासारखी एक गोष्ट आहे ही सारी रसायने इतक्या मोठ्या प्रमाणात आहेत त्याचा विचार करणे गरजेचे आहे. घरामध्ये असणारा एलपीजीचा सिलेंडर हा 14 किलोचा असतो त्याच्या स्फोटाची तीव्रता आपल्या सर्वांनाच माहित आहे. मग ओएनजीसीमध्ये असणार्‍या दुरुस्तहीअसंख्य टाक्यामधून असे 10 लाख सिलेंडर भरतील इतका प्रचंड साठा एलपीजीचा, नाफ्ता, क्रुडऑइलचा विविध प्रकारच्या अ‍ॅसिड्सचा आहे. जो आज 42 वर्षानंतर आपल्याला माहित नाही. याची जाणिव  कंपनीनेही करून दिलेली नाही, ही खरी शोकांतिका आहे, असे स्पष्ट मत व्यक्तही त्यांनी यावेळी व्यक्त केले.    

संपूर्ण प्रकल्पातील कामे अलिकडे ठेकेदारी पद्धतीने सुरु आहेत ज्यांना कामाचा अनुभव आहे ते 15/17 हजारावर नोकरी करीत आहेत. त्याच जागेवर कायम स्वरूपी काम करणारी व्यक्ती लाखाच्या  हिशोबात पगार घेत आहे असे विदारक दृश्य कंपनीत पाहण्यास मिळत आहे. कंपनीत जुनेजाणते अनुभवी असणारे तंत्रज्ञ सेवानिवृत्त झालेत, त्यांच्या बदल्यात ठेकेदारी पद्धतीने काम करण्यासाठी अकुशल कामगार काम करीत आहेत, गेल्या 15 वर्षापासून कंपनीतील वरिष्ठ अधिकारी कंपनीमधील पाईपचे फेब्रीकेशन आणि दुरुस्तची मागणी करीत आहेत. मात्र त्याला केंद्र सरकारचे पेट्रोलियमखाते मान्यता देत नाही. परंतु सीआरएस फंडातून गुजरातमध्ये सरदार पटेलांचा पुतळा उभारणीसाठी करोडो रुपये या फंडामधून दिले जातात. त्यावेळी उरणातील ग्रामपंचायतीना घंटागाडीसाठी टेंम्पो दिले जातात. नागरिकांच्या आरोग्यसेवेबाबत आणि नागरी सोई-सुविधांबाबत येथे वनवाच आहे.  विकास असावा परंतु तो नागरिकांचे जीवन भकास करणारा नसावा जे भोपाळ मध्ये घडले त्याही पेक्षा उरणमध्ये घडू शकते याची जाण नागरिकांनी ठेवावी असे त्यानी शेवटी स्पष्ट करीत शुक्रवार दि. 20 सप्टेंबर रोजी ओएनजीसी कंपनीसमोर आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय उपोषणास स्थानिक जनतेने मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहनही त्यांनी केले.

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली