इदी अमीन या आफ्रिकेतील राक्षसाने मध्ययुगातील चंगीज व तैमूरलंगचा वारसा या अत्याधुनिक समजल्या जाणार्‍या 20व्या शतकाच्या उत्तरार्धात चालविला. या नरराक्षसाने क्रूरपणे केलेल्या कत्तली पाहून हिटलर व मुसोलिनीसुद्धा माना खाली घालतील. कोण बरे हा इदी अमीन? 

1925 साली नाईलच्या खोर्‍यात जन्मलेला इदी अमीन 1943 मध्ये युगांडाच्या ब्रिटिश फौजेत दाखल झाला. दुसर्‍या महायुद्धात ब्रम्हदेशात त्याने पराक्रम गाजवला. त्यामुळे त्याला बढती मिळाली. ब्रिटिशांच्या गुलामगिरीत युगांडा असतानाच त्यांच्या फौजेत कमिशन्ड ऑफिसरचा दर्जा मिळालेल्या दोन व्यक्तींपैकी एक इदी अमीन. ब्रिटिश या देशातून गेल्यावर युगांडाचे पहिले पंतप्रधान मिल्टन ओबेर यांनी त्याला लष्करप्रमुख करून ऐतिहासिक घोडचूक केली. अमीन महत्त्वाकांक्षी होता. लवकरच दोघांमध्ये खटके उडू लागले. इदी आपल्याला भारी पडतोय याची जाणीव पंतप्रधानांना झाली होती. त्यामुळे त्याला हटविण्याचे कारस्थान ते रचतच होते. दोघांपैकी कोणीतरी एकच युगांडाचा सर्वेसर्वा होणार होता. त्यात बाजी मारली इदीने. पंतप्रधान मिल्टन 25 जानेवारी 1971 रोजी सिंगापूरच्या राष्ट्रकुल परिषदेला गेला असता इदीने डाव साधला. लष्करी क्रांती करून त्याने राजधानीवर कब्जा करून स्वतःला राष्ट्राध्यक्ष घोषित केले. या कामी त्याला दुर्दैवाने इस्त्राईल व ब्रिटनने सहास्य केले आणि इथूनच त्याची महाभयानक अशी काळी राजवट युगांडावर सुरु झाली. या विकृत नरराक्षसाने 1971 ते 79 या काळात युगांडावर सत्ता  गाजवली. सत्तेवर येताच त्याने पंतप्रधान मिल्टन यांच्या समर्थकांना ठार मारायला सुरुवात केली. हुकूमशहा जेव्हा सत्तेवर येतात, तेव्हा आपल्या विरोधकांना ठार मारतात. हा त्यांच्या दृष्टीने राजधर्मच होता. पण, हे कृत्य करताना माणुसकीची थोडीफार तरी जाण त्याने ठेवायला हवी होती. आपल्या विरोधकांचे तुकडे करून त्यांची मुंडकी फ्रीजमध्ये ठेवून उरलेल्या अवयवांच्या गोणीच्या गोणी ट्रकमध्ये भरून ‘व्हिक्टोरिया लेक’मधील मगरी व सुसरींना तो खायला देत असे. लाखो मृतदेहांची विल्हेवाट लावायची कशी? म्हणून त्याने ते मृतदेह नाईल नदीत फेकून दिले. या काळात त्याने लेखक, विचारवंत इतकेच नव्हे तर, मंत्रिमंडळातील मंत्र्यांनासुद्धा गोळ्या घातल्या. मानवी संहार करणारा हा नरराक्षस नरभक्षक होता, असे खासगीत म्हटले जाते.

अमीनचे शालेय शिक्षणसुद्धा पूर्ण झालेले नव्हते. युगांडातील तो एक साधा मुष्टियोद्धा. पण, ब्रिटिशांच्या कृपेने तो इतक्या मोठ्या पदावर चढला. त्या कृत्याला ब्रिटनचा पाठिंबा होता. कारण, अमीनने आपण कम्युनिस्टविरोधी  असल्याचा डोलारा उभा केला होता. परिणामी, ब्रिटनचे पंतप्रधान हेरॉल्ड विल्यम यांनी त्याला ‘आफ्रिकेतील मोती’ असे म्हटले आहे. इतकेच नाही तर, या वेड्या अमीनला 1971मध्ये आफ्रिकन ऐक्य संघाचे अध्यक्ष करण्यात आले, म्हणून काही तो सुधारला नाही. उलट, त्याचे वेडेचाळे वाढतच गेले. आपल्या देशातील शेतकरी, दुकानदार, विद्यार्थी यांपैकी कोणाच्याही हातात पिस्तूल देऊन त्याला शेजार्‍याला ठार मारायला सांगायचे आणि मग त्याचे सैनिक त्याला गोळ्या घालून ठार मारायचे. युगांडातील जिंजा येथील जलविद्युत प्रकल्पाच्या पायाच्या चिर्‍या भरताना भर म्हणून दगडगोटे टाकण्याऐवजी त्याने मानवी मृतदेह टाकले. तो सत्तेवर असताना सात-आठ वर्षांत सात-आठ लाख माणसे मारली असावीत, असा मानवी हक्क आयोगाचा दावा आहे.

अशा या विकृत विदूषकाच्या सत्तेला ग्रहण लागले; जेव्हा त्याने 50,000 भारतीयांना नेसत्या वस्त्रानिशी हाकलून लावले तेव्हापासून. कारण, भारतीय गेल्याने अर्थव्यवस्था कोसळली. त्यातच त्याने टांझानियावर आक्रमण केले. पॅलिस्टीन अतिरेक्यांनी इस्त्राईलचे विमान पळविल्यानंतर युगांडात त्यांना आश्रय दिला. अखेर टांझानियाच्या अध्यक्षांनी युगांडावर आक्रमण केले तेव्हा त्याने पळ काढून तो सौदी अरेबियात स्थायिक झाला व तेथेच 16 ऑगस्ट 2003 रोजी मरण पावला, तेव्हा कोणीही त्याच्या नावाने अश्रू ढाळले नाहीत.

दिनांक 16 ऑगस्ट 2019 

इतर दिनविशेष : 

1) 1879 - महाराष्ट्र भाषाभूषण जगन्नाथ आजगावकर यांचे निधन. 

2) 1901 - पत्रकार व इतिहास संशोधक श्रीपाद टिकेकर यांचा जन्म. 

3) 1932 - कवी-लेखक नारायण आठवले यांचा जन्म. 

4) 1956 - महाराष्ट्राचे गृहमंत्री आर.आर. पाटील यांचा जन्म. 

5) 1990 - भारताच्या ‘आकाश’ क्षेपणस्त्राची यशस्वी चाचणी. 

 

अवश्य वाचा