मालकासाठी व्यवसाय म्हणजे जणू आईसाठी तिचे मूल. प्रत्येक आई आपल्या बाळाच्या संगोपनाकडे, आरोग्याकडे, वाढीकडे डोळ्यात तेल घालून लक्ष देते, तीच जागरुकता व्यावसायिकाच्याही अंगी असली पाहिजे. व्यवसाय करताना प्रत्येक व्यवहारावर बारकाईने लक्ष देण्याची सवय अंगी बाणवल्यास नुकसान टाळता येते. माझ्या पत्नीकडून मी हे कौशल्य शिकलो.

व्यावसायिक दररोज नवीन काही तरी नवे शिकत असतो. शहाणपण शिकवणार्‍या प्रत्येकाला मी गुरू मानतो. ‘बालादपि सुभाषितं ग्राह्यं’ (सुवचन लहान मुलाने सांगितले तरी ते स्वीकारावे) या उपदेशानुसार मी अगदी लहान मुलांनी लक्षात आणून दिलेल्या गोष्टींकडेही दुर्लक्ष करत नाही. पुष्कळदा अनेक व्यावहारिक धडे मी माझ्या पत्नीकडूनही शिकलो आहे. त्यातील एक महत्त्वाचा म्हणजे, आपल्या व्यवसायावर आणि प्रत्येक व्यवहारावर मालकाचे बारकाईने लक्ष असले पाहिजे.
आमच्या दुबईतील दुकानांत काम करण्यासाठी आम्ही भारतातून कर्मचारीवर्ग मागवत असू. ते आल्यावर त्यांची काही काळ राहण्याची व्यवस्था करणे, ही कंपनीची जबाबदारी असे. हे कर्मचारी गटाने राहात. त्यातील तिघांनी आपल्या खोलीची वीज तोडली गेल्याने राहणे मुश्किल झाल्याची तक्रार माझ्याकडे केली होती. मी मनुष्यबळ व्यवस्थापकांना बोलवून कारण विचारले असता त्यांनी सांगितले, की हे कर्मचारी विजेची उधळपट्टी करतात. त्यामुळे बिल प्रचंड येते. वीजबचत करण्याबाबत अनेकदा सांगूनही ते ऐकत नसल्याने अखेर व्यवस्थापकांनी एका महिन्याचे बिलच भरले नाही. परिणामी, वीज कंपनीने पुरवठा खंडित केला होता. दुसरीकडे आपण कोणतीही उधळपट्टी करत नसल्याचे ते कर्मचारी पुन्हा पुन्हा सांगत होते.

ते कडक उन्हाळ्याचे दिवस होते. दुबईतील उन्हाळा हा पोळून काढणारा असतो. वीज नसताना काय हाल होतात, हे मी जाणून होतो. मी त्यावेळी जरा परदेशात प्रवासाला जाण्याच्या गडबडीत होतो. पत्नी व धाकटा मुलगा रोहित याच्यासमवेत मी स्वित्झर्लंडच्या सहलीचे नियोजन केले होते. त्यामुळे मी व्यवस्थापकांना सर्वप्रथम बिल भरुन वीजपुरवठा पूर्ववत करण्यास सांगितले व प्रवासाला गेलो. सहलीदरम्यान एकदा रोहित बर्फावर स्केटिंग करत असताना अचानक रडायला लागला. तो केवळ अडीच वर्षांचा असल्याने आपल्याला काय त्रास होतोय हे त्याला नीट सांगता येत नव्हते. कडेवर उचलून घेतले की तो गप्प बसायचा, पण जमिनीवर उभे केले की रडायचा. मी हैराण झालो. माझ्या पत्नीने मात्र वैतागून न जाता बारकाईने त्याचे निरीक्षण केले. लवकरच समस्येचे कारण तिला समजले. पायमोज्यांमध्ये बर्फ अडल्यामुळे तळव्यांना थंडी वाजत असल्याने तो त्रासला होता म्हणूनच पायावर उभा केला की रडत होता, हे तिने ओळखले. मोज्यांमधील बर्फ काढून टाकल्यावर तो पुन्हा खेळायला लागला.

