नेरळ,ता.11

     कर्जत विधानसभा मतदारसंघात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत,मात्र तरीही या विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढण्यासाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात इच्छुकांची मांदियाळी आहे.शिवसेनेकडून सहा तर भाजप कडून तीन इच्छुक यांनी आपआपल्या पक्षाकडे मागणी केली आहे.दरम्यान,कर्जत विधानसभा मतदारसंघ युतीच्या वाटाघाटीत अदलाबदल करून भाजपच्या वाट्याला येईल अशी शक्यता निर्माण झाल्याने कदाचित भाजप मध्ये अन्य राजकीय पक्षातील काही इच्छुक प्रवेश करून दावेदार बनतील अशी देखील शक्यता आहे,मात्र निष्ठावंत हा मुद्दा त्यावेळी महत्वाचा असून त्याच मुद्द्यावर अनेकांच्या उमेदवाऱ्या कापल्या जाऊ शकतात हे देखील यावेळच्या निवडणूक मधील महत्वाचा भाग बनला आहे.

      कर्जत या मतदारसंघात शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेस कडून अनुक्रमे देवेंद्र साटम आणि सुरेश लाड यांनी तीनवेळा निवडून यायची किमया केली आहे.त्यातील देवेंद्र साटम हे सध्या भाजप मध्ये कार्यरत असून सुरेश लाड हे विद्यमान आमदार असून त्यांच्याकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी निश्चित आहे.त्यामुळे 2014 प्रमाणे निवडणूक झाली तर शिवसेना आणि भाजप कडून कोण लढणार?यावर गणिते मांडली जात आहेत.सध्या शिवसेनेकडून 2014 मध्ये शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून पराभूत झालेले पक्षाचे जिल्हा सल्लागार हनुमंत पिंगळे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.तर 2014 मध्ये शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार राहिलेले शिवसेना पक्षाचे माजी उपजिल्हा प्रमुख महेंद्र थोरवे यांनी देखील उमेदवारी मागितली असून ते देखील प्रबळ दावेदार मानले जात आहेत.त्यातील पिंगळे यांनी 2009 मध्ये शिवसेना पक्षाचे अधिकृत उमेदवार देवेंद्र साटम यांच्या विरुद्ध अपक्ष म्हणून उमेदवारी लढवून मोठे मतदान घेतले होते.

     त्याशिवाय शिवसेनेचे कर्जत मतदारसंघाचे संघटक संतोष भोईर यांनी उमेदवारी मागितली असून भोईर या नावाबद्दल कर्जत आणि खालापूर मधील जनतेला आपुलकी आहे हे यापूर्वी दिसून आले आहे,त्यावेळी भोईर आणि खोपोली शहर प्रमुख सुनील पाटील हे दोन नवीन चेहेरे विधानसभा निवडणुक लढण्यासाठी सज्ज आहेत.हे पाच जण इच्छुक म्हणून कर्जत विधानसभा मतदारसंघात दावेदार असताना रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांनी थेट पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातात आपला बायो डाटा देऊन उमेदवारी प्रबळ केली आहे.मात्र या सहा इच्छुक उमेदवार यांचे शिवसेना पक्षात काही प्लस आणि मायनस असे गुण आहेत, ते कोणाला मारक ठरतात?हे 19 सप्टेंबर नंतर मुलाखती झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.मात्र पक्षाची गरज ओळखून स्वतःला झोकून देऊन पक्षाच्या उमेदवार यांना विजयी करण्याचे कसब ज्यांनी यापूर्वी दाखवले आहे त्यांच्या गळ्यात विधानसभेची उमेदवारी जाणार हे नक्की.मात्र एवढे सहा इच्छुक लक्षात घेता 2009 आणि 2014 प्रमाणे शिवसेनेत बंडखोरी तर होणार नाही ना?या भीतीने सेना गोटात सावध पवित्रा आहे.

      तिकडे भारतीय जनता पक्षाला युती झाल्यास कर्जत मतदारसंघ हवा आहे.कारण त्यांना कर्जत मतदारसंघ मध्ये शिवसेना सलग दोनवेळा पराभूत झाली आहे,मात्र मागील निवडणुकीचे सेना-भाजप युती नव्हती.त्यामुळे युती झाल्यास भाजप ला कर्जत सोडले जाईल काय याची शाश्वती कोणी देत नसून सर्व जर तर वर अवलंबून आहेत.मात्र कर्जत मध्ये लढण्यासाठी माजी आमदार असलेले देवेंद्र साटम यांनी दावा केला आहे.त्याचवेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वसंत भोईर आणि भाजप किसान मोर्चा प्रदेश सचिव सुनील गोगटे यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे.सुनील गोगटे हे पक्षाचे कर्जत शहरातील संस्थापक सदस्य असून त्यांनी नगरसेवक म्हणून काम केले आहे.तर वसंत भोईर यांनी सिडको महामंडळात संचालक म्हणून तसेच कर्जत शहराचे प्रथम नागरिक नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे.त्यामुळे राज्यात युती झाल्यास कर्जत शिवसेना पक्षाकडे राहणार की भाजपला सोडला जाणार हा मुद्दा सध्या युतीच्या बोलणीत अग्रभागी आहे.त्यावेळी लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेता मावळ देताना कदाचित कर्जत सोडला जाईल अशी अटकळ भाजप कडून टाकण्यात आली होती.ही अटकळ मान्य झाल्यास भाजप कडे अन्यथा शिवसेनेकडे कर्जत राहण्याची शक्यता आहे.मात्र युती न झाल्यास किंवा कर्जत युती मध्ये भाजप च्या वाट्याला गेल्यास भाजप कडून निवडणूक लढण्याची तयारी अन्य पक्षातील काही नेते करीत असल्याचे बोलाले जात आहे.हे देखील या निमित्ताने पडद्यामागील राजकारण असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

        मात्र शिवसेनेकडून इच्छुक असलेल्या सहा मधून पक्ष कोणाच्या हाती धनुष्यबाण देतो?याकडे नजरा लागल्या असून त्यानंतर खरे राजकारण कर्जत शिवसेनेत सुरू होण्याची शक्यता आहे.मात्र कर्जत मतदारसंघ शिवसेनेच्या हातातून दोन नाहीतर तब्बल तीनवेळा बंडखोरी झाल्याने गेला आहे.त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवार यांच्या विरुद्ध बंडखोरी करणारे यांच्यासाठी पक्षाकडून घेतल्या जाणाऱ्या मुलाखती या मोठे दिव्य असणार आहे.

अवश्य वाचा

मोबाईल हिसकावून चोरटे पसार

गाडीची काच फोडून ऐवज लंपास