हिंदुस्थान 15 ऑगस्ट 1947 रोजी ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला. हा दिवस भारताचा राष्ट्रीय उत्सव म्हणून आपण साजरा करतो. पण, आज या उत्सवाला काहीसे विकृत वळण लागले आहे. 15 ऑगस्ट म्हणजे सुट्टी. चला मजा करूया. लोणावळ्याच्या भुशी डॅमच्या कुशीत मद्याच्या धुंदीच्या बेहोशीत. परंतु, अशा पद्धतीने साजरा करतात का हा राष्ट्रीय उत्सव? कसा साजरा केला होता आपल्या बांधवांनी पहिला स्वतंत्र्य दिन संपूर्ण देशभरात?

दिल्लीजवळील छत्रपूर खेड्यातील शेतकरी रणजिलाल चार आणे टांगेवाल्याला देऊन आपल्या बायकोपोरांसह दिल्लीत पोहोचला. दिल्लीत उत्सहाचा महापूर लोटला होता. मिळेल त्या वाहनाने लाखो लोक दिल्लीत जमले होते. गर्दीत स्पृश्य - अस्पृश्यांच्या बेड्या गळून गेल्या होत्या. एक भिकारी तर परदेशी पाहुण्यांना राखून ठेवण्यात आलेल्या आमंत्रितांच्या सोफ्यावर बसला आणि वर पोलिसांनी हटकल्यावर म्हणाला, आज मी मुक्त आहे! तेच आमंत्रण लोकांच्या या अतिउत्साहाचे अतिरिक्त रुपांतर झाले. झोपडपट्टीत राहणार्‍यांनी गव्हर्नर हाऊसमध्ये राहण्याची मजा लुटली. बरोबर 8 वाजून 10 मिनिटांनी पंतप्रधान नेहरुंनी लाल किल्ल्यावर राष्ट्राला उद्देशून भाषण केले. या वेळेस मुंबईतही जल्लोषाचे वातावरण होते. गेटवेपासून ते मलबार हिल, परळच्या चाळीपासून ते गिरगाव, खेतवाडी, चर्नीरोड, कांदेवाडी, बोरघाट, शंकरशेठ रस्ता चिराबाजारपर्यंतच्या सर्व घरांवर उंचच उंच तिरंगा ध्वज फडकत होते. मुंबई प्रांताचे मुख्य प्रधान बाळासाहेब खेड यांनी मध्यरात्री तिरंगा ध्वज फडकवला. काळे झेंडे दाखवून स्वातंत्र्याचा अपशकून करू नका, असे हिंदू महासभेच्या तरुणांना सांगून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपल्या घरावर तिरंगा आणि भगवा हिंदुध्वज फडकवला. पुण्यात पुणेकरांनी ऑगस्ट 1947च्या मध्यरात्री सिंहगडावर प्रचंड होळी केली. ही होळी पुणे, राजमाची, रायगड, राजगडावरून दिसत होती. शिवनेरी व पुरंदर किल्ल्यावरही अशाच होळ्या पेटवून स्वातंत्र्याचा उत्सव अशा आगळ्यावेगळ्या पद्धतीने पुणेकरांनी साजरा केला. लोखंडी खिळ्यांवर स्वतःला झोकून देऊन मद्रासमधील साधूंनी स्वातंत्र्य दिनाचा आनंद अशा प्रकारे व्यक्त करून उपस्थितांना थक्क केले, तर आसाममधील शिलाँग या राजधानीवर हजारो तरुणांच्या उपस्थितीत ब्रिटिश कमांडिंग ऑफिसरने आपल्या हिंदी उपप्रमुखाला स्वातंत्र्य दिनी कवायतीचे संचलन करण्याचा मान आपणहून दिला. हिंदूंचे पवित्र शहर वाराणसी (काशी) येथील सुवर्णमंदिरातील पं. भवानीशंकर यांनी हातात चंदनाचा गंध व पवित्र गंगोदकाचा कलश घेऊन गाभार्‍यात प्रवेश करून आधुनिक भारताच्या वतीने परमेश्‍वरास हात जोडून त्यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली, तेव्हा हजारोंचे हात त्यांच्याबरोबर जोडले गेले. तीन तपे परदेशात परागंदा अवस्थेत राहून स्वातंत्र्याचा आनंद लुटायला पंजाबात आलेले भगतसिंगांचे चुलते सरदार अजितसिंगांचे याच दिवशी निधन झाले. तर अरविंदबाबूंचा जन्मदिन 15 ऑगस्ट 1872 आणि भारताचे स्वातंत्र्य 15 ऑगस्टलाच.  

परदेशातसुद्धा 15 ऑगस्ट, 1947 हा दिवस भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून उत्साहात साजरा झाला. लंडन शहरात आजचा दिन भारतीयांसाठी सोनियाचा दिन होता. 11 वाजेपर्यंत इंडिया हाऊसच्या परिसरात अफाट जनसमुदाय जमला होता. इंडिया हाऊसमध्ये अनेक व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. या ऐतिहासिक समारंभाला इराणी व चिनी राजदूत, सीरियन व स्वीसमंत्री उपस्थित होते. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रगीत सर्व जनतेने तिथे गायले. आणि, भारताचा तिरंगी ध्वज ब्रिटिशांच्या राजधानीत फडकविण्यात आला. 150 वर्षे हिंदुस्थानावर राज्य करणार्‍या ब्रिटिशांच्या भूमीत भारतीय ध्वज फडकताना पाहून अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. 

अमेरिकेत, न्यूयॉर्कमध्ये दुपारी 12.20 (अमेरिकन वेळ) वाजता ब्रिटिश ध्वज खाली उतरवत हिंदी वसाहतीचा ध्वज फडकविण्यात आला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या मुख्य कार्यालयासमोरील विस्तीर्ण पटांगणात अफाट जनसमुदयापुढे ध्वजारोहणाचा कार्यक्रम झाला आणि 55 राष्ट्रांच्या ध्वजांच्या पंगतीत हिंदुस्थानी ध्वज डौलाने फडकत होता. एकमेकांच्या तोंडात पेढे भरवून लोक बेफाम होऊन नाचत होते.  

दिनांक 15 ऑगस्ट 2019 

इतर दिनविशेष : 

1) 1936 - डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली. 

2) 1948 - दक्षिण कोरियाची निर्मिती. 

3) 1948 - साधना साप्ताहिकाचा पहिला अंक प्रकाशित. 

4) 1956 - दिल्लीत पहिले दूरदर्शन केंद्र सुरु. 

5) 1982 - भारतात दूरदर्शनचे रंगीत प्रक्षेपण सुरु.

6) 1947 - स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव देशभर उत्साहात साजरा.

अवश्य वाचा