पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला महाप्रलयाचा जोरदार फटका बसला असून, त्या पूरग्रस्तांना संकटातून सोडविण्याचा प्रयत्न होणे गरजेचे असताना, राज्यकर्ते मात्र हवाई सफर, जलपर्यटन करण्यातच धन्यता मानत असल्याचे संतापजनक चित्र सामोरे आल्याने हे सरकार किती असंवेदनशील आहे याचा प्रत्यय येऊ लागला आहे. सांगली, कोल्हापुरातील जलप्रलयाला आता आठवडाभराचा कालावधी लोटला आहे. अजूनही लाखो पूरग्रस्त पुराच्या पाण्यात अडकून पडलेले आहेत. ‘आम्हाला सोडवा’ अशा आर्त विनविण्या ते विविध माध्यमांतून सरकारकडे करीत आहेत. पण, पूरग्रस्तांच्या आर्त विनविण्या राज्य सरकारपर्यंत पोहोचतच नाहीत अथवा त्या पोहोचूनही राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.वास्तविक, एवढा मोठा जलप्रलय असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापूर, सांगलीमध्येच आपला तळ ठोकून परिस्थितीवर नियंत्रण मिळविणे गरजेचे होते. पण, त्यांनी केवळ हवाई पाहणी करीत कोल्हापुरात काही काळ थांबून सर्वच पूरग्रस्तांना वार्‍यावरच सोडून दिले आहे. ज्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे, ते जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी तर सांगलीत महापुराच्या पाण्यातून फेरफटका मारत जलपर्यटनाचा आनंद लुटला. त्या जलपर्यटनाचे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलचे व्हायरल झालेले आहेत. हे सारे संतापजनकच आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख हे सांगलीचे पालकमंत्री आहेत. पण, एवढी भयानक परिस्थिती निर्माण होऊनही सुभाष देशमुख हे फिरकलेदेखील नाहीत. या महापुरापेक्षा बापूंना आपला पक्ष मोठा वाटतोय. त्यासाठी त्यांनी पुण्यात काही कार्यक्रमांना उपस्थिती लावल्याचे फोटोही सोशल मीडियावरच व्हायलर झाले आहेत. म्हणजे, या मंत्र्यांना पुरात अडकलेल्या जनतेचे काहीच सोयरसुतक नाही, असेच खेदाने नमूद करावेसे वाटते. पावसाळा सुरु होण्यापूर्वी जिल्ह्याची आपत्कालीन विभागाची बैठक होणे आवश्यक असते. पण, तशी बैठकच झाली नसल्याचा आरोप या दोन्ही जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी उघडपणे करु लागलेले आहेत. याचाच पुरात अडकलेल्या जनतेला प्रचंड त्रास होऊ लागला आहे. सन 2005 मध्येही सांगलीला महापुराने वेढले होते. त्यावेळी सांगलीचे तत्कालीन पालकमंत्री स्व.आर.आर. पाटील यांनी तातडीने कार्यवाही करीत पूरग्रस्तांची भीषण संकटातून मुक्तता केली होती. आता मात्र तशी कार्यवाही होताना दिसत नाही.त्यामुळे ब्रह्मनाळसारखी दुर्दैवी घटना घडून महापुराची तीव्रता आणखी वाढली गेली. हे संकट मोठे आहे. त्यातून बाहेर पडायचे असेल तर राज्यकर्त्यांनी खंबीरपणे जनतेच्या पाठीमागे उभे राहणे गरजेचे आहे.प्रशासनाचेही हात अपुरे पडत आहेत. जेे काही सुरु आहे, ते स्वयंस्फूर्तीने. प्रत्येकजण आपला जीव वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत.वास्तविक, मुख्यमंत्र्यांनी तातडीने कार्यवाही करीत केंद्राकडून जादा मदत मिळविणे अपेक्षित आहे. पण, तशी काहीच हालचाल होताना दिसत नाही, हे दुर्दैव म्हटले पाहिजे. सांगली, कोल्हापूरप्रमाणचे रायगडालाही महापुराचा मोठा फटका बसला आहे. त्यातून जनता कशीबशी सावरतेय खरी; पण येथेही सर्व हाताळून परिस्थिती पूर्वपदावर आणण्याची जबाबदारी असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण हे ऐन संकटाच्या वेळी जिल्ह्यात फिरकलेदेखील नसल्याचे संतापजनक चित्र सामोरे आलेले आहे. वास्तविक, महापुराच्या काळात पालकमंत्र्यांनी आपला रायगडातच ठाण मांडून बसणे अपेक्षित होते. त्यामुळे प्रशासन आणखी गतिमान झाले असते. दुर्दैवाने रायगडच्या जनतेची काळजी नसलेल्या पालकमंत्र्यांनी याकडे गांभीर्याने पाहिलेच नसल्याचे जाणवत आहे. आता पूर ओसरल्यावर पक्षप्रवेश कार्यक्रमासाठी ते रायगडात आलेले आहेत. त्यासाठी त्यांना पुरेसा वेळ मिळतो; पण, महापुरात अडकलेल्या जनतेचे अश्रू पुसायलादेखील त्यांना सवड मिळू नये, यावरुन हे राज्यकर्ते किती असंवेदनशील बनत चालले आहेत, हे दिसून येते. राज्यकर्त्यांनी असे असंवेदनशील राहून चालत नाही, हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लक्षात ठेवावे. कारण, अशा असंवेदनशील राज्यकर्त्यांना योग्यवेळी धडा शिकविण्याची ताकद राज्यातील जनतेमध्ये आहे, याचे भान ठेवणे गरजेचे आहे. जलप्रलयामुळे निर्माण झालेल्या अस्मानी संकटाशी सामना करण्यासाठी सरकारने सारे राजकीय कार्यक्रम बाजूला ठेवून महापुरात अडकलेल्या जनतेची सुखरुप सुटका करण्यास प्राधान्य द्यावे. कर्नाटकातील आलमट्टी धरणातून अजूनही अपेक्षित असा पाण्याचा विसर्ग होत नसल्याची तक्रार सांगलीतील पूरग्रस्त जनता करीत आहेत. म्हणजे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सांगूनही जर कर्नाटकातील भाजपचे सरकार ऐकत नसतील, तर अशा राज्यकर्त्यांना वठणीवर आणल्याशिवाय पूरग्रस्त जनता राहणार नाही, हे विद्यमान सरकारने लक्षात ठेवावे. केंद्राच्या माध्यमातून जी मदत मिळणे प्राप्त आहे, ती तातडीने मिळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे आणि प्रत्यक्ष पूरग्रस्तांच्या हातात पडली पाहिजे. अन्यथा त्याचे विपरित परिणाम हे सरकारला भोगावे लागतील. अन्यथा जनतेच्या संतापाच्या लाटेत असंवेदनशील राज्यकर्ते वाहून जातील, हे मोदी लाटेत आलेल्या भाजप, शिवसेनेच्या नेत्यांना कळणारदेखील नाही.

अवश्य वाचा