कंबोडिया 

भारतीय संस्कृती ही अतिशय प्राचीन आणि थोर असून आपण आपल्याच न्यूनगंडातून बाहेर पडायला हवे. आपली भाषा आणि संस्कृती याचा सार्थ अभिमान आपल्याला हवा. ती वैश्विक स्तरावर नेण्याबाबत सदैव जागरूक आणि प्रयत्नशील असायला हवे, असे प्रतिपादन मूर्तीकलेचे प्रख्यात अभ्यासक व नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. गो. बं. देगलुरकर यांनी व्यक्त केले. 

शिवसंघ प्रतिष्ठान व विश्व मराठी परिषदेच्यावतीने कंबोडिया येथे आयोजित करण्यात आलेल्या नवव्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. विश्वास मेहेंदळे आणि ज्येष्ठ पत्रकार हरिष कैंची, कॅप्टन नीलेश गायकवाड, प्रमोद गायकवाड आदी मान्यवर  उपस्थित होते. कंबोडियाच्या पर्यटन विभागाचे सन्माननीय सदस्य असलेले थॉन सिनन आणि वॅन यांनीही उपस्थित राहून कंबोडियात होत असलेल्या संमेलनाला शुभेच्छा दिल्या. 

या प्रसंगी डॉ. देगलुरकर म्हणाले, मूर्तीशास्त्र हे सामाजिक परिवर्तन आणि अभिसरण कथन करणारे शास्त्र आहे. भारतीय संस्कृती आजवर अखंडीत आणि प्रवाही कशी राहिली आहे हे मूर्तीशास्त्राच्या अभ्यासातूनच आपल्याला समजू शकते. या मूर्तीशास्त्राच्या ज्ञानामुळेच आपला जगभरात ठसा उमटलेला आहे. या सार्थ अभिमानाबरोबरच मराठी भाषेच्या शुद्धतेबाबतही आपण आग्रही असायला हवे. 

डॉ. विश्वास मेहेंदळे यांनी ‘मला भेटलेली माणसं’ हा कार्यक्रम सादर केला. कंबोडियातील पारंपरिक अप्सरा नृत्याने उपस्थितांना एक बहारदार अनुभव दिला. या प्रसंगी हरिष कैंची यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संयोजक प्रमोद गायकवाड यांनी केले. कॅप्टन नीलेश गायकवाड यांनी संमेलनामागची भूमिका स्पष्ट केली. सूत्रसंचालन अरुंधती सुभाष यांनी केले. 

 

अवश्य वाचा