मराठीची अवस्था दिवसेंदिवस खंगत चालली होती. त्यासाठी काहीतरी करायला हवे, यासाठी सर्वसामान्य माणूस, साहित्यिक, राजकारणी व्यक्ती यांच्यासह परदेशात स्थायिक असलेल्या मराठी माणसांना एका व्यासपीठावर  एकत्र आणण्याची कल्पना मनोहर जोशींनी तत्कलीन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांच्यासमोर मांडली. ती कल्पना मुख्यमंत्र्यांनी मनावर घेतली. त्याला मराठीतील दिग्गज साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. परदेशातील मराठी माणसांनी यात रस घेतला आणि त्यातून जन्म झाला ‘पहिल्या जागतिक मराठी परिषदे’चा 12 ऑगस्ट 1989 रोजी. 

आणि... आणि... आणि... मराठी भाषेच्या भाग्योदयाची ती मंगल शुभप्रभात मुंबईच्या षण्मुखानंद सभागृहात उजाडली. मराठी गर्दीत, मराठी उत्साहात, मराठी वातावरणात, सनईच्या सुरात, तुतारीच्या निनादात व्यासपीठावरील उपस्थितांचे स्वागत गुलाबपुष्पांनी करण्यात आले. व्यासपीठावर भव्य असा पृथ्वीचा गोल, त्यावर देशोदेशींचे राष्ट्रध्वज, महाराष्ट्राचा नकाशा, त्यावर लामणदिवा आणि चोहोबाजूंनी मोहक आकाशकंदील लावून मराठी भाषेच्या, संस्कृतीच्या दीपोत्सवाला मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. तुतारीच्या निनादात मंगेशकर भगिनींचे महाराष्ट्र गौरव गीताचे गायन झाले. पी.व्ही. नरसिंहराव यांच्या हस्ते दीपप्रज्जवलन होऊन परिषदेचे औपचारिक  उद्घाटन झाले. परिषदेचे कार्याध्यक्ष माधव गडकरी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. पावसाला निमंत्रण नसतानाही तो आला. या त्यांच्या वाक्याने हशा आणि टाळ्या घेतल्या. मुंबईचे महापौर शरद आचार्य यांनी परदेशातील मराठी बांधवांचे स्वागत केले. या परिषदेला परदेशातून 285, तर भारतातून 853 प्रतिनिधी  उपस्थित होते. याप्रसंगी ‘मंत्रालयात मराठी’ असे वसंत साठ्यांनी ठणकावून सांगितले, तर मराठीवर  इंग्रजीचे आक्रमण झाले याची कबुली शरद पवार  यांनी दिली. तेव्हा मॉरिशसच्या मंत्री शिलाबाय बापू म्हणाल्या, ज्या शिवरायांनी शून्यातून जग निर्माण केले, त्या शिवप्रभूंची ही मराठी भाषा मरणार नाही, तेव्हा मराठी टाळ्यांचा मराठी खणखणाट कितीतरी वेळ दुमदुमला. एक ऐतिहासिक निर्णय या परिषदेत घेण्यात आला; तो म्हणजे, बॉम्बेचे  मुंबई असे नामकरण या परिषदेत करण्यात आले. महाराष्ट्रातील दिग्गजांचा या परिषदेत सत्कार करण्यात आला. त्यात 103 वर्षे वयाचे  परभणीचे गोंधळी कलावंत राजारामभाऊ कदम, संगीत भीष्माचार्य कृष्णराव पंडित, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, व्ही. शांताराम, लता मंगेशकर, पु.ल. देशपांडे, सुनील गावस्कर इ.चे सत्कार झाले. या परिषदेत अनेकांची भाषणे रंगली. तथापि, परिषदेचे अध्यक्ष वि.वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रजांच्या भाषणाने मराठी काळीज चर्र झाले. त्यांच्या भाषणाचा थोडक्यात सारांश असा.... 

डोक्यावर सोन्याचा मुकुट आणि अंगावर फाटके कपडे अशा अवस्थेत मायमराठी मंत्रालयाच्या दाराशी उभी आहे. एकेकाळी संस्कृतच्या जिवावर पुरोहित वर्गाची सत्ता समाजावर होती. आता इंग्रजीच्या जीवावर 4 टक्के लोक आठ कोटी मराठी लोकांवर राज्य करत आहेत. मराठीच्या राजधानीत एक अभूतपूर्व सोहळा चालू आहे. मायमराठीच्या हाकेला प्रतिसाद देऊन अनेक लोक येथे आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे, परदेशातील मराठी बांधवांनी मायमराठीचे प्रेम समईसारखे तेवत ठेवलेले असताना, आपण मात्र या समया मंदावतोय. कागदोपत्री राजभाषा असलेल्या मराठीला आपले सिंहासन मिळत नाही, कारण या मातीशी कोणतेही नाते नसणार्‍या इंग्रजी भाषेने ते बळकावले आहे. मराठी भाषेचा स्पर्श न होता पदवी मिळण्याचा चमत्कार या महाराष्ट्रातच होऊ शकतो. सध्या इंग्रजीची लाट ही अशी आहे. आणखी 50 वर्षांनंतर मराठीपण हरवलेली आणि सकस इंग्रजीकरणापर्यंत न पोहोचलेला असा एक  अस्मिताहीन समाज आपल्याला निर्माण करायचा आहे का? याचा राज्यकर्त्यांनी विचार करावा. 

तेव्हा नुसती परिषद भरवून मराठी भाषेचे संवर्धन होणार नाही. त्यासाठी काहीतरी ठोस कृती हवी आहे.

(सौजन्य ः सहज शिक्षण यू ट्यूब वाहिनी)   
दिनांक 12 ऑगस्ट 2019   
इतर दिनविशेष : 

1) जागतिक युवा दिन. 

2) तेलगू भाषा दिन. 

3) 1793- सर्वप्रथम सल्फ्युरिक अ‍ॅसिडची निर्मिती करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ जेम्स मापर्यंत मसप्रॅट यांचा जन्म. 

4) 1919- भारतीय अवकाश संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार डॉ. विक्रम साराभाई यांचा जन्म. 

5) 1920- संपादक शिवराम परांजपे यांनी ‘स्वराज’ हे नवे साप्ताहिक सुरु केले.

अवश्य वाचा