अलिबाग 

प्रादेशिक कृषि संशोधन केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ एस. बी. भगत यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञांच्या चमुने कर्जत तालुक्यातील वदप व कुंडलज या गावातील शेतकर्‍यांच्या भात पीक असलेल्या शेतावर जावून प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना भात पिकामध्ये खोडकिडयांचा मोठया प्रमाणात प्रादूर्भाव झाल्याचे आढळून आले. वेळीच दक्षता घेवून उपाययोजना न केल्यास शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असल्याने वदप येथील भैरवनाथ मंदिराच्या सभागृहात शेतकर्‍यांची बैठक आयोजित करण्यात आली व त्यांना खोडकिडयाच्या निर्मूलनासाठी मार्गदर्शन करण्यात आले. 

शास्त्रज्ञांच्या चमुत कीटकशास्त्रज्ञ डॉ विनायक जालगावकर, वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ जीवन कदम, विस्तार शिक्षण शास्त्रज्ञ डॉ. रवीन्द्र मर्दाने व कनिष्ठ संशोधन सहाय्यक डॉ हेमंत पवार यांचा समावेश होता.खोडकिडा ही भात पिकावर पडणारी सर्वात महत्वाची व हानीकारक कीड असून ही फक्त भातावरच उपजीविका करते. ही कीड प्रामुख्याने ठाणे आणि रायगड जिल्हयातील दुबार पिकाखालील क्षेत्रात प्रतिवर्षी नुकसान करताना आढळते. सद्यपरिस्थितीमध्ये भात पिकांची पूनलार्गवड पूर्ण झालेली असून भात पीक फुटव्याच्या अवस्थेत असून अधून-मधून पडणारा पाऊस, पिकाची जोमदार वाढ, अधून-मधून उघडीप व हवेतील गारवा अशा प्रकारचे हवामान खोडकिडा या किडीसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आपल्या पिकांची नियमित पाहणी करून खोडकिडयांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास काय करावे याचे मार्गदर्शन करण्यात आले तसेच यावेळी भात पिकातील खोडकिडयाच्या विविध अवस्थाही शेतकर्‍यांना प्रत्यक्षात दाखविण्यात आल्या.

या किडीचा प्रादुर्भाव रोपवाटीकेत तसेच लावणीनंतर पिकाच्या वाढीच्या सर्व अवस्थांमध्ये आढळून येतो. अळी सुरूवातीस काही वेळ कोवळया पानांवर आपली उपजीविका करते. नंतर ती खाली येऊन खोडास छिद्र पाडून आत प्रवेश करते व आतील भाग पोखरून खाते. किडीचा प्रादुर्भाव जर पिकाच्या सुरवातीच्या अवस्थेत म्हणजचे फुटवे येण्याच्या अवस्थेत किंवा पीक पोटरीवर येण्यापूर्वी झाला तर रोपाचा मधला पोंगा लालसर पिवळा पडून वरून खाली सुकत येतो, यालाच “गाभा मर’’ असे म्हणतात. सुकलेला किंवा मेलेला पोंगा हाताने ओढला असता सहजासहजी निघून येतोे. पोटरीतील पिकावर देखील खोडकिडीचा उपद्रव आढळून येतो आणि त्यामुळे दाणे न भरलेल्या पांढर्‍या लोंब्या बाहेर पडतात. यालाच “पळींज किंवा पांढरी पिसे असे म्हणतात. परिणामत: भाताच्या उत्पादनात मोठया प्रमाणावर घट येते. या किडीच्या नियंत्रणासाठी गंध सापळयांचा देखील वापर करता येतो. हे सापळे भात शेतामध्ये 20 ते 25 मीटर अंतरावर हेक्टरी 20 या प्रमाणे लावावेत. भात पिकावर खोडकिडयाच्या नियंत्रणासाठी दाणेदार कीटकनाशक उदा. कारटाप हायड्रोक्लोराईड 4 टक्के दाणेदार 18.75 किलो किंवा क्लोरॅन्ट्रानीलीप्रोल 4 टक्के दाणेदार 10 किलो किंवा फिप्रोनिल 0.3 टक्के दाणेदार 20.8 किलो प्रती हेक्टर या प्रमाणात वापरावे. पहिली मात्रा रोपवाटीकेमध्ये 2-3 दिवस पुर्नलागवडीपूर्वी आणि दुसरी मात्रा पुर्नलागवडीनंतर 30-35 दिवसांनी किंवा आवश्यकतेप्रमाणे द्यावीत. दाणेदार कीटकनाशकाचा वापर करते वेळी जमिनीत पुरेसा ओलावा असावा. पुरेशा ओलाव्या अभावी किंवा उताराच्या जमिनीत दाणेदार कीटकनाशक वापरणे शक्य नसल्यास प्रवाही कीटकनाशकाची फवारणी करावी. त्यासाठी अ‍ॅसीफेट 75 टक्के पाण्यात विरघळणारी 625 गॅ्रम किंवा क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही 1250 मि.लि. किंवा कारटॅप हायड्रोक्लोराईड 50 टक्के प्रवाही 600 ग्रॅम किंवा फ्युबेन्डामाइड 20 टक्के डब्ल्यु जी 125 ग्रॅम किंवा डेल्टामिथ्रीन 1.8 टक्के प्रवाही 650 मि.ली. किंवा लॅम्ब्डा सायहॅलोथ्रीन 5 टक्के प्रवाही 500 मिली./ हेक्टर या प्रमाणात फवारावे असे मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीला 27 शेतकरी उपस्थित होते. बैठकीच्या आयोजनासाठी वदप येथील शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य निलीकेश दळवी यांनी अथक परीश्रम घेतले. प्रगतशील शेतकरी कृष्णा भगत यांनी कुंडलज येथे शास्त्रज्ञांच्या पाहणी दौर्‍याचे नियोजन केले होते.

 

अवश्य वाचा