श्री गणरायाला ६४ कलांचा अधिपती म्हटले जाते. या ६४ कलांमध्ये संगीत ही एक अद्भुत देणगी गणरायाच्या कृपेने आपल्याला मिळाली आहे. आपल्या शास्त्रीय संगीत आणि नृत्यांमध्ये पुष्कळ सात्विकता असल्याने देवतांची शक्ती त्यातून आपल्याला मिळते. या संगीताचा आपल्या शरीर, मन व भावनांवर परिणाम होतो. म्हणूनच मंगल प्रसंगी किंवा स्वागत समारंभाच्या वेळी आल्हाददायी वातावरण निर्मितीसाठी बासरी, सनई, चौपडा यांसारखी सात्विक वाद्ये वाजवली जातात. आता तर संगीत चिकित्सालयांमध्ये संगीताचा वापर उत्तम स्वास्थ्य मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी, किंबहुना काही आजार बरे करण्यासाठीही केला जातो. एवढेच नव्हे तर संगीताच्या स्वरलहरीवर पशुपक्षी, निसर्ग आनंदाने एक प्रकारे नृत्यच करतात. असे हे संगीत मानवी भावनांना प्रदीप्त करण्याचे मोठे काम करते. अशा सात्विक संगीताचा जागर गणेशोत्सवासारख्या धार्मिक उत्सवाच्या वेळी केला जाणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र चित्र उलट असलेले पाहायला मिळते. आज अनेक गणेशोत्सव मंडपात सिनेमातील रंजित गाणी वाजवली जातात. कार्यक्रमाच्या नावाखाली बीभत्स गाण्यांवर रेकॉर्ड डान्स स्पर्धा भरवल्या जातात. आगमन आणि विसर्जन मिरवणुकांमध्येही अश्लील गाणी वाजवली जातात ज्यामुळे उत्सवाचे पावित्र्य कमी होत आहे शिवाय वृद्ध, आजारी माणसे, अभ्यास करणारे विद्यार्थी यांनाही अतिशय त्रास होतो. मोठ्यांना बीभत्स नृत्य करताना पाहून लहान मुलेही त्यांचे अनुकरण करतात. ध्वनी प्रदूषणाने रक्तदाब वाढणे, डोकेदुखी, स्मृतिभ्रंश, निद्रानाश, हृदयरोग यांसारखे आजार संभवतात तर वृत्ती तामसिक बनू लागते. एकीकडे गणेशाची कृपा संपादन करण्यासाठी दिवस रात्र रात झटायचे आणि दुसरीकडे त्याची अवकृपा होईल असे कृत्य करायचे हे योग्य नव्हे !

अवश्य वाचा