पश्‍चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांना महाप्रलयाचा जोरदार फटका बसला आहे. गेले आठवडाभर या दोन जिल्ह्यांतून दुथडी भरुन वाहणार्‍या कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांच्या उपनद्या जणू वैरीण झाल्यासारख्याच वाहू लागल्याने सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला आहे. वास्तविक कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांमुळे पश्‍चिम महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास झाला आहे. या नद्या म्हणजे जणू आपली माताच असल्याच्या भावनेने येथील जनता या नद्यांची नेहमीच आदराने पूजाअर्चा करीत आलेली आहे. पण, त्याच नद्या आता येथील जनतेच्या जिवावर उठल्या आहेत. नद्यांचा प्रकोप म्हणजे काय असतो हे सांगली, कोल्हापूरच्या जनतेने प्रथमच अनुभवलेले आहे. यापूर्वीही सन 1989, 2005 मध्येही असेच महापूर आलेले होते. पण, त्या महापुरांचाही रेकॉर्ड मोडणारा महापूर यावेळी आला आहे. हा महापूर नव्हे तर, जलप्रलयच म्हटला पाहिजे. इतकी भयानक अवस्था कोल्हापूर, सांगली जिल्ह्याची झालेली आहे. या जलप्रलयामुळे सांगली, कोल्हापूरसारख्या सुपीक जिल्ह्याचे जे अपरिमित नुकसान झाले आहे, ते पुढील दहा, पंधरा वर्षांतदेखील भरुन काढता येणार नाही. एखाद्या पाण्याच्या बेटासारखेच स्वरुप या दोन्ही जिल्ह्यांना झालेले आहे. जिकडे बघावे तिकडे पाणीच पाणी, कोणी कोणाचे अश्रू पुसायचे, हा प्रश्‍न प्रत्येकासमोर आहे. या जलप्रलयाचा मोठा फटका नागरी वस्त्यांना बसला आहे. लाखोजण पूरग्रस्त झालेले आहेत. हजारो घरे पाण्याखाली गेलेली आहेत. कित्येकांचे संसारही मोडून पडलेले आहेत. लाखो एकर शेती पाण्याखाली गेलेली आहे. ते नुकसान अपरिमित असेच आहे. मुक्या जनावरांची अवस्थाही अतिशय दयनीय झालेली आहे. माणसे वाचवायची की जनावरे वाचवायची, याचीच चिंता आता प्रत्येकाला लागून राहिलेली आहे. कोल्हापूर, सांगलीची अवस्था ही न बघण्यापलीकडची झालेली आहे. अशा वेळी अवघ्या महाराष्ट्रानेच नव्हे तर, देशाने धावून येणे गरजेचे आहे. कारण, अन्य वेळी जिथे-जिथे अशा आपत्ती कोसळल्या, त्या ठिकाणी सांगली, कोल्हापूरच्या जनतेने स्वयंस्फूर्तीने आपला सक्रिय सहभाग नोंदवित त्या आपद्ग्रस्तांचे अश्रू पुसण्याचा प्रयत्न केला आहे.त्याची परतफेड करण्याची हीच संधी आहे. कोल्हापूरच्या मातीशी इमान राखत जे भूमीपुत्र इतरत्र विखुरलेले आहेत, त्यांनी आपली भूमी, कुटुंब वाचविण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. हे अस्मानी संकट आहे. त्यासाठी सरकारचेदेखील हात थिटे पडू शकतात. राज्यकर्त्यांनीदेखील या आपत्तीकडे राष्ट्रीय आपत्ती म्हणून पाहावे आणि केंद्राच्या मदतीतून जलप्रलयातील नागरिकांना योग्य मोबदला द्यावा. यासाठी सर्वच राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी एकमेकांच्या हातात हात घालून या अस्मानी संकटाचा मुकाबला करण्यासाठी प्रयत्न करावेत. ज्या-ज्या वेळी अशी नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्रावर कोसळली, तेव्हा-तेव्हा महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने त्या आपद्ग्रस्तांना आपापल्या परीने सावरण्याचा प्रयत्न केला आहे. महापुरामुळे कोल्हापूर, सांगलीतील जनता अद्यापही भीतीच्या छायेखाली वावरतेय. पावसाचा जोरही अखंडित आहे. विविध धरणांतून होणार्‍या पाण्याचा विसर्ग अद्यापही होतोय. त्यामुळे दिवसेंदिवस महापुराच्या पाण्याची पातळी वाढत चालली आहे. हे पाणी ओसरल्याशिवाय या दोन्ही जिल्ह्यांतील जनजीवन पूर्वपदावर येणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या जलप्रलयाकडे राष्ट्रीय आपत्तीच्या भूमिकेतूनच पाहून केंद्राच्या माध्यमातून सर्वतोपरी मदत पुरविण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे. आधी जलप्रलयात अडकलेल्या नागरिकांची सुखरुप सुटका करुन त्यांना सोयीसुविधा पुरवाव्यात, मगच मुख्यमंत्र्यांनी त्यांची सुरु असलेली महाजनादेश यात्रा सुरु करावी. पूरग्रस्तांना असे वार्‍यावर सोडून सरकारला जाता येणार नाही, हे राज्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे, नाहीतर त्याचे विपरित परिणामच फडणवीस सरकारला भोगावे लागतील. अजूनही कर्नाटकातील आलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यासाठी फडणवीस सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. आलमट्टीतील विसर्ग वाढविला तर काही प्रमाणात जलप्रलयाचे संकट दूर होण्यास मदत होणार आहे. कर्नाटकमध्ये भाजपची सत्ता असतानादेखील महाराष्ट्रात भाजपच्या मुख्यमंत्र्यांचेच जर कर्नाटकाचे मुख्यमंत्री ऐकत नसतील, तर प्रसंगी त्यांना केंद्राच्या माध्यमातून योग्य समज द्यायची तयारीही मुख्यमंत्र्यांनी करणे अपेक्षित आहे. एकीकडे आपल्याच राज्यातील जनता अशी पाण्यात बुडत असताना त्यांना वाचविण्याचे काम हे मुख्यमंत्र्यांनी करणे गरजेचे आहे. यावर्षी केवळ पश्‍चिम महाराष्ट्रालाच नव्हे तर कोकण, उत्तर महाराष्ट्रातदेखील पावसाने हाहाःकार उडविलेला आहे. त्याचा फटका अवघ्या महाराष्ट्रालाच बसलेला आहे. त्यातून सावरण्यासाठी सरकारने जनतेच्या सहाय्याने प्रयत्न केले पाहिजेत आणि पावसामुळे बिघडलेले राज्याच्या प्रगतीचे चक्र पुन्हा गतिमान करणे गरजेचे आहे, हे राज्यकर्त्यांनी लक्षात ठेवणे आवश्यक आहे.

अवश्य वाचा

हृतिक रोशनने घेतले दर्शन.

शिवभक्तांची रांग.