हल्लीच्या तरुणाईचा आपल्या उत्सवांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत चालला आहे. उत्सवातील धार्मिकता बाजूला सरून उत्सव म्हणजे मौजमजेचे दिवस ही संकल्पना हळूहळू दृढ होऊ लागली आहे. ज्यामुळे उत्सवाच्या खऱ्या लाभाला आपण मुकू लागलो आहोत. अगदी तोंडावर आलेल्या गणेशोत्सवाच्या बाबतीतही मागील काही वर्षांपासून हेच चित्र दिसते. आगमन विसर्जन मिरवणुकीत पारंपारिकतेपेक्षा धांगडधिंगाच अधिक पाहायला मिळतो. आरत्या म्हणताना त्या मंजुळ स्वरात आणि हळुवार म्हटल्या जाव्यात; मात्र आजकाल बेंबीच्या देठापासून किंचाळत आणि लांबलचक आरत्या म्हटल्या जात असल्याचे काही ठिकाणी पाहायला मिळते. गणेशमंडपामध्ये दिवसभर श्री गणेशस्तोत्र, गणपती अथर्वशीर्ष, श्री गणेशाचा नामजप लावला जायला हवा; मात्र तिथेही काही ठिकाणी चित्रपटातील गाणी लावली जात असल्याचे पाहायला मिळते. लालबाग, परळ, खेतवाडीसारख्या भागात गणेशदर्शनासाठी लांबलचक रांगा लागतात. खऱ्या अर्थाने गणेश दर्शन होण्यासाठी रांगेमध्ये श्री गणेशाचा अखंड नामजप करत थांबले पाहिजे; मात्र प्रत्यक्षात तरुणवर्ग या ठिकाणी एकमेकांची मस्करी करताना, हास्यविनोद, गाणी म्हणताना पाहायला मिळतो. गणेशोत्सवाच्या काळात श्री गणेशतत्व मोठ्या प्रमाणात कार्यरत असते; मात्र आपल्या चुकीमुळे त्याचा योग्य तो लाभ आपल्याला करून घेता येत नाही, यावर्षी गणेशोत्सवाचा अध्यात्मिकदृष्ट्याही लाभ करून घेण्याचा संकल्प करूया !

अवश्य वाचा