सुतारवाडी दि. 10

गणेशोत्सवाच्या कालावधीमध्ये दरवर्षीप्रमाणे यावर्षीही अवजड वाहनांवर बंदी घातल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक अत्यंत सुरळीतपणे चालू होती. रायगड जिल्ह्यातील अनेक एसटी आगारातून गणेश भक्तांसाठी विशेष गाड्या सोडण्यात आल्या होत्या. रोहा  आगारातून 60 एसटी च्या गाड्या मुंबई,  बोरिवली तसेच अन्य मार्गावर सोडण्यात आल्या होत्या. एसटी महामंडळाच्या गाड्यां पेक्षा खासगी वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर रस्त्याने धावत होत्या. दिनांक 2 सप्टेंबर पासून गणरायाचे आगमन झाले. त्यापूर्वी खोपोली,  पनवेल कडून येणाऱ्या अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावरून जाण्यास येण्यास बंदी घातल्यामुळे येथून जाणाऱ्या येणाऱ्या अन्य वाहनांमध्ये वाहतूक कोंडी झाली नाही. वाहतुकीवर बंदी असताना सुद्धा काही अवजड वाहन चालकांनी अगावूपना करून गाड्या महामार्गावरून आणण्याचा प्रयत्न केला. अशा वाहनांना कोलाड तसेच खांब या ठिकाणी अडवून रस्त्याच्या कडेला त्या वाहनांना उभे करण्यात आल्यामुळे एन गणपती सणामध्ये वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटल्यामुळे अनेकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला नाही. मात्र सातत्याने दमदार पडणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावर जागोजागी पडलेले खड्डे गणेश भक्तांचे डोकेदुखी ठरले. आपल्या गावाकडे येताना आणि गणेश विसर्जन करून परतीचा प्रवास करताना याच यातना पुन्हा गणेशभक्तांना भोगाव्या लागल्या मुळे गणेश भक्तांनी नाराजी व्यक्त केली. गेल्या सात-आठ वर्षांपासून पनवेल ते इंदापूर चौपदरीकरणाचे काम धीम्या गतीने चालू आहे. या महामार्गात अनेक जणांचे संसार उद्ध्वस्त झाले. अनेकांनी आपला पारंपारिक व्यवसाय गमावला. चौपदरीकरणाचे स्वप्न पाहणारे अनेक जण आज हयात नाहीत. आणखी किती पावसाळे हे चौपदरीकरणात जातील असा प्रश्न जनतेसमोर आहे. रस्ता रुंदीकरणामुळे रस्त्याचे काम अपूर्ण असल्यामुळे पनवेल ते इंदापूर पर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे लांबचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. अवजड वाहनांमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे कमी अंतराचा प्रवास मोठा खडतर झाला आहे.

अवश्य वाचा