पंढरपूर शहर भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या विशेष बैठकीमध्ये 252 -पंढरपूर-मंगळवेढा ही विधानसभेची जागा भाजपाच्या ""कमळ'' या अधिकृत चिन्हावरील कोणत्याही उमेदवारास लढविण्यासाठी दिली जावी, असा ""एकमुखी ठराव'' शुक्रवार दिनांक 23/8/2019 रोजी पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गावरील अवंतकर भवन येथे झालेल्या शहर भाजपाच्या बैठकीत एकमुखाने मंजूर करण्यात आला.

या बैठकीला भाजपा नेते कल्याणराव काळे, भाजपा नेते डॉ.बी.पी.रोंगे, माजी जिल्हाध्यक्ष काशिनाथ थिटे-पाटील, शहराध्यक्ष संजय वाईकर, तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, सरचिटणीस शंतनू दंडवते, भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेशराव खिस्ते व्यासपिठावर उपस्थित होते. 

देशात भाजपा, राज्यात भाजपा व सोलापूर जिल्ह्यात भाजपाची सत्ता आहे. परंतू पंढरपूर शहरात भाजपाचा अधिकृत आमदार नाही. त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत 252-पंढरपूर - मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाची जागा ही भाजपाच्या ""कमळ'' हे अधिकृत चिन्ह घेणाऱ्या कोणत्याही उमेदवारासच भाजपाची उमेदवारी केंद्रीय व प्रदेश भाजपाने द्यावी, असा ठराव भाजपाचे पंढरपूर शहराध्यक्ष संजय वाईकर यांनी मांडला. या ठरावास सभागृहातील सर्वांनी दोन्ही हात उंच करून वंदे मातरम्‌ म्हणत एकमताने मंजूरी दिली.

केंद्र सरकारच्या माध्यमातून केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी पंढरपूर-देहू  व पंढरपूर-आळंदी या पालखी मार्गासाठी सुमारे 8 हजार कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. लवकरच हे काम सुरू होत आहे. पंढरपूर शहराला जोडणारे सातही रस्ते राष्ट्रीय व राज्य महामार्गाला जोडण्याचे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी केंद्र सरकारने हजारो रूपयांचा निधी दिला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सुमारे 1 हजार कोटी रूपयांपेक्षा अधिक निधी पंढरपूर शहराला दिला आहे. केंद्र व राज्य सरकार पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबध्द व सकारात्मक आहे. भाजपाने पंढरपूर शहराला भरभरून दिले आहे. त्यामुळे त्या बदलात पक्षालाही काहीतरी देणे लागते, ही भूमिका डोळ्यासमोर धरून पंढरपूर शहर भाजपाने ही जागा ""अधिकृत कमळासाठी'' भाजपाच्या अधिकृत कोणत्याही उमेदवाराला द्यावी. आम्ही ती तन, मन,धन लावून विजयी करू, असा विश्वास वाईकर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

या बैठकीमध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते कल्याणराव काळे, भाजपा नेते डॉ.बी.पी.रोंगे, तालुकाध्यक्ष श्रीकांत बागल, शहर सरचिटणीस शंतनू दंडवते, वैद्यकीय सेलचे अध्यक्ष डॉ.शशिकांत धायतडक, ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश खिस्ते, कार्यालय प्रमुख आनंद नगरकर आदिंनी या ठरावाला पाठींबा देत आपली मनोगते व्यक्त केली.

या बैठकीत निहाल दिलीप चौगुले यांना पंढरपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष पदाच्या निवडीचे पत्र भाजपा नेते कल्याणराव काळे यांच्याहस्ते देण्यात आले. 

 

अवश्य वाचा

एमसीएफ आता दोन वर्षांचा