मी या प्रसंगावधानाबद्दल पत्नीचे कौतुक केले. त्यावर ती म्हणाली, अहो त्यात काही विशेष नाही. कधी कधी आपण समस्येच्या मुळाशी न जाता वरवर बघून अनुमान काढतो आणि काळजी करत बसतो. एका पालकांचा असाच किस्सा माझ्या वाचनात आला होता. त्यांचा तान्हा मुलगा जमिनीवर झोपवले की कळवळून रडायचा व मांडीवर घेतले की शांत बसायचा. आई-वडिलांना त्याचे कारण कळत नव्हते. मुलाला दृष्ट लागली येथपासून त्याच्या पाठीच्या कण्यात दोष असल्याबद्दल विविध कल्पना ते लढवत बसले होते. अखेर मुलाच्या आजीने त्याला उचलून घेऊन बारकाईने तपासणी केली असता खरे कारण कळले. मुलाच्या कमरेला जी चांदीची साखळी होती तिचा एक टोकदार हूक वर आला होता. जमिनीवर झोपवल्यावर ते टोक मुलाच्या कमरेत रुतायचे आणि मूल कळवळून रडायचे. मांडीवर उचलून घेतल्यावर मात्र साखळी लोंबत राहिल्याने हूक टोचायचा नाही. मीसुद्धा रोहितबाबत असाच विचार केला तेव्हा त्याच्या मोज्यांमध्ये बर्फ अडकल्याचे लक्षात आले.

या छोट्याशा प्रसंगातून मी महत्त्वाचा धडा शिकलो तो म्हणजे कोणत्याही समस्येकडे किंवा व्यवहाराकडे वर वर बघू नये. व्यवसायाकडे मुलाइतक्याच काळजीने लक्ष देणे गरजेचे असते. सहलीवरुन परत येताच सर्वप्रथम मी आमच्या कर्मचार्‍यांच्या तक्रारीची शहानिशा सुरू केली. कर्मचारी आणि व्यवस्थापकांनी आपापली बाजू मांडली. मी गोंधळात पडलो. कर्मचार्‍यांचे म्हणणे खरे मानले तरी बिलांमधील आकडेवारी खोटे बोलत नव्हती. मग मी ती बिले अगदी पहिल्या ओळीपासून बारकाईने बघायला लागलो तेव्हा ध्यानात आले, की चूक वीज कंपनीची होती. आमचे वीज बिल दुसर्‍या व्यक्तीच्या नावावर आणि त्याचे आमच्या नावावर येत होते. व्यवस्थापकांनीही चौकशी न करता दोष कर्मचार्‍यांच्या माथी मारला होता. वीज कंपनीकडे पाठपुरावा केल्यावर त्यांनी चूक मान्य केली आणि संगणकीय नोंदीत तसा बदल केला. त्यानंतर पुन्हा तशी समस्या कधीच आली नाही.

माझे बाबा तेव्हा व्यवसायातून निवृत्त होऊन भारतात आईसमवेत राहात होते. त्यांना बागकामाचा छंद होता. एका भेटीत गप्पा मारताना मी त्यांना पत्नीच्या समयसूचकतेचा, तसेच वीजबिलाच्या समस्येचा किस्सा सांगितला. त्यावर बाबा म्हणाले, दादाऽ बघ या छोट्या गोष्टी आपल्याला कितीतरी शिकवतात. मी बागकाम करताना प्रत्येक रोपाचे असेच बारकाईने निरीक्षण करतो, किडीचा बंदोबस्त करतो, वेळच्या वेळी त्यांना खते, पोषकद्रव्ये देतो. त्यामुळे आपली बाग कशी छान फुललीय बघ. हीच गोष्ट व्यवसायाबाबत सत्य आहे. बरं झालं तुलाही ते समजलं. आता ही बारकाईने लक्ष देण्याची सवय अंगी बाणवून घे. बाबांनी मला समर्थ रामदासांचे दासबोधातील एक छान वचन सांगितले.
समजले आणि वर्तले। तेचि भाग्यपुरुष झाले।
यावेगेळे उरले। ते करंटे पुरुष्॥

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.