नेरळ 

   कर्जत तालुक्यातील पोशीरमध्ये दहीहंडीकरिता गोविंदा पथकाने उत्साहात हजेरी लावली होती. पोशीर गावातील नव्याने उदयास आलेल्या एकमेव बँड पथकाने आखाडा भागात संगीतमय सलामी दिली त्यामुळे प्रेक्षकांच्या आनंदात आणखी भर पडली.

     शिक्षणाबरोबरच आध्यात्मिक व सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पोशीर गावात दरवर्षी गोपाळकाला उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो .पोशीरमधील आखाडा(जांभुळपाडा ),वरची आळी, खालची आळी, चाफा आळी, इ .सर्व भागात दहीहंडीचा उत्साह होता.यावेळी गोविंदा पथकांनी विविध ठिकाणी दहीहंड्या फोडल्या.

    पोशीर गावातील लिये परिवाराच्या वतीनेदेखील दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दहीहंडीबद्दल  गावात कुतूहल असते. रात्री जागरण ,भजन करून जन्मोत्सव करण्यात आला तसेच सकाळी पारंपरिक पूजाविधी करून काला करण्यात आला.

   पोशीरमधील गावकीच्या इमारती समोरील दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदाचा उत्साह शिगेला पोचला होता ही दहीहंडी गोविंदानी  चार थर लावून दुसऱ्याच प्रयत्नात फोडली .रामचंद्र राणे व विरले गुरुजी यांच्या घरासमोरील हंडी फोडण्यास थोडा वेळ लागला पण गोविंदांनी मनोऱ्यांचा आनंद घेत ही हंडी देखील चार थर लावून फोडली. आखाडा येथील खडकावरील हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकानी प्रयत्नांची शिकस्त केली. यावेळी  गावातील नव्याने तयार करण्यात आलेल्या बँड पथकाने दहीहंडीस संगीतमय सलामी दिली तब्बल एक तास उभे राहून त्यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले . हाबळे आळीत कलमी आंब्याखालील दहीहंडी बाल गोविंदा पथकाने फोडली. यावेळी बाळ गोपाळांनी खूप गर्दी केली होती. अन्य काही ठिकाणी उत्साहात गोपाळकाला साजरा झाला  दहीहंड्या बघण्यासाठी लोकांनी उत्सुकतेने गर्दी केली होती . नेरळ पोलीस स्थानकाच्या वतीने सुव्यवस्था राखण्यासाठी बंदोबस्त करण्यात आला होता.

 

 

 

अवश्य वाचा