मुंबई, 

 भारतातील शहरांमधील जीवन अतिशय दगदगीचे, घाईगर्दीचे बनले आहे.  घरी असोत किंवा कार्यालयात किंवा रस्त्यावर असोत, शहरातील लोक कायम समोरच्याला मागे टाकण्यासाठी धावत असतात.  या धावपळीने माणूस शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या थकून जात नसेल तरच नवल. शहरातील लोकांमध्ये वाढत असलेल्या मानसिक ताणतणावांचे एक प्रमुख कारण शहरातील ट्रॅफिक असल्याचे निदर्शनास आले आहे. 

टाटा सॉल्ट लाईटने भारतातील महत्त्वाच्या १० शहरांमध्ये नुकत्याच केलेल्या 'एज ऑफ रेज' या सर्वेक्षणातून असे आढळून आले आहे की, महानगरांमधील अर्ध्यापेक्षा जास्त ५६% लोकांनी असे मान्य केले आहे की ट्रॅफिकमुळे जर ऑफिसला, कामाला जायला उशीर होत असेल तर ट्रॅफिकच्या नियमांची पायमल्ली करायला ते मागेपुढे पाहत नाहीत, अशावेळी ट्रॅफिक पोलीस आणि इतर वाहनचालकांसोबत बाचाबाची देखील होते त्यांनी मान्य केले.  पाचपैकी एक शहरी भारतीय २०% व्यक्ती असे सांगते की त्यांचा स्वभाव रागीट आणि तापट होण्याचे प्रमुख कारण ट्रॅफिक आहे.

शहरांमध्ये राहणाऱ्या भारतीयांसाठी ट्रॅफिक जॅम ही नुसती रोजची डोकेदुखी नव्हे तर मानसिक ताण, संताप अशा विकारांचे कारण बनले आहे.  वाढते शहरीकरण लक्षात घेता ही समस्या दिवसेंदिवस अक्राळविक्राळ रूप धारण करत आहे.  शहरातील ट्रॅफिक हे सार्वजनिक आरोग्याला हानिकारक ठरत आहे. अनेक लोकांना असे वाटते की रोड रेज म्हणजे हिंसक घटना पण पुढील गाडीच्या अगदी जवळून गाडी चालवणे, अचानक किंवा नियमबाह्य पद्धतीने लेन बदलणे, अतिवेग आणि इतरांना धमक्या देणे हे प्रकार देखील 'रोड रेज' आहेत.

श्री. सागर बोके, कन्ज्युमर-बिझनेस हेड मार्केटिंग, टाटा केमिकल्स यांनी सांगितले, "आपल्या देशात ८९% लोक सांगतात की त्यांना ताणतणावांचा त्रास होत आहे आणि जागतिक पातळीवर याचे सरासरी प्रमाण ८६% आहे. आमच्या सर्वेक्षणातून हाती आलेल्या निष्कर्षानुसार ट्रॅफिकमध्ये तासनतास अडकून पडावे लागल्यामुळे कितीतरी लोकांना राग आणि भांडणांना सामोरे जावे लागते. नैराश्य आणि ताणतणावांच्या विपरीत परिणामांचे गांभीर्य आम्हाला समजते आणि म्हणूनच देशभरातील सर्वांना असे आवाहन करतो की ताण आणि राग, संताप हे गंभीर आजारांना कारणीभूत ठरू शकतात, त्यांच्याबद्दल आपण जागरूक राहायला हवे."

डॉ. जयेश लेले, जनरल फिजिशियन, सूचक हॉस्पिटल, मुंबई या गंभीर समस्येबद्दल सांगितले, "आजच्या हायपर कनेक्टेड जगामध्ये हायपरटेन्शनने ग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येचे एक प्रमुख कारण म्हणजे शहरातील ट्रॅफिक.  तुम्ही शारीरिक दृष्ट्या थकलेले असाल किंवा मानसिक थकवा आलेला असो, त्यामुळे ताण निर्माण होतो. गतिहीनतेमुळे नीट झोप लागत नाही, शरीरात मेलॅटोनिनचा स्त्राव मोठ्या प्रमाणावर होतो. ट्रॅफिकमध्ये अडकल्याच्या भावनेमुळे क्लॉस्ट्रोफोबिया होऊ शकतो त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नैराश्य निर्माण होते. पुरेशी, शांत झोप, संतुलित आहार आणि योग्य जीवनशैली यामुळे ताणतणाव दूर होण्यास मदत होते, तुम्ही ताजेतवाने बनता आणि वेगवेगळ्या प्रकारच्या परिस्थितींना सक्षमतेने सामोरे जाता."

या राष्ट्रीय सर्वेक्षणात महानगरांमधील ट्रॅफिक जॅममुळे मानसिक आजारांच्या रूपाने भरावी लागणारी प्रचंड मोठी किंमत, त्यामुळे होणारे अपघात या सर्वांचा उहापोह केला गेला आहे. मानसिक ताणाखाली असलेली व्यक्ती आपला राग इतरांवर काढते.  रस्त्यांवरील भांडणे तर शहरांमधील रस्त्यांवरची नेहमीची गोष्ट बनली आहे.  पण लोकांचा हा राग फक्त रस्त्यांवरील भांडाणपुरता मर्यादित राहत नाही, त्याचे पर्यावसन हायपरटेन्शन आणि ताण निर्माण होण्यात होते.  या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे की ट्रॅफिकमध्ये अडकून पडावे लागलेले १६% लोक आपला राग टॅक्सी ड्रॉयव्हर्स आणि ट्रॅफिक पोलिसांवर काढतात, यामुळे रस्त्यावरील गोंधळात आणखीनच भर पडते.

ड्रायव्हिंगमुळे होणारे मानसिक ताणतणाव आणि त्यामुळे होणारे आजार आरोग्याला अतिशय घातक ठरतात.  प्रवासादरम्यान निर्माण होणारा ताण आणि व्यक्तीच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर होणारे त्याचे विपरीत परिणाम यावर लक्ष केंद्रीत करणारे संशोधन भारताव्यतिरिक्त इतर कोठेही करण्यात आलेले नाही.  आज जास्तीत जास्त लोक त्यांच्या कारमध्ये बसल्या बसल्या ट्रॅफिकमुळे ताणतणावांना बळी पडत आहेत.  यामुळे नैराश्य, संताप, मधुमेह, थकवा आणि हृदयरोग असे मोठे आजार देखील होऊ शकतात.

वाहनांची वाढती संख्या, घाई, गर्दी आणि धावपळीचे जीवन यामुळे रस्त्यांवरील भांडणे, अपघात, बेकायदेशीर वर्तन या घटना वाढल्या आहेत.  एकंदरीत जीवनावर याचा संभाव्य विपरीत परिणाम लक्षात घेता जनजागृती घडवून आणणे अतिशय महत्त्वाचे आहे. 

अवश्य वाचा