सुतारवाडी दि. 8  

 यावर्षी विक्रमी पावसाची नोंद झाली असली तरी रोहा तालुक्याला मोठा फटका बसला. अनेकांना पावसाच्या पाण्याशी सामना करावा लागला. एकदा नाही तर दोन वेळेस मुसळधार कोसळणाऱ्या पावसाच्या पाण्याशी झुंज द्यावी लागली. रोहा,  नागोठणे, कोलाड  येथील बाजारपेठा जलमय झाल्या होत्या. अनेकांच्या   दुकानात तसेच घरांमध्ये पाणी शिरून दैनंदिन वापरावयाच्या वस्तूंची तसेच किमती वस्तूंची नासधूस झाली. तसेच शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रमाणापेक्षा जादा पाणी गेल्याने भात शेती कूजण्याच्या अवस्थेमध्ये होती. यामध्ये अनेकांचे अतोनात नुकसान झाले. गोकुळाष्टमी नंतर पावसाने थोडी उघडीप घेतली होती. आता गणपती सण उत्साहात साजरा करण्याच्या तयारीत गणेशभक्त आणि शेतकरी वर्ग असताना पुन्हा पावसाने थैमान घालून भयावह स्थिती निर्माण करून अनेकांना पुन्हा धक्का दिला. पुन्हा एकदा रोहा, कोलाड,  नागोठणे पावसाच्या पाण्याने जलमय झाले,  आणि पुन्हा एकदा अनेकांना भीतीने ग्रासले. अनेकांची झोप उडवीली. पुढील महिन्यात दिवाळी सण आहे साधारण दिवाळीनंतर शेतकरी आपल्या शेतातील पीक कापून झोडण्याचे काम करतो. यावर्षी दमदारपणे कोसळणाऱ्या पावसामुळे शेतामध्ये पाण्याची वाढ होत असल्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत आहे. गेल्या वर्षी दसऱ्याला सुद्धा विजेच्या कडकडाटासह पाऊस पडला होता. मात्र गेल्यावर्षी पूरस्थिती निर्माण होईल एवढा पाऊस नव्हता त्यामुळे भात पिक चांगली येऊन उत्पादनही चांगले मिळाले होते. दीड दिवसांचे गणपती विराजमान झाल्यानंतर पावसाने पुन्हा एकदा जोरदार पणे पर्जन्यवृष्टीला सुरुवात केली त्या पावसाने अद्यापही विश्रांती घेतली नसल्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले असून शेतकरी वर्ग भयभीत झाला आहे. विक्रीसाठी नाही निदान खाण्यासाठी आणि पेरणीसाठी तरी उत्पादन मिळाले तरी चालेल अशी बळीराजाची इच्छा आहे. पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देताना सुद्धा जोरदार पाऊस पडत होता.

अवश्य वाचा