मुंबई

मागील पाच वर्षात त्याने केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील समुद्रही पोहून पार केले आहेत. खुल्या पाण्यातील त्याच्या या साहसाची दखल केंद्र सरकारनेही घेतली.राष्ट्रीय क्रीडा दिनी भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते साहसी खेळातील असामान्य कामगिरीकरता तेनसिंग नोर्गे पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या मुंबईकर प्रभात कोळीला आता प्रतीक्षा आहे ती घरच्यांकडून मिळणाऱ्या शाबासकीची.

या सन्मानाबद्दल प्रभात म्हणाला, पोहायला सुरुवात केली तेव्हा कोणी माझी दखल घ्यावी, मला यश मिळेल की नाही याचा विचार केला नव्हता हा पुरस्कार मिळाल्यावर त्याचा अभिमान आई वडिलांच्या डोळ्यात पहायला मिळतोय याचा आनंद वाटतो आहे. हा पुरस्कार मला कायम लक्षात राहील 

केवळ पोहता यायला पाहिजे म्हणून पोहण्यासाठी पाण्यात उतरलेल्या ट्रॉबे कोळीवाड्यातील  प्रभातने मायदेशाप्रमाणे इंग्लड, दक्षिण आफ्रिका, डेन्मार्क, स्कॉटलंड, स्पेन, अमेरिकेतील कॅलिफोर्निया, हवाई आणि न्यूयॉर्क येथील विविध सागरी आव्हाने यशस्वीपणे पूर्ण केली आहेत. खुल्या पाण्यातील जलतरणात तिहेरी यश संपादन करणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे.हवाई बेटावरील कैवी चॅनेल जलदरीत्या पोहणारा प्रभात आशियातील सर्वात युवा जलतरणपटू आहे.  दक्षिण आफ्रिकेतील अटलांटिक महासागरही जलदरीत्या पोहण्याची कामगिरी प्रभातने साधली आहे. इंग्लंडमधील नॉर्थ आयर्लंड येथील नॉर्थ चॅनेल आणि जपानमधील त्सुगुरु  चॅनेल   पोहणारा प्रभात आशियातील पहिला जलतरणपटू आहे.इंग्लंडच्या मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर किताबाच्या मानकरी असलेल्या सॅलीमेंटी ग्रॅव्हीट यांच्या मार्गदर्शानुसार प्रभात खुल्या पाण्यात पोहण्याचा सराव करतो. खुल्या पाण्यातील जलतरणाचा प्रभातचा प्रवास इथेच थांबणारा नाही. पुढील वर्षी सेव्हन ओशन, सात समुद्रांपैकी न्यूझीलंडमधील कुक्स्लटंट समुद्र, कॅलिफोर्निया ट्रिपल क्रॉऊनमधील लेक तहाउ पोहून पार करण्याचे उद्दिष्ट प्रभातने डोळ्यासमोर ठेवले आहे.

खुल्या पाण्यातील या साहसी कामगिरीमुळे केंद्रीय युवा आणि क्रीडा मंत्रालयातर्फे  देण्यात येणाऱ्या तेनसिंग नोर्गे या अर्जुन पुरस्काराच्या समतुल्य पुरस्कारासाठी प्रभातची थेट निवड करण्यात आली. पाणी, हवा आणि जमिनीवर साहसी खेळामध्ये असामान्य कामगिरी करणाऱ्या खेळाडूला तेनसिंग नोर्गे पुरस्काराने गौरवण्यात येते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे प्रभातच्या आतापयर्तच्या कामगिरीची दखल राष्ट्रीय पातळीवर तर घेतली गेली. त्यामुळे  प्रभातला प्रतीक्षा आहे ती घरच्या कौतुकाची. राज्याचा क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च असा शिव छत्रपती पुरस्कारही प्रभातला मिळेल अशी त्याच्या चाहत्यांना अपेक्षा आहे. 

अवश्य वाचा

कलिंगडाची गोडी महागली