प्रसिद्ध आणि वादग्रस्त पत्रकार रवीशकुमार यांना पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या बाजूने तसेच विरोधात बोलणार्‍यांकडून कडक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. मॅगसेसे पुरस्स्काराला खास वलय असल्याने आणि या पुरस्स्काराने गौरवल्या जाणार्‍या व्यक्तीवर जगभरातून प्रकाशझोत पडत असल्याने या प्रतिक्रियांची विशेष दखल घ्यावी लागते. 

पत्रकारितेच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्‍नांना वाचा फोडणारे पत्रकार रवीशकुमार यांना पत्रकारितेतल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाल्यानंतर त्यांच्या बाजूने तसेच विरोधात बोलणार्‍यांकडून कडक प्रतिक्रिया देण्यात येत आहेत. मॅगसेसे पुरस्स्काराला खास वलय असल्याने आणि या पुरस्स्काराने गौरवल्या जाणार्‍या व्यक्तीवर जगभरातून प्रकाशझोत पडत असल्याने या प्रतिक्रियांची विशेष दखल घ्यावी लागते. 

‘एनडीटीव्ही’ वाहिनीमध्ये अगदी खालच्या स्तरापासून कारकीर्द करणार्‍या रवीशकुमार यांची वाटचाल आदर्श वाटावी, अशी आहे. सुरुवातीला ते एनडीटीव्हीकडे येणार्‍या पत्रांची छाननी करण्याचे काम करत. नंतर त्यांनी अँकरिंगला सुरुवात केली. आता तर त्यांच्याकडे मॅनेजिंग एडिटरपदाची जबाबदारी आहे. आपल्या वेगळ्याच धाटणीत दररोज वेगवेगळ्या आंदोलनाची बातमी करताना त्यांनी सरकारवर कायम तिखट शब्दांमध्ये टीका केली. सरकारची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली होती. ते राष्ट्रवादी विचारांच्या निशाण्यावर होते. त्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना धमक्या दिल्या जात होत्या. त्याला न जुमानता त्यांनी आपले काम सुरू ठेवले. रवीशकुमार ‘प्राइम टाइम’ या कार्यक्रमातून सर्वसामान्य जनतेच्या भूमिका पोटतिडकीने मांडतात. आपल्या कार्यक्रमातून ते वचिंत, पीडित आणि शोषितांचे प्रश्‍न प्रशासनापर्यंत पोहोचवून जाब विचारण्याचे काम करतात.

रॅमन मॅगसेसे पुरस्काराला आशियातले नोबेल पुरस्कार समजले जाते. आतापर्यंत या पुरस्काराने व्यवस्थेविरोधात लढणार्‍यांचाच सन्मान करण्यात आला आहे. अमिताभ चौधरी, अरुण शौरी, बी. जी, वर्गीस, आर.के. लक्ष्मण आणि पी. साईनाथ यांच्यानंतर मॅगसेसे पुरस्कार मिळवणारे ते सहावे भारतीय पत्रकार आहेत. 1996मध्ये त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली. देश आणि समाजातील व्यंगाचा शोध घेऊन त्यावर परखड भाष्य करण्याचे काम त्यांनी केले. ‘रवीश की रिपोर्ट’ हा कार्यक्रम देशात लोकप्रिय झाला. सरकारवर त्यांनी केलेली टीका अनेकांना झोंबत होती, तर सामान्यांना त्यांचा कार्यक्रम आवडायचा. आपली कुणी दखल घेत नाही, अशी खंत बाळगणार्‍यांसाठी रवीशकुमार यांचे व्यासपीठ सतत खुले असायचे. सत्तेच्या पालख्या वाहूनच सन्मान वाट्याला येतो, असे नाही तर सत्तेच्या विरोधात केलेले कामही पुरस्काराला पात्र होते, असा अनुभव आतापर्यंतच्या सहाही पत्रकारांना आला आहे. अलीकडच्या काळात न्यूज रुममध्ये बोलावलेल्या पाहुण्यांना अँकर बोलके करत नाहीत, तर त्यांच्यावर धावून जातात, त्यांची बोलती बंद करण्यात धन्यता मानतात. अशा वेळी दुसर्‍यांच्या वेदना, प्रश्‍न खुबीने आणि अतिशय शांतपणे मांडता येतात, हे रवीशकुमार यांनी दाखवून दिले आहे. अशा कार्यक्रमांनाही श्रोते असतात, हेही एनडीटीव्हीने दाखवून दिले.

रवीशकुमार यांच्या मागे एनडीटीव्ही वाहिनी ठामपणे उभी राहिली. तटस्थ प्रेक्षक हाच वाहिन्यांचा खरा टीआरपी वाढवतो. प्रत्येक चॅनेलवर प्राईम वेळेत सारखेच कार्यक्रम असताना रवीशकुमार यांनी मात्र वेगळेपण जपले. शेवटी कंटेंट जिंकते आणि चॅनेलला टीआरपी मिळतो. सध्याच्या स्पर्धेच्या काळात वेगळेपण जपणे फार अवघड आहे. वाहिनीवर सतत काय दाखवायचे असा बहुतांश चॅनेलसमोरचा गहन प्रश्‍न आहे. शिवाय, उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याच्या प्रयत्नात असताना पीडितांच्या दुनियेत कुणालाही रस नाही. अशा परिस्थितीत रवीशकुमार मात्र सातत्याने अंधार्‍या दुनियेत वावरत राहिले. तिथल्या समस्या टिपत राहिले. लोकांच्या प्रश्‍नांना त्यांचा आवाज मिळत गेला. त्यातून अनेकांना न्याय मिळाला. आता त्यांच्या या कामाची दखल पुरस्काराने घेतली गेली आहे. 

भारत ही जगातली सर्वात मोठी लोकशाही. या देशात गेल्या काही वर्षांमध्ये स्वतंत्र आणि जबाबदार पत्रकारितेचा अवकाश संकोच पावत गेला आहे. यामागे अनेक कारणे आहेत. बदलत्या माहिती-तंत्रज्ञानामुळे माध्यमांची एकंदर संरचना बदलत गेली, मते आणि वृत्तांकन यांचे बाजारीकरण वाढत गेले. सरकारी नियंत्रणही वाढत गेले आणि सर्वात चिंताजनक बाब म्हणजे वाढत्या धार्मिक, वांशिक आणि राष्ट्रवादी मूलतत्त्ववादामुळे एकाधिकारशाहीला लोकप्रियता लाभत गेली. परिणामतः दुही, असहिष्णुता आणि हिंसाचाराचे सहज आचरण वाढत गेले. या पार्श्‍वभूमीवर रवीशकुमार यांनी सामान्य लोकांच्या वास्तव जीवनावर आधारित कार्यक्रम केले. त्यांच्या कार्यक्रमात सरकारवर टीकेची धार असते. देशात प्रश्‍न अनेक असले तरी चांगले काही घडतच नाही, असे नाही. सरकारवर टीकेचे अनेक मुद्दे असले तरी सरकार म्हणून, सत्ताधारी पक्ष म्हणून त्यांचीही काही बाजू असते. त्या बाजूकडे रवीशकुमार यांचे फारसे लक्ष नसते, हा सातत्याने होणारा आरोप. उपेक्षितांचा जसा एक वर्ग असतो तसाच समाजात दुसराही एक वर्ग असतो. त्याच्याही काही समस्या असतात. त्यांच्याकडे मात्र रवीशकुमार यांचे फारसे लक्ष जात नाही. 

राजकीय पक्षांच्या दोन्ही बाजूंचा साकल्याने वेध घेणे हे कोणत्याही वृत्तवाहिनीचे काम. पण, काही वाहिन्या जशा सरकारी बाहुले बनतात, सत्ताधार्‍यांची बाजू सांभाळत राहतात तसेच काही वाहिन्या सरकारच्या विरोधातच भूमिका घेत राहतात. तटस्थ वार्तांकनाच्या नावाखाली सरकारला किंवा सत्ताधारी पक्षाला सतत आरोपीच्या पिंजर्‍यात उभे केले जाते. सरकारची कोणतीही कृती या मंडळींना पटत नसते. त्यांच्या प्रत्येक कृतीमध्ये या मंडळींना राजकारण दिसत असते. रवीशकुमार यांच्यासारखे पत्रकार प्रत्येक वेळी अशा घटनांनंतर मोदींवर आगपाखड करत राहतात. कुठून का होईना, पक्षावर किंवा शीर्ष नेत्यांवर डाफरण्याचा किंवा त्यांचा कुत्सित पद्धतीने पाणउतारा करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. यातून आपण एका मोठ्या वर्गात आपली विश्‍वासार्हता पणाला लावत आहोत, याची जाणीव त्यांना होत नाही. खर्‍यातूनही खोटे शोधण्याची, चांगल्याची तथाकथित वाईट बाजू शोधण्याची त्यांची विक्षिप्त मानसिकता अनेकदा स्पष्टपणे पाहायला मिळते तेव्हा नेत्यांचे, पक्षाचे समर्थक बेभान होतात. या वस्तुस्थितीची जाण रवीशकुमार यांच्यासारखे पत्रकार खचितच बाळगतात.

रवीशकुमार नाटकीपणा करत नाहीत असे नाही. योग्य तो परिणाम साधेल असे वाटले, तर तेही नाट्याचा आधार घेतात. 2016मध्ये त्यांनी टीव्ही वृत्तांकनातल्या विकृतीचे दर्शन घडवण्यासाठी आपला कार्यक्रम नाट्यपूर्ण रीतीने सादर केला. या कार्यक्रमात रवीश पडद्यावर आले आणि संतप्त आवाजांच्या नाटकी गदारोळाच्या अंधार्‍या जगात टीव्ही वृत्त कार्यक्रम हरवल्याचे प्रेक्षकांना सांगितले. मग पडदा काळा झाला आणि पुढील एक तासभर त्या पडद्यामागून खर्‍याखुर्‍या टीव्ही कार्यक्रमांमधल्या आवाजी गोंधळाचे, विषारी धमक्या, उन्मादी आक्रोश, शत्रूच्या रक्तासाठी तहानलेल्या गर्दीचे खिंकाळणे यांचे तुकडे ऐकू येत राहिले. आपल्या कुटुंबियांना आलेल्या धमक्यांना ते जसे घाबरले नाहीत, तसेच त्यांच्या भावाविरोधात दाखल झालेल्या गुन्ह्याच्या वेळी त्यांनी विरोधात भूमिका घेतली नाही. आपण एखाद्याला ‘भक्त’ म्हणून हिणवतो तेव्हा स्वत: ‘रुग्ण’ बनत नाही ना, याची खातरजमा त्यांच्यासारख्या पत्रकाराने करणे आवश्यक वाटते. एकाच चष्म्यातून प्रत्येक वेळी पाहणे, ठराविक तात्विक भूमिकेतून बाहेर न येणे, चांगल्यातही सतत वाईट शोधणे यामुळे भारतीय पत्रकारितेत अनेक नावे बदनाम झाली. अनेकांना तर आपल्या मालकमंडळींच्या ठराविक भूमिकेमुळे हे करावे लागते. अशा वेळी उगाच एखादा आव आणण्यात काय हंशील? या पातळीवर रवीशकुमार यांच्यासारख्या ज्येष्ठ पत्रकारावर आक्षेप घेतले जातात तेव्हा त्याची नोंद घ्यायला हवी. म्हणूनच रवीशकुमार यांना ‘मॅगसेसे’ कशासाठी, असा प्रश्‍न उपस्थित होतो तेव्हा दोन्ही बाजू तपासून पाहणे अनिवार्य ठरते.

 

अवश्य वाचा