श्रीवर्धन - 

श्रीवर्धन तालुक्यात मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने दिवसभर कडक ऊन पडत आहे. कडक ऊन पडल्यामुळे शेतामध्ये चांगल्या पद्धतीने वाढलेल्या भात रोपावरती दाणे तयार होण्याआधीच करपा रोग पडण्याची भीती निर्माण झाली आहे. यावर्षी मोसमी पावसाने सुरूवात तशी उशिराच केली, परंतु अगोदर झालेल्या चक्रीवादळामुळे पाऊस चांगल्या प्रमाणात झाला होता. शेतकऱ्यांनी मृग नक्षत्र निघाल्यानंतर आपल्या शेतामध्ये मशागत करून भाताची पेरणी केली होती. वादळी पावसामुळे भात रोपे चांगलीच वाढली होती. मोसमी पावसाने सुरुवात केल्यानंतर दहा ते पंधरा दिवसातच भात लावणीला सुरुवात झाली होती. भात लावणीच्या दरम्यान देखील पाउस चांगला पडत असल्याने लावणी झाल्यानंतर भात शेतीला देण्यात येणारे खत भात रोपांना पोषक पडले होते, परंतु जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात व ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात संपूर्ण महाराष्ट्रभर मराठवाडा सोडून मुसळधार पावसाने थैमान घातले होते. पश्चिम महाराष्ट्रातील सांगली व कोल्हापूर जिल्ह्याला तर महापुराने वेढले होते. त्याचप्रमाणे कोकणात व तळकोकणात देखील अतिवृष्टीमुळे भात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जास्त पाऊस पडल्यामुळे लावणी झालेल्या भात शेतांमध्ये पाण्याच्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात माती व रेजगा वाहून आल्यामुळे अनेक लावणी झालेली भात शेती पूर्णपणे उध्वस्त झाली आहे. श्रीवर्धन तालुक्यात भातशेतीचे नुकसान एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाले नसल्याने भात रोपे चांगलीच वाढीला लागली होती. आता काही दिवसातच भात रोपांना दाणे देखील लागणार होते. परंतु मागील वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाने विश्रांती घेऊन, कडक ऊन पडत असल्यामुळे भात रोपां वरती करपा रोग पडण्याची भीती निर्माण झाली आहे. तर काही शेतांमध्ये भाताच्या पात्या काही प्रमाणात पिवळ्या पडल्याचे देखील पाहायला मिळत आहेत. तरी कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या शेतातील भात रोपांची पाहणी करून भात रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ते सहकार्य करावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

अवश्य वाचा

म्हसळा येथे माघी गणेशोत्सव