मित्रहो, स्वातंत्र्य दिन हा खर्‍या अर्थाने आनंदोत्सवच असतो. आज आपण स्वातंत्र्याचा 72 वा वर्धापन दिन साजरा करीत आहोत. म्हणजेच ब्रिटिश राजवटीतून भारतभूमीची मुक्तता करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली वा योगदान दिले. त्यांची कृतज्ञतेच्या भावनेतून आठवण करुन त्यांना विनम्र अभिवादन करत आहोत. आपण भारतीय नागरिक म्हणून आज जो स्वातंत्र्याचा श्‍वास घेताहोत, ही त्या क्रांतीवीरांचीच पुण्याई आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसा व सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन ब्रिटिशांना ‘चले जाव’चा सज्जड इशारा दिला. परिणामी, 150 वर्षांच्या इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपला देश 15 ऑगस्ट 1947 रोजी मुक्त झाला. इंग्रजांना ‘भारत छोडो’चा फर्मान काढून क्रांतीकर्त्या अरुणा असफअली यांनी पहाटेच्या सुमारास मुंबईच्या गवालिया टँक येथे तिरंगा फडकावला आणि एका अर्थाने स्वातंत्र्याचा बिगुल वाजला. स्वातंत्र्याच्या वार्‍यावर मोठ्या दिमाखाने फडकणार्‍या तिरंग्याकडे पाहिल्यावर हुतात्म्य पत्करलेल्या क्रांतीकारकांची शौर्यगाथा डोळ्यासमोर उभी राहते. त्याचप्रमाणे वंदे मातरम् अनं जन-गण-मन तर आमची स्फुर्तीदायक राष्ट्रगीतेच आहेत. त्यांनाही स्वातंत्र्य दिनानिमित्त आम्ही वंदन करतो.

स्वातंत्र्य म्हणजे पारतंत्र्याचा काळोख नाहिसा होऊन भारत मातेच्या उदरातून स्वराज्याचा उष:काल उदयास येणे होय. या स्वातंत्र्यामागे अनेकांचे कठोर परिश्रम होते, त्याग होेता, बलिदान होते. क्रांतीकारक भगतसिंग - सुखदेव - राजगुरु हे इन्कलाब जिंदाबाद म्हणत हसत-हसत फासावर चढले. ब्रिटिशांच्या गोळीला गोळीने उत्तर देण्यासाठी सुभाषचंद्र बोस यांनी ‘आझाद हिंद सेना’ची स्थापना केली आणि हीच सेना पुढे भारतीय सेनेची नांदी ठरुन ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूँगा’ असे त्यांनी भारतीयांना आवाहन केले. इतकेच नव्हे तर, ‘जयहिंद’चा नारा देत भारतीयांच्या हृदयात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. लोकमान्य टिळकांनी ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे व ते मी मिळविनच’ असे आव्हान करुन फिरंग्यांना भारत सोडून जाण्याचा इशारा दिला. याशिवाय नंदुरबारचे बालक्रांतीकारक शिरीषकुमार मेहता, लालदास, धनसुखलाल, शशिधर हे पंचरत्न भारतभूमीच्या स्वातंत्र्यासाठी शहीद झाले आणि या बालविरांनी बलिदानाचा एक नवा इतिहास रचला.त्यांच्या पाठोपाठ लाला लजपतराय, चंद्रशेखर आझाद, वासुदेव बळवंत फडके, बिरसा मुंडा मदनलाल धिंग्रा या क्रांतीविरांनी मातृभूमीसाठी दिलेले हे बलिदान भारतीयांच्या चिरकाल स्मरणात राहील. महात्मा गांधी यांच्या अहिंसेच्या मार्गाने मिळविलेल्या स्वातंत्र्याला पंडित नेहरु, स्वामी विवेकानंद, सरोजीनी नायडू, वल्लभभाई पटेल, लालबहादूर शास्त्री, मौलाना आझाद, ठाण्याचे दत्ताजी ताम्हणे, क्रांतीवीर नाना पाटील, साने गुरुजी, बाबू गेनू, सेनापती बापट आदी देशभक्तांनी मोलाचे योगदान दिले. या सर्व क्रांतीवीरांना मराठी भूमीपुत्रांतर्फे मानवंदना!

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळ-जवळ 65 वर्षे काँग्रेसने एकहाती सत्ता भोगली. या कालखंडात ‘गरिबी हटाव’चा नारा माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी दिला. हा खर्‍या अर्थाने इलेक्शन स्टंट होता, कारण गरिबी तर हटली नाही, पण याउलट गरिबांनाच हटविले गेले. या प्रदीर्घ काळात गरीब-श्रीमंत यामधील दरी खूपच वाढत गेली. परिणामी, भारताची गणना जगात एक गरीब देश म्हणून होत असे. शेतकरी, शेतमजूर, कामगार आदी घटकांची परिस्थिती देशोधडीला लागली होती. रोटी-कपडा-मकान, रोजगार, शिक्षण, आरोग्य हे प्रश्‍न आ वासून उभे होते. या गोष्टींमुळे सर्व थरातील लोकांमध्ये काँग्रेस राजवटीविरुद्ध असंतोष माजला. त्याची परिणती अशी झाली की, मतदारांनी 2014च्या लोकसभेच्या निवडणुकींमध्ये काँग्रेसला सफशेल नाकारले आणि त्या जागी भारतीय जनता पार्टीची केंद्र व राज्यात अनुक्रमे नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारे स्थापन झाली. देशात ‘अच्छे दिन’ येण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केली त्या अनुषंगाने मोदी सरकारची यशस्वी वाटचाल सुरु झाली असून, जनसामान्यांचे मूलभूत प्रश्‍न व दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांची कर्जमाफी हे प्रश्‍न सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत. मेक इन इंडिया, स्टार्ट अप, स्टँड अप इंडिया, जनधन योजना, मुद्रा योजना यांच्या माध्यमातून उद्योजकतेला मोठ्या प्रमाणात वाव मिळत आहे. स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर होण्याच्या दृष्टीने भारताला स्मार्ट, स्वच्छ, आश्‍वासक, सक्षम, प्रगत, आत्मनिर्भर, उद्यमशील, डिजिटल व आर्थिकस्तरावर मजबूत करण्यासाठी मोंदी सरकारद्वारे युद्धपातळीवर प्रयत्न केले जात आहेत. विज्ञान, तंत्रज्ञान, उद्योग या क्षेत्रांना प्राधान्यक्रम दिल्याने रोजगार-स्वयंरोजगारांच्या विविध संधी निर्माण होताहेत. कौशल्य विकास कार्यक्रमाला राष्ट्रीय स्तरावर चालना दिल्यामुळे सुशिक्षित तरुण-तरुणींना प्रगतीची नवी कवाडे खुली झाली आहेत.  डिजिटल कनेक्टिव्हीटी वाढविण्यावर भर दिल्याने प्रशासनात गती व पारदर्शकता येत आहे. त्याचप्रमाणे डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन होण्याच्या दिशेने भारताने उत्तुंग झेप घेतली आहे. शस्त्र निर्मिती, अणु चाचण्या, राष्ट्रीय महामार्गाची व्याप्ती वाढविणे, रेल्वे सोयीसुविधांचे आधुनिकीकरण या क्षेत्रांत भारत मोठी आघाडी घेत आहे. देशाच्या इतिहासावर ‘नमो मुद्रा’ उमटवून मोदी सरकार हे एका नव्या प्रगत भारताची निर्मितीची नांदी ठरली आहे. या सर्व क्षेत्रांतील प्रगतीच्या आधारावर प्रधानमंत्र्यांनी 5 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्थेचे स्वप्न साकार करण्याचा संकल्प सोडला असून, ते मोदीजी सिद्धीस आणतील, हे नक्कीच. ‘सबका साथ, सबका विकास’या ब्रिदच्या आधारावर देशाला सर्वच क्षेत्रात आघाडीवर आणून मोदिजींनी भारताला जगातील विकसित देशांच्या पंगतीत आणले व फ्रान्ससारख्या बलाढ्य राष्ट्राला मागे टाकले. याचे सर्वस्वी श्रेय जाते ते नरेंद्र मोदी यांच्या बहुआयामी नेतृत्वाला. ‘थिंक ग्लोबली, अ‍ॅक्ट लोकली’ या धोरणामुळे मोदी सरकारने आयात निर्यातीत भारताचा प्रगतीचा आलेख झपाट्याने विस्तारला आहे. संरक्षण क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण असे ‘सरंक्षण क्षेत्र उत्पादन धोरण-2018-आखण्यात आले असून, त्याद्वारे स्वदेशी बनावटीची सरंक्षण सामुग्री निर्मितीवर भर देण्यात येत आहे. भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या बाळाघाटावर अचूक हल्ला करुन आतंकवाद्यांच्या अड्डांसह त्यांच खात्मा केला त्यामुळे पाकिस्तानप्रणित आतंकवादी कारवायांवर वचक बसण्यास मदत झाली आहे. या ऑपरेशनमध्ये हवाई दलांच्या तीन महिला अधिकार्‍यांनी आपल्या शौर्याची चमक दाखविली. त्यांना आमचा  मानाचा मुजरा! आता जम्मू कश्मीर आणि लडाख हे वेगवेगळे दोन केंद्रशासित प्रदेश तयार झाले असून, या नव्या कायद्यामुळे ते दहशतवाद, फुटीरतावाद घराणेशाही व भ्रष्टाचारापासून आता मुक्त झाले आहेत. 370 कलम रद्द झाल्याने शामाप्रसाद मुकर्जी, डॉ. बाबासाहेब आंबेेडकर, वल्लभभाई पटेल यांच्या स्वप्नातील काश्मीर तब्बल सात दशकांनंतर का होईना अखेर साकार झाले, याचे श्रेय नरेंद्र मोदी व अमित शहांच्या राजकीय मुत्सद्देगिरीला जाते. महात्मा गांधीजींच्या अहिंसेच्या सत्याग्रहातून तर भगतसिंगसारख्या क्रांतीविरांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वराज्याला नरेंद्र मोदींच्या 56 इंची छातीने सुराज्य करुन दाखविले, याचा आम्हा भारतीयांना सार्थ अभिमान आहे. मित्रहो, मोदीजींचा करिश्मा एवढा प्रभावशाली आहे की, त्यांचा हा कार्यकाळ स्वराज्याचे सुराज्य करणारा सुवर्णकाळ ठरला आहे. मोदींच्या कार्यकर्तृत्वामुळे भारतातल्या गोरगरीब व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकांच्या घरा-घरात घरगुती गॅस व विजेची सोय झाली आहे. जगात भारताचे नाव खर्‍या अर्थाने अजरामर करणार्‍या विश्‍वातल्या सर्वात शक्तीशाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त समस्त भारतीयांतर्फे मानवंदना!

भारतीय स्वातंत्र्य चिरायू होवो!

 

अवश्य वाचा

मुरूड - अलिबाग बस नादुरुस्त...