पाली-बेणसे

वाकण पाली खोपोली राज्य महामार्ग 548 (अ) रुंदीकरणाचे काम मागील वर्षभरापासून सुरु आहे. मागील ठेकेदाराने केलेल्या चुका व कामाच्या अयोग्य पध्दतीमुळे महामार्ग रंदिकरणाच्या कामाची पुरती वाट लागून गेली. पावसाळ्यात या मार्गावर मोठमोठे खड्डे, दगडगोटे, तसेच चिखलाचा राडारोडा झाला आहे. तर अनेक ठिकाणी खड्ड्यात तळी साचली असून अपघाताचा धोका निर्माण झाला होता. अशातच पाली पोलीस स्थानकात नव्याने रुजू झालेले  निरीक्षक बाळा कुंभार यांनी आपल्या दैनदीन कामाव्यतिरिक्त सामाजिक कामात देखील पुढाकार घेतला आहे, परतीच्या मार्गावर असलेल्या गणेशभक्त, चाकरमानी तसेच रुग्ण व प्रवाशी जनतेचा  प्रवास सुखकर व्हावा म्हणून वाकण पाली खोपोली राज्य महा मार्गावर  स्वतः उभे राहून स्वतःच्या निरीक्षणाखाली शक्य तेवढे खड्डे बुजवून घेतले. त्यामुळे परतीच्या मार्गावरील गणेशभक्त, चाकरमानी व  प्रवाशांसह  वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला व त्यांना  प्रवासात खड्यांचा त्रास जाणवला नाही. सामाजिक व जनहितार्थ कामी पोलीस निरीक्षक कुंभार  यांनी नेहमीच अग्रेसर राहून काम केले आहे. एखादे  काम कुणाच्या अखत्यारीत आहे, कुणी केले पाहिजे याला विशेष महत्त्व न देता नागरिकांचे हाल होऊ नयेत या सामाजिक बांधिलकीतून त्यांनी केलेल्या या कामाचे विशेष कौतुक  होत आहे.

वाकण पासून जंगलीपीर, बलाप, पाली ते थेट रासळ, पेडली, परळी, नाणोसे,तसेच  पालीफाटापर्यंत ठिकठिकाणी रस्त्याची चाळण झाली आहे. गणेशोत्सवापूर्वी या मार्गाची तकलादू डागडुजी करण्यात आली होती, मात्र आजमितीस पुन्हा महामार्गाची जैसे थे अवस्था झाली आहे. वाहतूक व प्रवासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण असलेला व मुंबई गोवा महामार्गाला पर्याय मानला जाणारा  हा मार्ग नेहमीच दुरावस्थेत राहिला आहे. लोकप्रतिनिधी व शासनाने या मार्गाला पोरकेपणाची वागणूक देत  दुर्लक्षित ठेवले.  अशातच मुसळधार पावसामुळे व वाहनांच्या संख्येत वाढ झाल्याने रस्ता फुटीच्या समस्येने पुन्हा डोके वर काढले . अशातच पोलीस निरीक्षक बाळा कुंभार यांनी महामार्गावरील  शक्य तेवढे महत्वाचे खड्डे बुजवून घेत आपल्या पोलीस सेवतून समाजापुढे एक आदर्श उभा केला आहे. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली